Raje Shivaji चित्रपटामध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेश देशमुखने सांगितला पडद्यामागचा रंजक किस्सा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 53 m ago
राजे शिवाजी या चित्रपटातील प्रसंग
राजे शिवाजी या चित्रपटातील प्रसंग

 

सलमान खानने स्वतः राजे शिवाजी चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे रितेश देशमुखने सांगितले आहे. सलमानचा आग्रह पाहून रितेशने या चित्रपटात एक विशेष भूमिका तयार केली, जी सलमानच्या स्टारडमला साजेशी ठरेल.

१ मे रोजी प्रदर्शित झालेला हा ऐतिहासिक चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. रितेश देशमुखने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली आहे. स्शिवाय त्याने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे.

सलमानचा खास कॅमिओ

'राजे शिवाजी'मध्ये सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे. त्याने प्रतापगडच्या युद्धात महाराजांना प्राणांवर बेतलेल्या संकटातून वाचवणाऱ्या वीर जिवा महाला यांची भूमिका साकारली आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रितेश म्हणाला, "सलमान मला म्हणाला की, त्याला या चित्रपटात काम करायचे आहे. खरं तर मी आधी असा विचार केला नव्हता, पण तो हट्टाने म्हणाला, 'तू माझ्याशिवाय हा चित्रपट बनवूच शकत नाहीस, मला यात काम करायचंच आहे'. मी त्याला थोडा वेळ मागून घेतला, कारण जर सलमान खान पडद्यावर येणार असेल, तर त्याची भूमिकाही तोडीची हवी. प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे."

व्यक्तिरेखेवर दिला भर

रितेशने स्पष्ट केले की, त्याला सलमानला पडद्यावर केवळ 'सलमान खान' म्हणून दाखवायचे नव्हते. "मला तो एका पात्राच्या रूपात हवा होता. ते पात्र सलमान खानपेक्षा मोठे वाटायला हवे होते आणि चाहत्यांचे मनोरंजनही व्हायला पाहिजे होते. मग आम्हाला ही भूमिका सुचली. मला खात्री होती की यासाठी एक कडक संवाद हवा. पुढे तो सीन जेव्हा पडद्यावर आला आणि लोकांपर्यंत पोहोचला, तेव्हा तो वसूल झाल्याचे समजले." असे रितेशने आवर्जून सांगितले.

यापूर्वी सलमानने रितेशच्या 'वेड' (२०२२) या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटात एका गाण्यात हजेरी लावली होती. तसेच रितेशच्या पहिल्या मराठी चित्रपटात म्हणजेच 'लय भारी'मध्येही तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.

तगडी स्टारकास्ट 

'राजे शिवाजी'मध्ये कलाकारांची मांदियाळी आहे. यात संजय दत्तने अफजल खान, अभिषेक बच्चनने संभाजी शहाजी भोसले, विद्या बालनने बडी बेगम, फदीर्न खानने मुघल सम्राट शहाजहान आणि अमोल गुप्ते यांनी आदिल शहा यांची भूमिका साकारली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील हे सर्व मित्र केवळ प्रेम आणि आदरापोटी या चित्रपटात सामील झाले असून त्यांनी यासाठी एक पैसाही मानधन घेतलेले नाही, असे रितेशने सांगितले. तो म्हणाला, "आमच्यातील हे नाते शब्दांत मांडणे कठीण आहे. हे एक बिनशर्त प्रेम आणि एकमेकांबद्दल असलेला आदर आहे. उद्या जर अभिषेक किंवा सलमान भाऊने मला एखादे काम सांगितले, तर मी विचार न करता 'हो' म्हणेन. असा आमचा एकमेकांवर विश्वास आहे."

रितेशने आठवण करून दिली की, या चित्रपटासाठी त्याने सर्वात आधी अभिषेक बच्चनला विचारले होते आणि अभिषेकने आपली भूमिका काय आहे, हे न विचारताच चित्रपटाला होकार दिला होता. "गेल्या २३ वर्षांच्या प्रवासात मी हेच प्रेम आणि आदर कमावला आहे. या सर्वांनी या चित्रपटाचा भाग होण्यासाठी कोणतेही मानधन घेतले नाही, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे."

"सलमान खान, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी, जेनेलिया आणि मी स्वतः, आम्ही सर्वांनी या चित्रपटासाठी विनामूल्य (प्रो बोनो) काम केले आहे," असे रितेशने नमूद केले.

बॉक्स ऑफिसवरील कमाई

'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत मिळून देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५२.६६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपटात महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री आणि जितेंद्र जोशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'जिओ स्टुडिओज'ने हा चित्रपट सादर केला असून ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी 'मुंबई फिल्म कंपनी'च्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter