'मुस्लिम, दलित आणि बहुजनांनी एकत्र येऊन सत्ता संपादनाचे नवे राजकीय गणित मांडावे'; मुंबईत उमटला सूर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
डावीकडून ज्येष्ठ पत्रकार अरफा खानम शेरवानी, पत्रकार नवीन कुमार, ॲड. प्रकाश आंबेडकर
डावीकडून ज्येष्ठ पत्रकार अरफा खानम शेरवानी, पत्रकार नवीन कुमार, ॲड. प्रकाश आंबेडकर

 

आवाज द व्हॉइस ब्युरो, मुंबई

भारतीय संविधानाने दिलेल्या मूल्यांवर आधारित एक प्रगत आणि सर्वसमावेशक समाज घडवण्यासाठी मुस्लिम, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाने एकत्र येऊन 'नव्या राजकीय समीकरणांची' पायाभरणी करण्याची वेळ आली आहे. असा अत्यंत सकारात्मक आणि आशादायी सूर मुंबईत आयोजित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उमटला. 'प्रबुद्ध भारत' प्रकाशनातर्फे राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते फारूक अहमद लिखित 'खौफ और नफरत के दौर में मुसलमानों का सियासी अजेंडा' या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

मुंबईततील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमाला या सोहळ्याला ॲड. प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ पत्रकार अरफा खानम शेरवानी, स्मिता पानसरे, माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान आणि इतिहासकार सरफराज अहमद उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमात भविष्यातील 'सकारात्मक राजकीय अजेंडा' आणि 'विकासाची नवी गणिते' यावरच प्रमुख वक्त्यांनी भर दिला.

सत्ता संपादनासाठी नवे राजकीय गणित मांडा : ॲड. प्रकाश आंबेडकर

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत सकारात्मक आणि सडेतोड विचार मांडत समाजाला नवी दिशा दिली. ते म्हणाले, "मुस्लीम समाजाने मुल्ला-मौलवींच्या तावडीतून स्वतःची मुक्तता केली पाहिजे. दलित, मुस्लिम, आदिवासी आणि ओबीसी समाजाने सत्ता संपादनासाठी एकत्र आले पाहिजे. संविधानाच्या चौकटीत राहून जेव्हा हे सर्व शोषित घटक एकत्र येतील, तेव्हा देशात एक 'नवे राजकीय गणित' तयार होईल. हीच नवी राजकीय ताकद भारताला खऱ्या अर्थाने एक प्रगत आणि लोकशाहीवादी राष्ट्र बनवेल. आपली एकजूट हीच उज्ज्वल भविष्याची नांदी आहे."

लोकशाही प्रक्रियेत आत्मविश्वासाने सहभागी व्हा : अरफा खानम शेरवानी

ज्येष्ठ पत्रकार अरफा खानम शेरवानी यांनी देशातील लोकशाही प्रक्रियेत विश्वासाने पुढे येण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, "मुस्लिम समाजाने लोकशाही प्रक्रियेत अत्यंत आत्मविश्वासाने आणि सक्रियतेने सहभागी झाले पाहिजे. जेव्हा आपण आपले राजकीय ध्येय बहुजन समाजाच्या ध्येयाशी जोडतो, तेव्हा आपण केवळ आपले हक्क मिळवत नसतो, तर भारताची लोकशाही आणि 'गंगा-जमुनी तहजीब' अधिक भक्कम करत असतो. हा समानतेचा आणि प्रगतीचा एकत्रित प्रवास देशाला एका नव्या उंचीवर नेईल."

पुरोगामी विचारांवर आधारित नवी समीकरणे : स्मिता पानसरे

पुरोगामी विचारवंत आणि नेत्या स्मिता पानसरे यांनी संविधानाच्या ताकदीवर विश्वास व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, "पुरोगामी विचार आणि भारतीय संविधानाची मूल्ये हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. मुस्लिम आणि दलित समाजाची एकत्रित सामाजिक आणि राजकीय आघाडी एका नव्या, विवेकनिष्ठ आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती करेल. आपण सर्वांनी मिळून एका प्रगतशील भारताच्या उभारणीसाठी पुढे पाऊल टाकले पाहिजे."

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतील 'समान ध्येय'

इतिहासकार सरफराज अहमद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अतिशय सुंदर संदर्भ दिला. ते म्हणाले, "डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले होते की, हिंदू समाजातील अनेक शोषित घटकांच्या आणि मुस्लिम समाजाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक गरजा अगदी समान आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाने समाजातील दलित, ओबीसी आणि आदिवासी बांधवांसोबत 'कॉमन कॉज' (समान ध्येय) प्रस्थापित करण्याची गरज आहे. धार्मिक ओळखीपलीकडे जाऊन आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी एकत्र येणे, हेच खरे नवे राजकीय गणित आहे."

मुख्य प्रवाहात येऊन संविधानाचे राज्य आणा

गेल्या काही दशकांचे जुने राजकीय प्रयोग मागे सोडून आता एका नव्या आणि यशस्वी प्रयोगाची गरज असल्याचे माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांनी स्पष्ट केले. "देशातील लोकसंख्येत मोठा वाटा असूनही संसदेत आपले प्रतिनिधित्व कमी आहे, ते वाढवण्यासाठी समाजाने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. आपला राजकीय अजेंडा हा 'भारतीय संविधानाला अनुकूल असा प्रगत समाज निर्माण करण्याचा अजेंडा' असला पाहिजे," यावर अब्दुल रहमान यांनी भर दिला.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि बुद्धिवंत उपस्थित होते. यासोबतच राज्यभरातून आले दलित-मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सोहळ्यात अंजलि आंबेडकर (कार्यकारी संपादक, प्रबुद्ध भारत), रेखा ठाकुर (प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), जनाब मुज्तबा फारुक (राष्ट्रीय सल्लागार समिती सदस्य, जमात-ए-इस्लामी, नवी दिल्ली) यांची विशेष उपस्थिती होती. 

याशिवाय आरफा खानम शेरवानी (संपादक, द वायर), अब्दुर रहमान (माजी आयपीएस अधिकारी व लेखक), कॉमरेड स्मिता गोविंद पानसरे (डाव्या विचारसरणीच्या नेत्या), इतिहासकार सरफराज अहमद, लेखक व साहित्यकार कलीम अजीम आणि नवीन कुमार (संपादक, आर्टिकल १९ इंडिया) हे देखील उपस्थित होते. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter