काश्मीर: बासित जरगर
उत्तर काश्मीरमधील गांदरबलच्या तुलामुला गावात माता खीर भवानीचे मंदिर आहे. 'ज्येष्ठ अष्टमी'च्या वार्षिक उत्सवासाठी भारताच्या विविध भागांतून हजारो काश्मिरी पंडित या मंदिरात एकत्र आले आहेत. चिनारच्या झाडांनी सजलेले हे मंदिर त्या समाजाची जिद्द आणि त्यांच्या भूमी व संस्कृतीशी असलेल्या नात्याचे मोठे प्रतीक मानले जाते.

'ज्येष्ठ अष्टमी' हा संवत दिनदर्शिकेच्या तिसऱ्या महिन्यातील आठवा दिवस आहे. हा देवीवरील (शक्ती, स्त्री देवता) भक्तीचा मोठा उत्सव आहे. येथे देवी माता 'राज्ञा' स्वरूपात विराजमान आहे.
मंदिरात जाण्याच्या, चिनारच्या सावलीत रात्र घालवण्याच्या आणि देवीला दिवे अर्पण करण्याच्या गोड आठवणी नसलेला काश्मिरी पंडित क्वचित कुणी असेल. देवीचे हे छोटेसे मंदिर एका झऱ्याच्या मध्यभागी उभे आहे. या झऱ्याच्या पाण्याचा रंग बदलतो. तो हिरव्यावरून आकाशी, लाल आणि अगदी काळाही होतो.

'नाग' (झरा) या झऱ्याच्या पाण्याचे रंग देवीच्या विविध भावना दर्शवतात, असा काश्मिरी लोकांचा समज आहे. अनेक दशकांपूर्वी भाविक संध्याकाळची आरती करत होते. त्यावेळी 'नाग'चे पाणी राखाडी काळे झाले. श्रीनगरच्या 'महाराजगंज' या एका मोठ्या घाऊक बाजाराला आग लागल्याचे नंतर स्पष्ट झाले. तिथे लाखो रुपयांचा माल आणि मालमत्ता जळून खाक झाली होती. आग विझवल्यानंतरच 'नाग'च्या पाण्याला पुन्हा निळा रंग आला.
हे एक हिंदू मंदिर असले तरीही स्थानिक मुस्लिमही 'मेज भवानी' देवीप्रती आदर राखून आहेत. स्थानिक मुस्लिम लोक हिंदू भाविकांसाठी मंदिरात फुले, दिवे आणि दुधाच्या बाटल्या विकतात.
दहशतवादाच्या काळात तुलामुला येथील हिजबुल मुजाहिदीनच्या एका स्थानिक कमांडरने सर्व संघटनांना एक इशारा दिला होता, अशी माहिती आहे. मंदिरावर हल्ला करू नका, असे त्याने बजावले होते. सुरुवातीला मंदिरावर डागलेली काही रॉकेट्स मंदिराच्या आधीच पडली. पण दहशतवाद्यांनी मंदिराला कोणताही धक्का लावला नाही.

हा दिवस काश्मिरी पंडित समाजासाठी सर्वात महत्त्वाच्या आणि पवित्र सणांपैकी एक आहे.
"भवानी माता की जय" च्या घोषणांनी आणि हिंदू-मुस्लिम एकतेच्या मजबूत भावनेने तिथले वातावरण भारावून गेले होते. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा या वार्षिक जत्रेला उपस्थित राहणाऱ्या भाविकांची संख्या वाढलेली आहे. सूर्योदयापर्यंत मंदिर परिसर आणि पवित्र झरा भाविकांनी गजबजून गेला होता. भाविक राज्ञा देवीला दूध आणि तांदळापासून बनवलेली 'खीर' अर्पण करत होते. अनेक लोक श्रीनगर, जम्मू, दिल्ली आणि इतर राज्यांतून रात्रभर प्रवास करून पोहोचले होते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पण स्वयंसेवक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांची हालचाल सुरक्षित आणि सुरळीत ठेवली.
"हे आमचे वार्षिक घरवापसीचे पर्व आहे. तुलामुला आम्हाला आमच्या कुटुंबासारखे वाटते. इथले मुस्लिम बांधव आम्हाला सर्व व्यवस्था करण्यासाठी मदत करतात, पाणी देतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात," असे जम्मूहून प्रवास करून आलेल्या रमेश कौल या भाविकाने सांगितले.

जम्मू-काश्मीर पोलीस, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि वाहतूक पोलिसांनी अनेक स्तरांची सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे गर्दीवर लक्ष ठेवले जात होते. या सर्व गोष्टीत तुलामुलाचा प्रसिद्ध बंधुभाव विशेष उठून दिसत होता. स्थानिक मुस्लिम रहिवाशांनी भाविकांसाठी आपल्या घराची दारे उघडी केली होती. त्यांनी मोफत चहाचे स्टॉल लावले होते आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यातही मोठी मदत केली.
"आमच्या पूर्वजांनी या मंदिराचे रक्षण केले आहे. खीर भवानी हे 'काश्मीरियत'चे सर्वात शुद्ध रूप आहे," असे भाविकांना पाणी वाटप करणारा तुलामुला येथील स्थानिक नागरिक बिलाल अहमद याने अभिमानाने सांगितले.