शम्पी चक्रवर्ती पुरकायस्थ
हुगळी जिल्ह्याच्या जांगीपारा ब्लॉकमध्ये फुरफुरा शरीफ हा छोटासा परिसर आहे. संपूर्ण पूर्व भारतात याला महत्त्वाचं सुफी तीर्थक्षेत्र मानलं जातं. दरवर्षी लाखो लोक प्रार्थना करायला, नवस फेडायला किंवा आध्यात्मिक शांतता मिळवायला इथे येतात. पण फुरफुरा शरीफ केवळ दर्गा किंवा धार्मिक मेळाव्याचं ठिकाण नाहीये. ती ऐतिहासिक खानकाह आहे. या पारंपारिक सुफी संस्थेत अनेक पिढ्यांपासून आध्यात्मिक साधना, धार्मिक शिक्षण, समाजसेवा आणि मानवी मूल्यांची जोपासना अविरतपणे सुरू आहे. 'खानकाह' हा शब्द पर्शियन भाषेतून आलाय. मध्ययुगीन काळात सुफी संतांनी अनेक आध्यात्मिक केंद्रं स्थापन केली. या केंद्रांमध्ये ते आपल्या शिष्यांसोबत राहायचे. तिथे ते अल्लाहचं स्मरण, जिकिर, धार्मिक शिक्षण, आत्मशुद्धी आणि सामान्य लोकांची सेवा करायचे. याच केंद्रांना पुढे खानकाह म्हणून ओळखलं जाऊ लागलं. बाराव्या शतकापासून भारतीय उपखंडात सुफी संतांचं आगमन झालं. त्यानंतर ही परंपरा मोठ्या प्रमाणावर पसरली. बंगालमध्येही विविध ठिकाणी खानकाह स्थापन झाल्या. हळूहळू या प्रदेशातल्या सामाजिक आणि धार्मिक जीवनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावायला सुरुवात केली.
फुरफुरा शरीफची आधुनिक ओळख प्रख्यात इस्लामिक विद्वान आणि समाजसुधारक अबू बकर सिद्दीकी यांच्याशी जवळून जोडलेली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी धार्मिक शिक्षणाचा प्रसार, नैतिक जीवन, अंधश्रद्धेला विरोध आणि समाजसुधारणेवर विशेष भर दिला. त्यांच्या या प्रयत्नांतून फुरफुरा शरीफ प्रभावी धार्मिक आणि सामाजिक केंद्र म्हणून समोर आलं. आजही त्यांचे वारसदार इथल्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यांवर देखरेख करताहेत. फुरफुरा शरीफच्या खानकाहमध्ये दररोज कुराणचे वर्ग, हदीसचे धडे, जिकिर, प्रार्थना आणि इस्लामिक चर्चा आयोजित केल्या जातात. अनेक विद्यार्थी इथे धार्मिक शिक्षण घेतात. त्याच वेळी गरीब आणि वंचितांची सेवा करणं ही या संस्थेची खूप जुनी आणि महत्त्वाची परंपरा राहिलीय. तिथे वेळोवेळी अन्नवाटप, वैद्यकीय मदत, शैक्षणिक उपक्रम आणि विविध मानवतावादी कार्यक्रम आयोजित केले जातात. मानवतेची सेवा, नम्रता, प्रेम आणि करुणा ही सुफीवादाची मुख्य शिकवण आहे. या सर्व उपक्रमांमधून याच शिकवणीचं दर्शन घडतं.

इस्लामिक दिनदर्शिकेनुसार दरवर्षी इथे उरूस शरीफ साजरा केला जातो. या निमित्ताने केवळ पश्चिम बंगालच्या विविध जिल्ह्यांमधूनच नव्हे, तर बिहार, झारखंड, आसाम, ओडिशा आणि बांगलादेशातूनही भाविक फुरफुरा शरीफमध्ये एकत्र येतात. या सोहळ्यात धार्मिक प्रवचनं, कुराण पठण, प्रार्थना सभा आणि इतर अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांचा समावेश असतो. या मोठ्या गर्दीचा स्थानिक व्यापार, वाहतूक आणि छोट्या अर्थव्यवस्थेवरही खूप मोठा सकारात्मक परिणाम होतो. जातीय सलोख्याची प्रदीर्घ परंपरा हे फुरफुरा शरीफचं आणखी वेगळं वैशिष्ट्य आहे. अनेक बिगर-मुस्लिम भाविकही इथे येतात आणि नवस करतात, असं स्थानिक रहिवासी सांगतात. सुफीवादाचे मानवतावादी आदर्श धार्मिक फाळणी करण्याऐवजी लोकांमध्ये परस्पर आदर, करुणा आणि शांततेला खूप मोठं प्रोत्साहन देतात. याच कारणामुळे फुरफुरा शरीफ हे बंगालमधल्या जातीय सलोख्याचं महत्त्वाचं प्रतीक मानलं जातं.
इतिहासकार मात्र वेगळीच गोष्ट निदर्शनास आणून देतात. हे इतकं मोठं सुफी केंद्र असूनही फुरफुरा शरीफचा इतिहास, हस्तलिखितं, जुनी कागदपत्रं आणि मौखिक परंपरा यांचं अजूनही पुरेशा प्रमाणात दस्तऐवजीकरण झालेलं नाही. संशोधन, जतन आणि डिजिटल संग्रह तयार करण्याच्या उद्देशाने सुरू केलेले उपक्रम हा वारसा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवायला मोठी मदत करू शकतात.
हेही वाचा: खानकाह रहमानी: शिक्षणासोबत अध्यात्म, नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीचा मोठा प्रवास
आजच्या वेगाने बदलणाऱ्या समाजात फुरफुरा शरीफची खानकाह केवळ धार्मिक संस्था नाहीये. ती बंगालचा इतिहास, संस्कृती, समाजसेवा आणि मानवतावादी मूल्यांचा जिवंत साठा आहे. शतकाहून अधिक काळापासून हे केंद्र प्रेम, करुणा आणि अध्यात्माचे आदर्श देण्याचं काम अविरतपणे करतंय. या सर्व गोष्टी या वास्तूला बंगालच्या सांस्कृतिक वारशाचा अनमोल भाग बनवतात.