Mother's Day : इस्लाममधील मातृत्वाचा गौरव आणि 'ती'च्या व्यापक संकल्पना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इमान साकिना

इस्लाममध्ये आईच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. प्रेषितांनी म्हटल्याप्रमाणे, आईच्या पायाखाली स्वर्ग असतो... हे केवळ अलंकारिक विधान नसून आईची सेवा, आदर आणि काळजी घेणे हाच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग असल्याचे इस्लाम सांगतो. कुराणमध्येही अनेक ठिकाणी ईश्वराच्या ईबादतनंतर लगेचच आई-वडिलांशी दयाळूपणे वागण्याची आज्ञा दिली आहे. यावरून स्पष्ट होते की आईचा सन्मान श्रद्धेचा एक अविभाज्य भाग आहे.

आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे. ती अंतर्मन घडवते, चारित्र्य निर्माण करते आणि कुटुंब व समाजात श्रद्धेचा पाया रचते. इस्लामने मातेच्या शारीरिक आणि भावनिक त्यागाची मुक्तकंठाने दखल घेतली आहे. कुराणमध्ये गर्भधारणेचे कष्ट, प्रसूती वेदना आणि मुलांच्या संगोपनासाठी घेतलेल्या कष्टांचे वर्णन आहे. हे कष्ट दुर्लक्षित केलेले नाहीत, तर त्यांचा गौरव केला आहे.

इस्लाममध्ये मातृत्वाचा आदर केवळ वरवरचा नाही. तिच्या रात्रीच्या जागरणांमुळे, काळजीमुळे आणि सतत काहीतरी देण्याच्या वृत्तीमुळे हा आदर दिला जातो. म्हणूनच आईबद्दल कृतज्ञता बाळगणे हा पर्याय नसून ते एक नैतिक कर्तव्य आहे.

इस्लामच्या आध्यात्मिक विणकामात मातृत्व केवळ जीवशास्त्रापुरते मर्यादित नाही. याला आध्यात्मिक माता असा एक वेगळा पैलू आहे. या अशा महिला आहेत ज्या मने घडवतात, आत्म्याला मार्गदर्शन करतात आणि श्रद्धा वृद्धिंगत करतात. या महिलांनी कदाचित मुलांना जन्म दिला नसेल, तरीही त्या विश्वास, चारित्र्य आणि नैतिक स्पष्टता यांसारख्या सखोल गोष्टींना जीवनदान देतात.

इस्लामच्या विचारधारेत संगोपन म्हणजे केवळ शारीरिक काळजी घेणे नव्हे. यात 'तरबियाह' म्हणजेच व्यक्तीच्या आंतरिक आणि बाह्य स्वरूपाचा सर्वांगीण विकास अभिप्रेत आहे. आध्यात्मिक माता या सखोल संगोपनासाठी आपले आयुष्य खर्च करतात. त्या संयमाने शिकवतात, शहाणपणाने चुका सुधारतात आणि केवळ अल्लाच्या प्रीतीसाठी निस्वार्थ प्रेम करतात.

अशा स्त्रिया प्रत्येक पिढीत पाहायला मिळतात. त्या शिक्षिका, मार्गदर्शक, मोठ्या बहिणी, विदुषी किंवा कुटुंबातील अशा शांत व्यक्ती असू शकतात ज्यांचा प्रभाव दिसण्यापेक्षा जास्त जाणवतो. त्यांचा प्रभाव कदाचित खूप मोठा नसेल, पण तो कायमस्वरूपी असतो.

इस्लाममधील आध्यात्मिक मातृत्वाचे सर्वात स्पष्ट उदाहरण म्हणजे प्रेषितांच्या पत्नींना दिलेली 'उम्माहत अल-मुमिनीन' म्हणजेच 'मोमिनांच्या माता' ही पदवी होय. ही पदवी केवळ प्रतीकात्मक नव्हती. त्यातून मुस्लीम समुदायासोबतचे एक अर्थपूर्ण नाते दिसून येते. त्या विश्वासूंच्या जन्मदात्री नव्हत्या, तरीही त्यांनी संपूर्ण उम्मतला शिकवले, मार्गदर्शन केले आणि त्यांचे संगोपन केले. आपल्या ज्ञान, चारित्र्य आणि बलिदानातून त्यांनी असंख्य लोकांचे आध्यात्मिक जीवन घडवले.

सर्वच आध्यात्मिक माता सार्वजनिक व्यासपीठावर वावरणाऱ्या नसतात. त्या आपल्या आजूबाजूला घरांमध्ये, वर्गांमध्ये आणि सामाजिक वर्तुळात असतात. इतरांना प्रार्थनेची आठवण करून देणाऱ्या, कोणालाही न पारखता शांतपणे ऐकून घेणाऱ्या, प्रामाणिक सल्ला देणाऱ्या आणि स्वतःच्या उदाहरणातून नेतृत्व करणाऱ्या या स्त्रिया असतात.

कुटुंबातील ज्येष्ठ महिलेकडून जेव्हा एखादी मुलगी नम्रता, संयम किंवा प्रामाणिकपणा शिकते, तेव्हा तो प्रभाव तिच्यासोबत आयुष्यभर राहतो. शिक्षिकेच्या सचोटीने प्रेरित झालेली विद्यार्थिनी आपल्या भविष्याचा मार्ग बदलू शकते. या कृती लहान वाटत असल्या तरी त्या परिवर्तनाचे बीज पेरतात.

हे सांगण्याचा उद्देश जन्मदात्री मातेची भूमिका कमी लेखणे असा अजिबात नाही. उलट इस्लाममध्ये 'माता' असण्याचा नेमका अर्थ काय, याची व्याप्ती वाढवणे हा आहे.

आजच्या आधुनिक काळात व्यक्तिवाद आणि धावपळीच्या जीवनामुळे आध्यात्मिक काळजी घेण्याची कल्पना मागे पडत आहे. मात्र आज आध्यात्मिक मातांची गरज पूर्वीपेक्षा जास्त आहे. तरुण पिढी मार्गदर्शनाच्या शोधात आहे, समुदायांमध्ये दुरावा वाढत आहे आणि अनेकांना आधाराची गरज आहे. ही संकल्पना पुनरुज्जीवित करणे म्हणजे अशा भूमिका बजावणाऱ्या महिलांना ओळखणे आणि त्यांचा सन्मान करणे होय. महिलांनी एकमेकींना स्पर्धेतून नव्हे, तर करुणा आणि सामायिक हेतूने आधार देणारी संस्कृती निर्माण करणे आवश्यक आहे.

जन्मदात्री माता पुढच्या पिढ्यांना मागे ठेवते. आध्यात्मिक माता असे मार्गदर्शन मागे ठेवते जे आयुष्यभर टिकते. एखादा मायेचा शब्द, प्रामाणिकपणे दिलेली शिकवण किंवा दिलेला योग्य सल्ला एखाद्याच्या जीवनात अनेक दशके घुमत राहतो. शेवटी इस्लाम आपल्याला हेच शिकवतो की खरे यश केवळ स्वतःसाठी काय मिळवले यात नसून इतरांसाठी आपण काय ठेवून जातो यात आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter