काश्मीरमधील ऐतिहासिक खानकाह-ए-फैज पनाह; त्राल येथील सुफी वास्तूचे पुनरुज्जीवन अंतिम टप्प्यात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 d ago
त्राल: काश्मीरमधील ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वास्तू असलेली खानकाह-ए-फैज पनाह.
त्राल: काश्मीरमधील ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वास्तू असलेली खानकाह-ए-फैज पनाह.

 

एहसान फाजिली, श्रीनगर

मीर सय्यद अली हमदानी यांना समर्पित असलेली त्रालची खानकाह-ए-फैज पनाह खोऱ्यातल्या प्रमुख खानकाहांपैकी मानली जाते. सुफी संतांनी आपला मुलगा मीर मोहम्मद हमदानी याच्या मदतीने काश्मीर ते काशगरपर्यंत ५१ खानकाह बांधल्या होत्या. ही वास्तू त्यातलीच मानली जाते. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात श्रीनगरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर त्राल शहराच्या मध्यभागी ही खानकाह वसली आहे. मीर मोहम्मद हमदानी यांच्या देखरेखीखाली काश्मीर खोऱ्यात १६ खानकाह बांधल्या गेल्या. त्यापैकी काहींची उभारणी शाह-ए-हमदान यांच्यानंतर झाली. ही खानकाह याच १६ खानकाहांमध्ये गणली जाते.

 

सुलतान सिकंदरच्या काळात बांधलेली ही शतकानुशतकं जुनी वास्तू १६ डिसेंबर १९९७ रोजी रहस्यमय परिस्थितीत जळून खाक झाली. गेल्या तीन दशकातल्या अनेक अडथळ्यांनंतर आता याच्या पुनर्बांधणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाने २०२५ मध्ये या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं. बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. सय्यद दरख्शां अंद्राबी यांनी या नूतनीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला गती दिली. या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असं त्या सांगतात. सुरुवातीला जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाने हा प्रकल्प सुरू केला होता आणि 'जम्मू-काश्मीर प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन' (JKPCC) हे काम करत होती. पण पुनर्बांधणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने या प्रकल्पाला अनेक धक्के बसले.

 

१९९७ मध्ये लागलेली भीषण आग भाविकांच्या भक्तीच्या आड कधीच आली नाही. आजही शेकडो भाविक दररोज तिथे एकत्र येतात. तसंच वार्षिक उरूस आणि इतर महत्त्वाच्या धार्मिक प्रसंगी सुफी संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी हजारो लोक या पवित्र स्थानावर हजेरी लावतात. त्रालचे डॉ. निसार अहमद भट यांनी त्यांच्या 'आईना-ए-त्राल' या पुस्तकात या परिसराचा इतिहास, भूगोल, प्रमुख व्यक्ती आणि ठिकाणांची सविस्तर माहिती दिलीय. महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांऐवजी तिथे धु अल-हिज्जा (झिल हज) महिन्याच्या ६ तारखेला वार्षिक उरूस साजरा केला जातो, असं ते सांगतात. श्रीनगरच्या खानकाह-ए-मोअल्ला इथे झिल-हज महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांत वार्षिक उरूस साजरा होतो आणि हा सोहळा पूर्ण आठवडाभर चालतो. श्रीनगरच्या खानकाह-ए-मोअल्ला नंतर त्रालची खानकाह-ए-फैज पनाह ही महत्त्वाची वास्तू मानली जाते. तिथे शाह-ए-हमदान यांची 'आसा-ए-शरीफ' (चालण्याची काठी) ही पवित्र खूण सुरक्षितपणे जपून ठेवलीय. ही काठी प्रामुख्याने वार्षिक उरुसाच्या निमित्ताने सर्वांना दर्शनासाठी ठेवली जाते.

काश्मीरमधल्या बहुतांश खानकाह वेगवेगळ्या आगीच्या घटनांमध्ये जळून गेल्या आहेत. किंवा काळाच्या ओघात आणि नैसर्गिक झीज झाल्याने त्यांच्या बांधकामाला मोठं नुकसान पोहोचलंय. १६ डिसेंबर १९९७ रोजी त्राल इथली खानकाह-ए-फैज पनाह रहस्यमय परिस्थितीत लागलेल्या आगीत भस्मसात झाली, अशी माहिती डॉ. भट यांनी दिली. श्रीनगरच्या खानकाह-ए-मोअल्ला प्रमाणेच या खानकाहची उभारणीही सुलतान (राजा) सिकंदरच्या काळात झाली होती. शाह-ए-हमदान यांनी १३८३-८४ दरम्यान काश्मीरला आपली तिसरी आणि शेवटची भेट दिली. सहा महिन्यांपेक्षा कमी काळ चाललेल्या या भेटीदरम्यान ते त्रालमधल्या कौसरबल इथे काही काळ राहिले, असं सांगितलं जातं. हे ठिकाण आता मीर मोहम्मद हमदानी यांची जियारत (दर्गा) म्हणून ओळखलं जातं. नव्याने इस्लाम स्वीकारलेल्या लोकांच्या धार्मिक शिक्षणासाठी तिथे जागा कमी पडत होती. याच कारणास्तव मोठ्या जागेचा शोध सुरू झाला आणि सध्या खानकाह असलेल्या या नव्या जागेची निवड करण्यात आली. राजाने या खानकाहच्या बांधकामासाठी मोठी मदत केली. त्याने मजुरांना आणि कामगारांना आवश्यक असलेलं सर्व साहित्य पुरवलं. हे सर्व काम मीर मोहम्मद हमदानी यांच्या देखरेखीखाली पूर्ण झालं आणि हिजरी सन ८८० मध्ये हे बांधकाम पूर्णत्वास गेलं.

 

ही खानकाह श्रीनगरच्या खानकाह-ए-मोअल्लाच्या धर्तीवर बांधली गेली. तिचा पाया भक्कम आणि मजबूत होता. हे बांधकाम प्रामुख्याने देवदारचं लाकूड वापरून केलं होतं. त्यात माती आणि विटांचा खूप कमी वापर झाला होता. लाकडाचे ओंडके एकमेकांना कौशल्याने जोडले होते. यावर सुंदर कोरीव काम करून वास्तूला आकर्षक रूप दिलं होतं. या वास्तूचा आकार ४०x६० फूट होता आणि त्याच्या मध्यभागी चार भक्कम खांब होते. डॉ. निसार अहमद भट यांच्या माहितीनुसार रमजानमधल्या एतिकाफसाठी (प्रार्थनेसाठी एकांतवास) तिथे १२ छोट्या 'चिल्ला कोठड्या' बांधल्या होत्या.

मूळ वास्तू सुमारे २०० वर्षांहून अधिक जुनी मानली जाते. या वास्तूचं छत भोजपत्राने (बुर्झा पाश) झाकलेलं होतं. त्यावर मातीचा थर होता आणि त्यात सुंदर फुलं उगवली होती. जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान बक्षी गुलाम मोहम्मद यांच्या राजवटीत १९५३ मध्ये यात मोठा बदल करण्यात आला. भोजपत्राच्या जागी पत्र्याचं छत बसवलं गेलं आणि त्याच्या मध्यभागी गोल आकाराचा मनोरा उभारण्यात आला.

 

आताची नवीन वास्तू तीन मजली आहे. याच्या तळमजल्यावर एकाच वेळी १००० हून अधिक भाविक बसू शकतील, एवढी मोठी जागा उपलब्ध आहे. दुसऱ्या मजल्यावर तीन बाजूंनी जागा ठेवलीय आणि मधला भाग पूर्णपणे मोकळा सोडलाय. तसंच सर्वात वरच्या मजल्यावर सलग मोठी जागा उपलब्ध आहे. जुन्या वास्तूमध्ये रमजानमधल्या एतिकाफसाठी विशेष कोठड्या होत्या. पण नवीन वास्तूमध्ये तशा कोणत्याही वेगळ्या कोठड्या नाहीत, असं तिथल्या रखवालदाराने सांगितलं. या पवित्र स्थानाच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी विशेष कक्षासमोर भाविक आजही नमाज अदा करतात. पुरुष आणि महिला भाविक श्रद्धेने तिथे संतांचे आशीर्वाद घेतात.

हा विशेष कक्ष (हुजरा-ए-खास) सुरक्षित ठेवलाय. तिथे समोरच्या भिंतीवर कापडाने झाकलेली ती पवित्र खूण जपून ठेवलीय. या कक्षाच्या भिंतींवर सुफी संतांचं 'अवराद-ए-फतिया' सुंदर हस्ताक्षरात लिहिलंय. मीर सय्यद अली हमदानी यांची 'आसा-ए-शरीफ' (चालण्याची काठी) हीच इथली पवित्र खूण आहे. गेल्या पाच दशकांपासून ही काठी या पवित्र स्थानावर सुरक्षित ठेवलीय. डॉ. निसार अहमद भट यांच्या माहितीनुसार, पूर्वी ही काठी कार कुटुंबाच्या ताब्यात होती. हे कुटुंब कृष्ण कार या पूर्वजांचे थेट वंशज आहे. शाह-ए-हमदान यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. पूर्वी हे कुटुंब या पवित्र खुणेचं सर्वांना दर्शन घडवत असे. पाच दशकांहून अधिक काळापूर्वी त्यांनी या खुणेचा ताबा खानकाहच्या व्यवस्थापनाकडे पूर्णपणे सोपवला.