अंजुमन आरा : उर्दू आणि हिंदी साहित्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
अंजुमन आरा
अंजुमन आरा

 

शाह ताज खान 

शिक्षणतज्ज्ञ, अनुवादक आणि उर्दू साहित्याच्या खंद्या समीक्षक अंजुमन आरा सध्या दिल्ली विद्यापीठाच्या उर्दू विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या एक उत्तम अनुवादक आहेत. शिवाय उत्तम शिक्षिका आणि संशोधकही आहेत. एक निर्भीड बुद्धीवादी आणि स्त्रीवादी विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे. उर्दू साहित्याच्या जगात 'परंपरेचं जतन' आणि 'आधुनिक जागतिक भान' या दोन टोकांना जोडणारा एक भक्कम दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

अरुंधती रॉय यांच्या 'द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस' या इंग्रजी कादंबरीचा त्यांनी 'बेपनाह शादमानी की ममलकत' या नावाने उर्दूत अनुवाद केला. त्यांच्या या कार्यासाठी २०२१ मध्ये त्यांना 'साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आलं. याआधी २०१३ मध्ये दिल्ली उर्दू अकादमीनेही त्यांच्या या अनुवाद कार्याचा गौरव केलाय. नुकताच अंजुमन आरा यांनी 'आवाज़ द वॉइस'शी फोनवरून मनमोकळा संवाद साधला.

शब्दांमागचा आत्मा शोधताना...

संशोधक आणि चोखंदळ अनुवादक म्हणून अंजुमन आरा शब्दश: भाषांतर करण्यापेक्षा मूळ संहितेचा 'आत्मा' टिकवून ठेवण्यावर जास्त भर देतात. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की, "अनुवाद करायचा असेल तर दोन्ही भाषांवर घट्ट पकड असायलाच हवी. तरच त्या भाषेतील बारकावे तुमच्या लेखनात येतात. ज्या भाषेत तुम्ही अनुवाद करताय, त्या भाषेवर तुमची पूर्ण हुकूमत असली पाहिजे, जेणेकरून शब्दांचा अचूक वापर करता येईल. थोडक्यात सांगायचं तर, दोन्ही भाषांची जाण असण्यासोबतच त्या विषयाची, तिथल्या संस्कृतीची आणि सभ्यतेची ओळख असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.”

त्यांनी आतापर्यंत वीसहून अधिक महत्त्वाची पुस्तकं अनुवादित केली आहेत आणि जागतिक तसंच भारतीय साहित्य एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

त्यांच्या गाजलेल्या अनुवादांमध्ये 'बेपनाह शादमानी की ममलकत' (अरुंधती रॉय यांची कादंबरी, २०१८), 'ये बसारत कुश अंधेरे' (ताहर बेन जेलौन यांची कादंबरी 'धिस ब्लाइंडिंग ॲब्सन्स ऑफ लाइट', २०२०), 'लाश की नुमाईश और दिगर इराकी कहानियाँ' (इराकी लेखक हसन ब्लासिम यांचा कथासंग्रह, २०१९) यांचा समावेश आहे.

याशिवाय अतिम रहिमी यांच्या 'संग-ए-सबूर' (२०१६), 'खाकसार ओ खाक' (२०१७) आणि 'ख्वाब और खौफ की हजार भूल भुलैयाँ' (२०२१) या कादंबऱ्याही त्यांनी अनुवादित केल्यात. त्यांनी धरमवीर भारती यांची 'सूरज का सातवाँ घोडा' ही गाजलेली हिंदी कादंबरी (२०१९), जॅक डेरिडा आणि मुस्तफा शरीफ यांच्यातील संवाद 'इस्लाम और मग़रिब' (२०२३), राल्फ रसेल यांचं आत्मचरित्र 'जोइंदा या बंदा' (२००५), तय्यब सालेह यांचं 'सीझन ऑफ मायग्रेशन टू द नॉर्थ' आणि विभूती नारायण राय यांचं 'हाशिमपुरा २२ मे' अशा एकापेक्षा एक सरस पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. समीक्षा सिद्धांतांवरचं त्यांचं 'नझारी डिस्कोर्स' हे अभ्यासपूर्ण पुस्तकही चांगलंच गाजलंय.

जागतिक साहित्य उर्दूत आणण्यासोबतच त्यांनी उर्दू साहित्याचा हिंदीत अनुवाद करण्यावरही विशेष लक्ष केंद्रित केलंय. त्यांनी जीम अब्बासी यांची उर्दू कादंबरी 'सिंधु' (२०२४), निवडक पाकिस्तानी लघुकथा, 'आज की पाकिस्तानी कहानियाँ' भाग १ आणि २ (२०२४), आणि इजिप्शियन लेखिका मिराल अल-तहावी यांची 'अल-खिबा' ही कादंबरी 'खेमा' या नावाने हिंदीत आणली.

जुन्या, अभिजात ग्रंथांचं संपादनही त्यांनी तितक्याच निष्ठेने केलंय. अठराव्या शतकातील दिल्लीचे कवी अहसानउल्ला खान बयान यांची 'दीवान-ए-बयान' (२००४) आणि मुन्शी बाल मुकुंद बे-सब्र यांची 'मसनवी लखत-ए-जिगर' (१९९९) यांसारख्या उर्दू साहित्यातील अभिजात कृतींचं त्यांनी आधुनिक तत्त्वांनुसार संपादन केलं. सारा शगुफ्ता यांच्या 'आँखें, नींद का रंग' (२०२२) या काव्यसंग्रहाचा त्यांनी हिंदी वाचकांसाठी अतिशय प्रभावी अनुवाद केला आहे.

"नक्कल करायलाही अक्कल लागते..."

एका अनुवादकाकडून नेमक्या काय अपेक्षा असतात, याबद्दल बोलताना त्या अगदी स्पष्टपणे सांगतात, "मूळ लेखनापेक्षा ते अधिक 'चांगलं' करण्याच्या नादात त्यात सुधारणा करण्याचा कोणताही अधिकार अनुवादकाला नसतो. मूळ लेखकाशी प्रामाणिक राहणं हीच त्याची पहिली जबाबदारी आहे. समोरचं लेखन हे एका वेगळ्या संस्कृतीचं आहे, याचं भान अनुवादकाने ठेवायलाच हवं." त्या स्वतः अनुवाद करताना कधीच वाक्यं गाळत नाहीत किंवा विनाकारण पदरचं काही जोडत नाहीत. स्पष्टीकरणाची गरज वाटलीच, तर त्या तळटिपांचा (Footnotes) आधार घेतात. आजकालच्या मशीन ट्रान्सलेशनबद्दल (तांत्रिक अनुवाद) विचारल्यावर त्या मिश्किलपणे म्हणतात, "नक्कल करायलासुद्धा अक्कल लागतेच ना!" तंत्रज्ञान अनुवादकांसाठी उपयुक्त नक्कीच आहे, पण भाषेला तो शेवटचा 'टच' देण्यासाठी नेहमीच प्रशिक्षित मानवी तज्ज्ञाची गरज भासेल, असं त्यांचं ठाम मत आहे.

उर्दू गझलमधील स्त्रियांची 'मूक' उपस्थिती

उर्दू कवितेतील स्त्रियांच्या स्थानाबद्दल बोलताना त्या एक अतिशय महत्त्वाचं निरीक्षण नोंदवतात. त्या म्हणतात की, "उर्दू गझलमध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणावर 'मूक' किंवा शांत दिसतात. पुरुषच त्यांच्याबद्दल बोलतात, त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि स्वतःच्याच चष्म्यातून त्यांच्याकडे पाहतात. कवितेत स्त्रीला कायम प्रेयसी, बेवफा किंवा उदासीन म्हणून रंगवलं जातं, पण तिच्या स्वतःच्या भावनांना कवींनी फार कमी वाव दिलाय. त्यांच्यासाठी स्त्री ही प्रेमाची किंवा रागाची केवळ एक वस्तू बनून राहिली आहे, अगदी एखाद्या लहान मुलाने खेळण्याशी वागावं तशी!”

कवितेचा आजवरचा संपूर्ण प्रवास हा मूलतः पुरुषप्रधान राहिला असून आजही साहित्यिक क्षेत्रात पुरुषांचंच वर्चस्व आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे. सरंजामी मानसिकतेत स्त्री घराच्या आत असेल तर तिला 'पवित्र' मानलं जातं आणि घराबाहेर पडली की ती केवळ मनोरंजनाचं साधन ठरते. ही संस्कृती आजही फारशी बदललेली नाही. स्त्रीकडे फक्त सौंदर्याचं प्रतीक म्हणून न पाहता एक 'माणूस' म्हणून पाहिलं पाहिजे, यावर त्यांचा भर असतो.

त्यांच्या मते, "स्त्रीवादी साहित्याचा मुख्य उद्देश हीच मुकता भंग करणं हा आहे." जेव्हा एखादी स्त्री लिहिते, तेव्हा तिचे अनुभव पुरुषांच्या अनुभवांपेक्षा साहजिकच वेगळे असतात; त्यामुळे ते तपासण्याचे समीक्षेचे निकषही वेगळे असायला हवेत. ज्या लेखकांनी स्त्रियांना खऱ्या अर्थाने 'माणूस' म्हणून चित्रित केलंय, त्यांचं त्या भरभरून कौतुक करतात. त्यांच्या 'तानिसी मुतालेआ और दुसरे मजमीन' (२०१५) या पुस्तकात त्यांनी स्त्रीवादाकडे 'पाश्चात्य सिद्धांत' म्हणून न पाहता उर्दू भाषा आणि साहित्याच्या विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात पाहिलंय. महिला लेखिकांनी पारंपारिक चौकटी मोडून आपल्या ओळखीबद्दल आणि समस्यांबद्दल निर्भीडपणे लिहावं, असं आवाहन त्या करतात.

अध्यापन आणि शैक्षणिक योगदान

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अंजुमन आरा दिल्ली विद्यापीठाच्या उर्दू विभागात ज्ञानदानाचं काम करत आहेत. उर्दू साहित्य पारंपारिक पद्धतीने शिकवण्यापेक्षा आधुनिक समीक्षात्मक चौकटीत शिकवणं त्यांना जास्त भावतं. एम.ए.च्या विद्यार्थ्यांना त्या अठराव्या शतकातील दिल्लीची कविता, इक्बाल यांचा अभ्यास आणि प्रगतशील चळवळ यांसारखे विषय शिकवतात. तर एम.फिल. आणि पीएचडीच्या संशोधकांना त्या संशोधन पद्धती आणि साहित्याचं समाजशास्त्र यांसारख्या विषयांत मार्गदर्शन करतात. आज विद्यापीठात येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना वाचन-लेखनातच रस उरला नाही, केवळ बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी अभ्यासाबद्दल गंभीर आहेत, याची त्यांना खंत वाटते. "विद्यार्थ्यांनी त्यांच्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबद्दल नेहमी जागरूक राहायला हवं," असं त्यांना वाटतं.

'इग्नू' (IGNOU) आणि 'एनसीईआरटी' (NCERT) सारख्या संस्थांसाठी अभ्यासक्रम विकसित करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. याशिवाय त्या वैचारिक लेखही लिहितात. त्यांचा 'मेमरीज ऑफ राल्फ रसेल' हा लेख विशेष उल्लेखनीय आहे. त्यात त्यांनी अनुवादादरम्यान राल्फ रसेल यांच्याशी झालेल्या भेटींच्या आठवणी जागवल्या आहेत. त्यांचे 'साहिर के सरोकार', 'क्लासिकी गझल पढने से पहले', 'विचारधारा, भाषा और साहित्य' आणि 'मीर : एक शख्स और उसका अहद' असे अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत.

वाचकवर्गाचा प्रश्न आणि बदलती दिशा

गेल्या दोन वर्षांपासून त्या उर्दू ऐवजी हिंदीत अनुवाद करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे उर्दूमधील वाचकवर्गाची वानवा. त्या थोड्याशा निराशेने म्हणतात, "माझ्या उर्दू अनुवादावर चर्चा करणारे वाचक मला क्वचितच भेटतात. याउलट, सारा शगुफ्ता यांच्या कवितांच्या हिंदी अनुवादाला हिंदी वाचकांकडून अक्षरशः उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला." याच अनुभवातून त्यांना 'जिवंत भाषा' म्हणजे नक्की काय, हे उमजलं. “अनुवादाच्या आणि देवनागरी लिपीच्या माध्यमातून आज लोक उर्दू साहित्य मोठ्या प्रमाणावर वाचत आहेत आणि त्यावर भरभरून चर्चाही करत आहेत.”

आपल्या लेखन आणि अनुवादाच्या माध्यमातून अंजुमन आरा हिंदी आणि उर्दू मधील एक भक्कम भाषिक दुवा म्हणून काम करत आहेत. चांगला अनुवादक शब्दांचं भाषांतर तर करतोच पण त्याचबरोबर तो एका संस्कृतीची दुसऱ्या संस्कृतीशी सुंदर ओळख करून देत असतो, हीच गोष्ट त्यांच्या या अफाट कार्यावरून अधोरेखित होते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter