श्रीनगरमधील 'बुलबुल शाह' दर्गा; काश्मीरमधील पहिल्या खानकाहचा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 39 m ago
श्रीनगर: काश्मीरमधील पहिले सुफी संत बुलबुल शाह यांच्या ऐतिहासिक दर्ग्याची वास्तू.
श्रीनगर: काश्मीरमधील पहिले सुफी संत बुलबुल शाह यांच्या ऐतिहासिक दर्ग्याची वास्तू.

 

एहसान फाजिली, श्रीनगर

श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातल्या अरुंद गल्ल्यांमधून जुन्या आणि नव्या वास्तूंची रांग पाहायला मिळते. या वास्तू एकेकाळच्या गजबजलेल्या रस्त्याची आठवण करून देतात. नवाकदल पुलापासून ५० यार्ड अंतरावर काश्मीरचे पहिले सुफी संत सय्यद शर्फ-उद्-दिन अब्दुर रहमान यांच्या लोकप्रिय दर्ग्याकडे रस्ता जातो. हे संत 'बुलबुल शाह' या नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहेत. झेलम किंवा व्यथ नदीच्या उजव्या तीरावर हा दर्गा वसलाय. सुफी संतांच्या नावावरून या ठिकाणाला 'बुलबुल लंकर' असं नाव दिलंय. धार्मिक शिकवण आणि आश्रमाचा भाग म्हणून १४ व्या शतकाच्या सुरुवातीला तिथे पहिल्यांदा लंगर सुरू झाला होता.

अनेक दशकांपासून हा दर्गा प्रामुख्याने स्थानिक लोकांना आकर्षित करतोय. तुर्कस्तानहून आलेले सय्यद शर्फ-उद्-दिन ऊर्फ बुलबुल शाह यांच्या स्मरणार्थ काश्मीरमध्ये बांधलेली ही पहिली खानकाह मानली जाते. इस्लामच्या शिकवणीसाठी काश्मीरला भेट देणारे ते पहिले सुफी संत होते. आध्यात्मिक भक्तीचं सक्रिय आणि आदरणीय केंद्र म्हणून याकडे पाहिलं जातं. नवाकदल इथल्या शासकीय महिला महाविद्यालयाच्या अगदी तिरप्या दिशेने पुलापलीकडे हा दर्गा आहे. याच ठिकाणी एकेकाळी तत्कालीन शासक रिंचन शाह यांचा राजवाडा होता. नवाकदल इथून सुरू होणारी अरुंद गल्ली बुलबुल शाह यांच्या दर्ग्याच्या पुढच्या बाजूने जाते आणि एस. आर. गुंजकडे पोहोचते. १८७१ मध्ये स्थापन झालेली ही ऐतिहासिक घाऊक बाजारपेठ असून ती सामान्यतः महाराज गुंज म्हणून ओळखली जाते.

शाह-ए-हमदान (मीर सय्यद अली हमदानी) यांच्या आधी ५९ वर्षं बुलबुल शाह काश्मीरमध्ये आले होते, असं दर्ग्याच्या व्यवस्थापन समितीतल्या एका ज्येष्ठ सदस्याने सांगितलं. खोऱ्यात इस्लामचा प्रसार करायला शाह-ए-हमदान यांच्या आधी तीन प्रमुख विद्वान आणि सुफी संत काश्मीरमध्ये आले. यात सुहरवर्दी पंथाचे बुलबुल शाह (सय्यद शर्फ-उद्-दिन अब्दुर रहमान), प्रदेशाची पाहणी करायला शाह-ए-हमदान यांनी आधी पाठवलेले सय्यद ताजुद्दीन आणि शाह-ए-हमदान यांचे दुसरे जवळचे सहकारी व दूत मीर सय्यद हसन सेमननी यांचा समावेश होता. दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला काळ्या संगमरवरी दगडातली नवीन पाटी बसवलीय. सुफी संतांचं आगमन आणि त्यांची काश्मीरमधली धार्मिक शिकवण यावर उर्दूमध्ये माहिती कोरलीय. सोबतच तिचं इंग्रजी भाषांतरही दिलंय.

त्यावर अशी माहिती लिहिलीय. बुलबुल शाह साहिब म्हणून प्रसिद्ध असलेले सय्यद शर्फ-उद्-दिन हे शाह नियामत-उल्ला फारसी यांचे शिष्य होते. आणि शाह नियामत-उल्ला फारसी हे शेख शिहाब-उद्-दिन सुहरवर्दी यांचे शिष्य होते. सय्यद शर्फ-उद्-दिन मूळचे तुर्कस्तानचे होते. आपल्या गुरूंच्या इच्छेनुसार राजा सहदेव (इ.स. १३०१-१३२०) याच्या राजवटीत ते काश्मीरमध्ये आले. सय्यद शर्फ-उद्-दिन हे काश्मीरचे पहिले ज्ञात सुफी संत आहेत. त्यांनी काश्मीरचा तत्कालीन बौद्ध शासक रिंचन शाह (इ.स. १३२०-१३२३) याला इस्लाम धर्म स्वीकारायला प्रवृत्त केलं. हे त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहायला रिंचन (नंतरचे सदर-उद्-दिन) याने त्यांच्या नावाने खानकाह बांधली. तसंच त्यासाठी करमुक्त जमीन दान केली. ही काश्मीरमधली पहिली खानकाह आहे. इथला लंगर इतका प्रसिद्ध झाला की त्यानंतर या वास्तूच्या परिसराला लोक 'बुलबुल लंकर' म्हणून ओळखू लागले.

इस्लामिक दिनदर्शिकेनुसार रजब महिन्याच्या ७ तारखेला बुलबुल शाह यांचा वार्षिक उरूस साजरा केला जातो. या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यात बहुतांश स्थानिक लोकांचा समावेश असतो. या दिवशी विशेष प्रार्थना आयोजित केली जाते आणि दुसऱ्या दिवशी मौलूदचा कार्यक्रम होतो. इस्लामिक दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या सातव्या दिवशीही दर्ग्यात विशेष प्रार्थना आयोजित केल्या जातात, अशी माहिती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओवेस करीम कानु यांनी दिली. या आणि इतर महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी शेकडो पुरुष आणि महिला भाविक दर्ग्यात एकत्र येतात. आयोजन (इंतजामिया) समिती देखभालीचं काम पाहते. कार्यक्रम, जेवणाची व्यवस्था, प्रवचनं आणि पवित्र खुणांचं प्रदर्शन या सर्व गोष्टींची जबाबदारी ही समिती सांभाळते. ही समिती मुलांसाठी मदरसा (दरसगाह) देखील चालवते. सध्या तिथे ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

पुरुष आणि महिला भाविक दररोज दर्ग्यात येऊन आपली श्रद्धा व्यक्त करतात. सुफी संतांच्या समाधीकडे (किंवा रोजाकडे) जायला महिलांसाठी वेगळा मार्ग बनवलाय. बुलबुल शाह यांच्या कबरीजवळ आणखी विद्वान आणि आध्यात्मिक गुरू मुल्ला मोहम्मद अहमद यांची कबर आहे. ते या संतांचे मामा आणि मार्गदर्शक होते. सुहरवर्दी पंथाशी आणि कौटुंबिक वारशाशी मूळ संबंध असलेलं उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरचं कुटुंब गेल्या वर्षी या दर्ग्यात आलं होतं, असं आयोजन समितीचे ज्येष्ठ सदस्य जावेद अहमद मट्टू यांनी सांगितलं. सुहरवर्दी पंथावरच्या निष्ठेपोटी भारतातल्या विविध भागांतून इतर अनेक लोकही या दर्ग्याला अधूनमधून भेट देतात, अशी माहिती इथे मिळते.

खानकाह-ए-बुलबुल शाह या वास्तूमध्ये तीन महत्त्वाचे भाग आहेत. मुख्य दर्ग्याचं बांधकाम राज्य सरकारच्या मदतीने झालं. या कामाला २००६ मध्ये सुरुवात झाली. यात बुलबुल शाह आणि त्यांच्या आध्यात्मिक गुरूंची समाधी आहे. झेलम नदीच्या दिशेने असलेल्या हिरवळीवर रिंचन शाह याची कबर आहे. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तो सदर-उद्-दिन या नावाने ओळखला जाऊ लागला. ही कबर आता घुमटासारख्या रचनेने झाकलीय. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, अभिलेखागार विभागाने (डिपार्टमेंट ऑफ आर्काइव्ह्ज) १९९० च्या सुमारास या कबरीचा शोध लावला. रिंचन शाह (सदर-उद्-दिन) याच्या राजवटीत बांधलेल्या मूळ खानकाहच्या जागेवर 'मशिद-ए-हन्फिया' नावाची जामा मशिद उभी आहे. खानकाहची यापूर्वीही अनेकदा पुनर्बांधणी झाली होती. मिळालेल्या अहवालांनुसार, गेल्या शतकात (२० व्या शतकात) एका आगीत तिचं मोठं नुकसान झालं होतं. आठ सदस्यीय इंतजामिया समितीचे ज्येष्ठ सदस्य अली मोहम्मद वानी जुन्या आठवणींना उजाळा देतात. माझ्या लहानपणी खानकाह आगीत जळून गेली होती. त्यावेळी आम्ही लहान मुलं या जागेच्या आजूबाजूला खेळायचो, असं ते सांगतात. तिथल्या शिलालेखावरच्या माहितीनुसार, बुलबुल शाह यांच्या स्मरणार्थ हिजरी सन ७२० (इ.स. १३२०) मध्ये पहिल्यांदा मशिद किंवा खानकाह बांधण्यात आली. मशिदीची (खानकाहची) सध्याची रचना हिजरी सन १३९९ म्हणजेच इ.स. १९७९ मध्ये उभारण्यात आली.

बुलबुल शाह यांचा जन्म १३ व्या शतकात उईघुर मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांनी शहाबुद्दीन सुहरवर्दी आणि सय्यद शाह नियामतुल्ला यांसारख्या प्रख्यात विद्वानांकडून सुफीवादाचं शिक्षण घेतलं. सुफी शिकवण आणि आचरणातून इस्लामचा प्रसार करण्याच्या उद्देशाने त्यांनी धर्मप्रसाराचं काम सुरू केलं. आध्यात्मिक आदेशानुसार त्यांनी इसवी सन १३०२ च्या सुमारास काश्मीरमध्ये प्रवेश केला, असं मानलं जातं. बुलबुल शाह यांचं इसवी सन १३२७ (हिजरी सन ७२६) मध्ये निधन झालं. त्यांना श्रीनगरमधल्या नवाकदलजवळच्या सध्याच्या बुलबुल लंकर इथे त्यांच्या खानकाहजवळ दफन करण्यात आलं.

त्यांना बुलबुल शाह का म्हटलं जातं, याबद्दल रंजक कथा सांगितली जाते. झेलम नदीच्या काठावर वजू (प्रार्थनेपूर्वीची स्वच्छता) करत असताना त्यांनी बुलबुल पक्षी (पर्शियन भाषेत बुलबुल) पाहिला, असं लोक सांगतात. या पक्ष्याचं उडणं आणि दिसेनासं होणं, हे त्यांच्या आत्म्याच्या आध्यात्मिक उत्थानाचं प्रतीक आहे, असा अर्थ त्यांच्या शिष्यांनी काढला. या घटनेनंतर त्यांनी अनुयायाला गूढ आध्यात्मिक अनुभव दाखवला, असं म्हटलं जातं. या सर्व गोष्टींमुळे ते 'बुलबुल शाह' म्हणून लोकप्रिय झाले.