मुंबई,
या महिन्याच्या अखेरीस साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदसाठी मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) शहरातील १०९ निश्चित ठिकाणांवर धार्मिक कुर्बानीला (Animal Slaughter) परवानगी दिली आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर पालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नागरिक या १०९ निश्चित ठिकाणांवर किंवा अन्य ठिकाणी कुर्बानीसाठी २८ ते ३० मे या कालावधीत 'MyBMC' या मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे परवानगी मिळवू शकतात.
प्रशासनाची जय्यत तयारी
२८ मे रोजी बकरी ईद साजरी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील तयारी सुरू केली आहे.
"१७ ते ३० मे या कालावधीत देवनार कत्तलखान्यात म्हशी आणि बकऱ्यांचा बाजार भरवला जाईल. पालिकेच्या धोरणानुसार, म्हशींची धार्मिक कुर्बानी केवळ देवनार कत्तलखान्यातच करता येईल. तसेच, म्हशी आणि बकऱ्यांच्या आयातीचा परवाना आणि स्लॉट बुकिंगसाठी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर 'आधी येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वावर ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली आहे." असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हेल्पलाइन आणि आपत्कालीन व्यवस्था
सण-उत्सवाच्या काळात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष (Control Room) कार्यरत असेल, ज्यासाठी विशेष हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
देवनारमध्ये भव्य व्यवस्था
महापालिकेने देवनार येथे जनावरांच्या निवाऱ्यासाठी सुमारे १.१० लाख चौरस मीटर जागेची व्यवस्था केली आहे. याशिवाय म्हशींच्या धार्मिक कुर्बानीसाठी १०,००० चौरस मीटरचे स्वतंत्र क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. पालिकेने या ठिकाणी अतिरिक्त पाणीपुरवठा, आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका, पशुवैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेचे नियोजन केले आहे.
स्वच्छता आणि सुरक्षिततेवर भर
१५ दिवसांच्या या कालावधीत देवनार कत्तलखाना आणि आसपासच्या परिसरातून सुमारे ७,५०० मेट्रिक टन कचरा साफ होण्याचा अंदाज आहे. यासाठी दररोज २०० हून अधिक स्वच्छता कामगार आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री तैनात केली जाणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने देवनार परिसरात ५०० पोलीस कर्मचारी, २०० महापालिका सुरक्षा रक्षक आणि ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे तैनात करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter