समीर दि. शेख, पुणे
भारतीय संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिला आहे. समान संधी, समान संरक्षण आणि समान न्याय हे एका कल्याणकारी राज्याचे महत्त्वाचे पैलू आहेत. हेच तत्त्व प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांचे कल्याण करण्यासाठी, विशेषतः मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या डॉ. बेनझीर तांबोळी या एका जिद्दी महिलेची ही गोष्ट आहे.
बेनझीर यांचा जन्म आणि जडणघडण एका पुरोगामी विचारांच्या कुटुंबात झाली. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या कुटुंबावर होता. त्यांचे वडील इलाही मोमीन हे दलवाईंच्या सोबत काम करत असत. अशा वैचारिक वातावरणात वाढलेल्या बेनझीर यांच्यावर लहानपणापासूनच समानतेचे आणि स्वातंत्र्याचे संस्कार झाले.
संघर्षाची सुरुवात आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द
लग्नानंतरच्या सहजीवनात बेनझीर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या सासरचे वातावरण अधिक पारंपरिक आणि धर्मवादी होते, जे त्यांच्या पुरोगामी आणि मोकळ्या विचारांशी विसंगत होते. या वैचारिक मतभेदांमधूनच अनेक गुंतागुंती निर्माण झाल्या आणि अखेर त्यांचा तलाक झाला.
हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता. पण, बेनझीर यांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवले की यातून बाहेर पडायचे आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे. त्या सांगतात, "लहानपणापासूनच एक तर स्वतःच्या बौद्धिक क्षमतांवर विश्वास होता आणि माझ्या वडिलांकडून मला मिळालेली लढाऊ वृत्ती होती... काही झालं तरी घाबरून नाही जायचं, बघू काय तरी करू, लढू... कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची वृत्ती होती."
तलाकनंतर त्यांनी फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला आणि कपडे शिवण्याचे काम सुरू केले. त्यांनी स्वतःला या कामात गुंतवून घेतले आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने पावले टाकली. त्या म्हणतात, "आपल्या छोट्याशा गरजेसाठी सुद्धा आपल्याला दुसऱ्याकडे हात पसरायला नाही लागला पाहिजे... स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी काय करता येईल, याचा मी विचार करत होते."
हा संघर्ष केवळ आर्थिक नव्हता, तर तो मानसिकही होता. पण त्यांनी यातून मार्ग काढला. नंतर त्यांनी लेक्चररसाठी मुलाखती दिल्या आणि तिथेही यश मिळवले.
शैक्षणिक कार्य आणि उपक्रमांमधून नवे प्रयोग
उर्दू माध्यमातील शिक्षणाविषयी त्या म्हणतात, "फक्त उर्दू माध्यमात शिकू नये, असं न म्हणता, परिस्थितीच्या रेट्यामुळे, असाहाय्यतेमुळे किंवा उपलब्धतेमुळे अनेक मुले आणि मुली उर्दू माध्यमात शिक्षण घेतात. त्यांचा तो दोष नसतो."
या विद्यार्थ्यांमध्ये भाषा कौशल्य विकसित व्हावे, विशेषतः इंग्रजीचे ज्ञान मिळावे, यासाठी त्यांनी 'तंजीमे वालेदीन' या संघटनेच्या माध्यमातून उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी पुढाकार घेतला आणि अनेक यशस्वी प्रयोग राबवले. या उपक्रमावर आधारित प्रबंधही त्यांनी सादर केला.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात दिले स्वतःला झोकून
स्वतःच्या अनुभवातून बेनझीर यांना मुस्लिम महिलांच्या समस्यांची जाणीव झाली होती. त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामात स्वतःला झोकून दिले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आणि महिला अधिकारांसाठी, विशेषतः मुस्लिम महिलांच्या समान हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला. तसेच, 'मुस्लिम महिला मदत केंद्रा'च्या माध्यमातून त्यांनी अनेक घटस्फोटित आणि अन्यायग्रस्त महिलांना आधार दिला.
या प्रदीर्घ संघर्षातून कमावलेल्या अनुभवामुळे त्या सामाजिक हिताचे विचार अत्यंत ठामपणे मांडतात. तलाक किंवा कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी संविधानात्मक आणि न्यायिक प्रक्रियेचाच वापर झाला पाहिजे, असा त्यांचा नेहमी आग्रह असतो.
बेनझीर आणि त्यांचे पती व मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी आंतरधर्मीय विवाहांना केवळ पाठिंबाच दिला नाही, तर त्यांच्या घरातच अनेक आंतरधर्मीय जोडप्यांना मोठा आधार दिला. या जोडप्यांना 'स्पेशल मॅरेज ॲक्ट'अंतर्गत विवाह करण्याबाबत त्यांनी कायदेशीर मार्गदर्शनही केले.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे आणि हमीद दलवाईंचे विचार पुढे नेणे, ही काळाची गरज आहे, असे त्या मानतात. हा विचार रक्ताने आणि विचाराने त्यांच्यात भिनलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत या चळवळीत सक्रिय राहून काम करत राहण्याचा त्यांचा निर्धार आहे.
वैचारिक कार्यातही अग्रेसर
बेनझीर यांचा प्रवास केवळ सामाजिक कार्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यांनी शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. शिक्षण शास्त्रात त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आणि विविध महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे काम केले.
याशिवाय 'महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन' (MKCL) मध्ये वरिष्ठ शैक्षणिक समन्वयक म्हणूनही त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले असून, शिक्षण आणि शैक्षणिक व्यवस्थापन क्षेत्रात त्यांना दोन दशकांहून अधिक काळचा अनुभव आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात कार्यरत असताना महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षाच्या नोडल अधिकारी म्हणूनही त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या धाडसी आणि समर्पित कार्याची दखल घेत त्यांना नवी दिल्लीचा 'साहस सन्मान' (२०१५) आणि पुण्याचा 'सेवाव्रती महिला पुरस्कार' (२०१७) यांसारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक कामासोबतच त्यांचे वैचारिक कामही तितकेच व्यापक आणि महत्त्वाचे आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांवर त्यांचे प्रभुत्व असूनत्यांनी अनुवाद आणि संपादनाचे मोठे काम केले आहे.'मुस्लिम सत्यशोधक पत्रिका' आणि 'समाजवादी अध्यापक पत्रिका' यांच्या सहसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी मंडळाच्या पत्रिकेतून सातत्याने लेखन केलेआहेआणि विविध ठिकाणी अभ्यासपूर्ण व्याख्यानेही दिली. 'शिक्षणशास्त्र शब्दकोश' हा त्यांनी तयार केलेला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे.
याशिवाय 'प्रभावशाली शिक्षण तज्ज्ञ' या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले आहे. त्यांनी शेख युसूफ बाबा (ज्यांना दक्षिणेत 'स्काय बाबा' म्हणून ओळखले जाते) यांच्या तेलगू कथासंग्रहाचा मराठीत अनुवाद केला आहे, जो लवकरच प्रकाशित होणार आहे. या कथांमधून मुस्लिम समाजातील विविध घटकांचे आणि विशेषतः महिलांचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले आहे.
देहदानाचा धाडसी आणि पुरोगामी निर्णय
प्रस्थापित सामाजिक आणि धार्मिक रूढींना फाटा देत त्यांनी एक अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. मृत्यूनंतर देहदान करण्याचा निर्णय त्यांनी आणि त्यांचे पती डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी घेतला असून तसे रीतसर फॉर्मही भरून दिले आहेत. हा निर्णय त्यांच्या पुरोगामी विचारांची प्रगल्भता दर्शवणारा आहे.
येत्या काळात अधिक जोमाने काम करण्याचा मानस
डॉ. बेनझीर यांनी मोठे शिखर गाठले असले तरी,येत्या काळात आणखी महत्त्वकांक्षी उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे. मुस्लिम समाजात इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत अशा अनेक महिला आहेत ज्यांनी विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केली आहे. केवळ धार्मिक किंवा सामाजिक क्षेत्रातच नव्हे, तर विज्ञान, वैद्यकीय, न्यायदान, उद्योग आणि साहित्य क्षेत्रात मुस्लिम महिलांचे योगदान मोठे आहे. मात्र, अनेकदा हे चेहरे समाजासमोर येत नाहीत. त्यामुळे अशा कर्तृत्ववान महिलांची माहिती गोळा करून, त्यांची चरित्रे शब्दबद्ध करण्याचा आणि त्यावर एक पुस्तक लिहिण्याचा त्यांचा विचार आहे. मुस्लिम महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी हे लेखन कार्य महत्त्वाचे ठरणार आहे.
आंतरधर्मीय विवाहांना पाठिंबा देणार आणि सामाजिक एकतेसाठी प्रयत्न करणार
अलीकडच्या काळात आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत, १९५४ च्या 'स्पेशल मॅरेज ॲक्ट' अंतर्गत विवाह करण्यासाठी जोडप्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांना कायदेशीर व भावनिक आधार देणे, हे काम त्या अधिक वेगाने करणार आहेत. समाजात वाढणारा द्वेष कमी करून 'एकता आणि एकात्मता' हा एककलमी हाती घेऊन काम करण्याची त्यांची इच्छा आहे.
म्हणजेच,लेखणीच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन आणि कृतीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन, अशा दुहेरी मार्गाने बेनझीर तांबोळी यांची पुढची वाटचाल सुरू राहणार आहे. यात पती डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांची मोलाची साथ असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात.
स्वतःच्या तलाकच्या कटू अनुभवातून बाहेर पडून केवळ स्वतःचे आयुष्यच सावरले नाही, तर इतर अनेक महिलांनाही त्यांनी आधार दिला. स्त्रीने केवळ परिस्थितीसमोर हार मानू नये, तर त्यातून मार्ग काढून स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य प्रकाशमान कसे करावे, याचा सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉ. बेनझीर तांबोळी, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि त्यांची जिद्द समाजातील प्रत्येकासाठीच, विशेषत: मुस्लीम महिलांसाठी विशेष प्रेरणादायी आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter