राम मंदिर ट्रस्टच्या दानपेटीत अफरातफर, ८ संशयितांवर गुन्हा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
राम मंदिर दानपेटीतील गैरव्यवहार प्रकरणाची गंभीर दखल
राम मंदिर दानपेटीतील गैरव्यवहार प्रकरणाची गंभीर दखल

 

अयोध्या

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणगीत गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या तक्रारीवरून पोलिसांनी ८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

गैरव्यवहाराचा तपास आणि SIT ची भूमिका

देणगीमध्ये अफरातफर झाल्याच्या आरोपांनंतर १३ जून रोजी उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना केली होती. लखनऊचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत, पोलीस महानिरीक्षक किरण एस. आणि वित्त विभागाचे विशेष सचिव नील रत्न यांचा या SIT मध्ये समावेश आहे. SIT ने दोन दिवसांपूर्वीच आपला प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला होता, त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणावर झाली कारवाई?

या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये अविनाश शुक्ला, अनूकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रमाशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रमाशंकर यादव (टीन्नू) यांच्यासह काही अनोळखी व्यक्तींची नावे आहेत. यातील बहुतांश संशयित हे देणगी मोजण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते. भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमान्वये चोरी, विश्वासाचा भंग आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, संशयितांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, त्यानंतर ट्रस्ट आणि प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.