भक्ती चाळक
आजकाल देशाच्या कानाकोपऱ्यातून मन खिन्न करणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. कुठे केवळ विशिष्ट धर्म असल्यामुळे कोणाला जेवण नाकारले गेले, तर कुठे नाव आणि धर्म विचारून भेदभाव केला गेला. अशा द्वेषापूर्ण वातावरणात महाराष्ट्रातील भिवंडी शहरातून काळजाला भिडणारी घटना समोर आली आहे. निमित्त होते ते नीट (NEET) परीक्षेचे.
नीट परीक्षेदरम्यान भिवंडीत सामाजिक एकात्मतेचे एक अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. आपल्या लाडक्या मुलांच्या सोबतीने आलेल्या पालकांच्या सुविधेसाठी शहरातील मस्जिदी, मुस्लिम समाजाच्या निवासी कमिटी आणि सामाजिक संस्थेने आपले दरवाजे सर्व धर्मीयांसाठी आनंदाने उघडे केले होते.
परीक्षा केंद्रांच्या बाहेर कडक ऊन, अंगाची लाहीलाही करणारी गर्मी आणि अनेक तास चालणारी प्रतीक्षा यामुळे पालक हैराण झाले होते. ही परिस्थिती पाहून स्थानिक मुस्लिम संघटनांनी पालकांसाठी विशेष सोय केली. लोकांच्या बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. पंखे आणि कुलरने सुसज्जित असलेली हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचसोबत पिण्यासाठी थंड पाणी, चहा, नाश्ता, ज्यूस आणि इतर सर्व जरूरी सहूलियत अगदी मोफत पुरवण्यात आल्या.
या सुंदर मोहिमेचा फायदा शेकडो पालकांना मिळाला. कडक उन्हात रस्त्याच्या कडेला ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून त्यांची सुटका झाली. मुलांची परीक्षा संपेपर्यंत आपल्याला एक सुरक्षित आणि हक्काची जागा मिळाली, ही आमच्यासाठी खूप मोठी मदत होती, अशा भावना अनेक पालकांनी व्यक्त केल्या.
या संपूर्ण आयोजनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. सेवाभावी उद्देशाने लोक काम करत होते. वेगवेगळ्या धर्माचे आणि जातींचे लोक या सुविधेचा लाभ या मस्जिदमध्ये घेताना दिसले. आपल्या मुलांसोबत आलेल्या महिलांची संख्या मोठी होती, त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
पालकांच्या मनातील कृतज्ञता
या व्यवस्थेचा लाभ घेतलेल्या अंबरनाथ येथील महिला उद्योजिका प्रिया कुंवर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, "येथील व्यवस्था खरोखर खूपच सुंदर आहे. आम्हाला इथे आल्यावर आपुलकीचे आदरातिथ्य मिळाले. मी अगदी मनापासून सर्वांचे आभार मानते! अडचणीच्या काळात आधाराची गरज असते आणि तो आधार आम्हाला इथे मिळाला"
ठाणे शहरातून आलेल्या ज्योती शर्मा यांनी आपला मागील कटू अनुभव सांगत भिवंडीतील या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. "मी ठाण्यावरून आले आहे. मागच्या वेळी जेव्हा 'नीट'ची परीक्षा झाली होती, तेव्हा वाशीला केंद्र आले होते. त्यावेळचा अनुभव सांगायचा तर, माझे मिस्टर गेले होते, पण त्यांनी फक्त मुलीला तिथे सोडले आणि ते लगेच परत आले. कारण तिथे पालकांसाठी बसण्याची किंवा थांबण्याची अशी कोणतीच व्यवस्था नव्हती. पण आज जेव्हा आम्ही चौघे जण इथे आलो आणि त्यातही पाऊस सुरू झाला, त्यामुळे काळजी वाढली होती."
त्या पुढे म्हणाल्या, "आम्ही सगळे इथे उभे राहून रस्ता पाहत होतो की मुलगी आत कशी जाईल, पुढे काय होईल. आम्ही या कडक उन्हात कसे थांबणार, ही चिंता सतावत होती. पण इथे येताच आमची ती सगळी काळजी दूर झाली. इथे आम्हाला शमा नावाची एक गोड स्वयंसेवक मुलगी भेटली. तिने आमची खूप आपुलकीने विचारपूस केली. आधी त्यांनी आम्हाला पिण्यासाठी पाणी दिले, नंतर जेवणाची आणि ज्यूसचीही उत्तम व्यवस्था केली. इतकेच नाही तर आमच्या विश्रांतीसाठी त्यांनी गाद्या अंथरलेली एक स्वतंत्र खोली दिली, जेणेकरून आम्हाला संध्याकाळपर्यंत कोणताही त्रास होणार नाही."
शेवटी कृतज्ञता व्यक्त करताना ज्योती म्हणतात की, "खरोखर माझ्यासाठी हा अगदी अनोखा अनुभव आहे. माणुसकीचे खरे रूप आज मला इथे पाहायला मिळाले, जे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. आमच्या मनात जी भीती आणि संकोच होता, तो सगळा इथे आल्यावर क्षणात दूर झाला. इथे खऱ्या अर्थाने बंधुभाव पाहायला मिळाला. हा अनुभव मी आणि माझी मुलगी आयुष्यात कधीच विसरणार नाही. तुम्ही लोक जी सेवा करत आहात, ती अशीच पुढे चालू ठेवा, जेणेकरून समाजात माणुसकी आणखी वाढेल आणि सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतील."
कल्याणवरून आलेल्या आरती रानडे यांनी दीनियात मदरशातील आदरातिथ्याबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, "मुलांच्या परीक्षेसाठी आलेले सगळे पालक दीनियात मदरशामध्ये बसले. तिथे आमची सगळ्यांची खूप काळजी घेतली. पिण्याच्या पाण्यापासून ते जेवण, चहा-नाश्त्याची सगळी सोय त्यांनी केली. तेथील सगळे स्वयंसेवक अत्यंत नम्रपणे बोलत होते."
केलेल्या आदरातिथ्यबद्दल आभार मानताना आरती म्हणाल्या की, "तुम्ही हे पुण्याचे काम केले आहे, ते पुढेही चालू ठेवा. कोणतीही छोटी-मोठी परीक्षा असो, पालकांना अशीच मदत करत राहा. ईश्वराचा वरदहस्त तुमच्यावर नेहमी राहील. आम्हा सर्व मातांचे आशीर्वाद आणि दुवा तुमच्या पाठीशी आहेत. तुमचे नेहमी चांगलेच होईल."
या संपूर्ण उपक्रमाबद्दल मस्जिदच्या प्रतिनिधींनी मोलाचे विचार मांडले. प्रेषितांनी आपल्याला हीच शिकवण दिली आहे, असे सांगत त्यांनी मशिदीचे दरवाजे नेहमीच सेवेसाठी उघडे असल्याचे स्पष्ट केले. प्रतिनिधी म्हणाले की, "अल्हम्दुलिल्लाह, हे आमचे भाग्य आहे आणि आमच्या संस्थेसाठी आम्ही याला सुवर्णसंधी समजतो. आम्हाला पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. माणुसकी आणि सेवेमुळेच माणसाचे नाव जगाशी जोडले जाते. अल्लाहने आणि प्रेषितांनी आपल्याला हीच तालीम दिली आहे."
ते पुढे म्हणाले की, "या संधीचा आमच्या मस्जिदच्या सर्व जबाबदार सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पुरेपूर लाभ घेतला. सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. पालकांनी इथे येऊन या सुविधेचा लाभ घेतल्याचा आम्हाला आनंद आहे. ते सर्व खूप खूश झाले आणि त्यांच्या आनंदाने आमची संपूर्ण टीम सुखावली."
मस्जिदच्या प्रतिनिधींनी त्यांच्या इतर समाजकार्याविषयी बोलताना सांगितले की, "ही मदत केवळ परीक्षा पुरती किंवा एका दिवसापुरती मर्यादित नाही. आमच्या संस्थेमध्ये हा सेवेचा यज्ञ अव्याहत सुरू असतो. अशा कोणत्याही सामाजिक कामासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आमच्या संस्थेत याच पद्धतीने निरंतर काम सुरू असते. आमचे मोहल्ला क्लिनिक आहे. इथे रोज संध्याकाळी अत्यंत नाममात्र पैशांमध्ये लोकांना औषधोपचार दिला जातो. कोणताही धर्म, जात किंवा पंथाचा भेदभाव न करता प्रत्येक रुग्णावर इथे उपचार केले जातात. जे लोक हे नाममात्र पैसे देण्यासही सक्षम नसतात, त्यांच्यासाठी संपूर्ण उपचार मोफत केला जातो."
ते पुढे म्हणाले की, "याशिवाय कौन्सिलिंगसाठी आमचे दारुल कझा केंद्र आहे. त्यामाध्यमातून कौटुंबिक आणि सामाजिक वाद सोडवले जातात. समाजात कधीही कोणतीही आपत्ती किंवा अडचण आली, तर मदतकार्य करण्यासाठी आमचे स्वयंसेवक धावून जातात. गरजू लोकांना अन्नाच्या पाकीटांचे वाटप केले जाते. आम्ही नेहमीच अशा संधीच्या शोधात असतो, जिथून आम्हाला लोकांची सेवा करता येईल."