पुणे
हिंदू-मुस्लिम संघर्ष आता संपायला हवा कारण सर्वांचे डीएनए (DNA) एकच आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आर.एस.एस.) अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भारतीय मुस्लिमांनी सांस्कृतिक आदर्शांसाठी पाकिस्तानाकडे न पाहता इंडोनेशियाकडे पाहावे, असे आवाहन केले.
आर.एस.एस. आणि मुस्लिम समुदायातील संबंधांवर भाष्य करताना आंबेकर म्हणाले की, दुर्दैवाने मुस्लिमांमध्ये अशी धारणा निर्माण झाली की धर्म बदलला की राष्ट्र आणि इतिहासही बदलतो. याच फुटीरतावादी मानसिकतेमुळे देशाचे विभाजन झाले. आता हा संघर्ष संपला पाहिजे. इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश असला तरी, तिथे हिंदू-बौद्ध सांस्कृतिक प्रभाव आजही दिसून येतो, म्हणूनच तिथल्या सांस्कृतिक आदर्शांचा भारतीय मुस्लिमांनी विचार करावा, असे ते म्हणाले.
आर.एस.एस. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेल्या लोकसंख्या धोरणाबाबत विचारले असता, आंबेकर यांनी लोकसंख्या नियंत्रणापेक्षा 'लोकसंख्या संतुलन' राखण्यावर भर दिला. ते म्हणाले की, "युरोप आणि चीनने आता आपल्या लोकसंख्या धोरणांमध्ये बदल केले आहेत. भारताच्या संदर्भात लोकसंख्येचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. १९४७ च्या फाळणीत लोकसंख्या बदलाचा मोठा वाटा होता. भविष्यात लोकसंख्या असंतुलन झाल्यास त्याचा देशाची ओळख आणि संस्कृतीवर परिणाम होऊ शकतो." संघातर्फे कुटुंबाच्या आकाराबाबत कोणतीही सक्ती किंवा निर्देश दिलेले नाहीत, तर हा सांस्कृतिक दृष्टिकोन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आर.एस.एस.च्या कायदेशीर नोंदणीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर आंबेकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. आर.एस.एस. ही एक कायदेशीररित्या मान्यताप्राप्त सामाजिक संस्था आहे. बँकिंग प्रणालीद्वारेच आमचे सर्व आर्थिक व्यवहार होतात. अनेक सरकारांनी वेळोवेळी विविध स्तरांवर संघाचे सहकार्य घेतले आहे. राजकीय फायद्यासाठी ही संभ्रमावस्था निर्माण केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.