प्रा. निलोफर खान : काश्मीर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रा. निलोफर खान
प्रा. निलोफर खान

 

एहसान फाजिली

"मी माझ्या जीवनप्रवासाकडे पाहते, तेव्हा मला हा शिक्षण, जबाबदारी आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे झालेला एक शिस्तबद्ध विकास दिसतो. मी काश्मीरमधील अशा पिढीतील आहे, जिथे महिला उच्च शिक्षणात सातत्याने प्रवेश करत होत्या. मात्र, दीर्घकालीन शैक्षणिक कारकीर्द आणि विशेषतः नेतृत्वाची पदे भूषवणे हे फारच दुर्मिळ होते. शैक्षणिक क्षेत्रात राहण्याचा निर्णय घेण्यासाठी कमालीची बांधिलकी आणि मला नेमके काय योगदान द्यायचे आहे, याबद्दल स्पष्टता असणे आवश्यक होते," असे काश्मीर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू प्राध्यापक निलोफर खान यांनी 'आवाज-द-व्हॉईस'शी बोलताना सांगितले. आणि महत्वाचे म्हणजे हे राज्यातील पहिले आणि प्रतिष्ठीत विद्यापीठ आहे. 

एक प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ आणि प्रशासक असलेल्या प्राध्यापक निलोफर खान यांनी या प्रतिष्ठित विद्यापीठात विविध महत्त्वाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय पदांवर सुमारे ४० वर्षे सेवा दिली आहे. झबंरवान टेकड्यांच्या कुशीत आणि दल सरोवराच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर वसलेल्या या अतिशय सुंदर परिसरातील विद्यापीठाचा कार्यभार त्यांनी पहिल्यांदा २० मे २०२२ रोजी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी स्वीकारला होता. त्यानंतर १९ मे २०२५ रोजी त्यांनी दुसऱ्या कार्यकाळाची धुरा आपल्या हाती घेतली. सध्या त्या विद्यापीठाच्या २१ व्या कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी २०१८ ते २०२० या काळात त्यांनी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू म्हणूनही काम पाहिले होते.
 

नेल्सन मंडेला यांच्या विचारांची प्रेरणा
निलोफर त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्यासाठी सर्वत्र ओळखल्या जातात. त्यांनी भूषवलेल्या प्रत्येक भूमिकेत आपली अफाट बुद्धिमत्ता सिद्ध केली आहे. वैयक्तिक जीवनात त्या नेल्सन मंडेला यांच्या एका विचाराने अत्यंत प्रेरित आहेत. मंडेला यांनी म्हटले होते की, "शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, ज्याचा वापर तुम्ही जग बदलण्यासाठी करू शकता. जेव्हा तुम्ही एका महिलेला शिक्षित करता, तेव्हा तुम्ही पिढ्यानपिढ्या बदलून टाकता."

"आज काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरूपद सांभाळताना प्रशासनापलीकडची जबाबदारी जाणवते. हे आपल्या समाजाच्या बदलत्या आकांक्षा आणि नेतृत्वात महिलांची वाढती उपस्थिती दर्शवते," असे प्राध्यापक निलोफर खान यांनी 'आवाज-द-व्हॉईस'ला सांगितले. त्यांच्या या प्रवासामुळे तरुण महिलांना एक विश्वास मिळेल, अशी त्यांनी आशा व्यक्त केली. चिकाटी आणि पूरक वातावरण असेल तर कौटुंबिक जीवन सांभाळून शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे शक्य आहे, असे त्या मानतात.

या प्रवासातील आपल्या प्रेरणेबद्दल बोलताना प्राध्यापक खान म्हणाल्या की, त्यांना अनेक स्रोतांकडून प्रेरणा मिळाली. यामध्ये संस्थेच्या प्रगतीसाठी एकत्र काम करणारे त्यांचे सहकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काश्मीरचे तरुण विद्यार्थी समाविष्ट आहेत. या विद्यार्थ्यांच्या आकांक्षांमधूनच आशा आणि परिवर्तनाची भावना दिसून येते. "त्यांची स्वप्ने मला शैक्षणिक नेतृत्वाचे महत्त्व नेहमी लक्षात आणून देतात," असे त्या पुढे म्हणाल्या.
 
 
शैक्षणिक कारकीर्द आणि आव्हाने
विद्यापीठातील सुरुवातीच्या वर्षांनी त्यांची वैचारिक पायाभरणी केली आणि संस्थेप्रती आपलेपणाची भावना निर्माण केली. वर्षांच्या प्रवासात अध्यापन आणि संशोधन हा त्यांच्या ओळखीचा मुख्य भाग बनला. त्यानंतर प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वाभाविकपणे त्यांच्याकडे आल्या. "प्रत्येक भूमिकेने विद्यापीठांचा विकास कसा होतो आणि निर्णयांचा विद्यार्थी व प्राध्यापकांवर कसा परिणाम होतो, याची माझी समज अधिक वाढवली," असे त्या म्हणाल्या.

शिक्षण क्षेत्रात काम करताना विशेषतः कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात महिला म्हणून आलेल्या आव्हानांचा त्यांनी उल्लेख केला. वरिष्ठ पदांवर महिलांच्या असण्याबद्दल काही ठिकाणी संकोच असायचा. या आव्हानांना बचावात्मक उत्तर देण्याऐवजी त्यांनी आपल्या कामालाच बोलू दिले. व्यावसायिक सातत्यामुळे स्वतःवर आणि इतरांवरही विश्वास निर्माण होतो, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल
"व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबतच कौटुंबिक आयुष्याची तितकीच महत्त्वाची बाजू नेहमी सोबत होती. आपल्या समाजात महिलांनी दोन्ही आघाड्यांवर सारखेच लक्ष द्यावे, अशी अपेक्षा असते," असे त्या दोन्ही क्षेत्रांतील समन्वयाबद्दल बोलताना म्हणाल्या. शैक्षणिक कार्य, प्रशासकीय कर्तव्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा ताळमेळ बसवण्यासाठी वेळेचे अचूक नियोजन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मजबूत कौटुंबिक पाठबळ आवश्यक होते. सुदैवाने त्यांना कुटुंबाचे प्रोत्साहन आणि समज मिळाली. यामुळे एका जबाबदारीच्या बदल्यात दुसरी जबाबदारी पार पाडत असल्याची भावना मनात न आणता त्यांना कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करता आले.

प्राध्यापक निलोफर खान यांच्या गतिमान नेतृत्वाखाली काश्मीर विद्यापीठाने उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत. विद्यापीठाला 'नॅक ए++' श्रेणी मिळाली आहे. हे विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टता, नवोपक्रम आणि गुणवत्ता वाढीबद्दलच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. विद्यापीठाने एनआयआरएफ रँकिंगमध्ये ३४ वे स्थान मिळवले आहे. देशातील राज्य विद्यापीठांमध्ये हे विद्यापीठ आठव्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवत प्राध्यापक निलोफर खान यांनी काश्मीर विद्यापीठाला संशोधन, बहुविद्याशाखीय शिक्षण आणि ज्ञानाच्या प्रसारात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एक खरे उत्कृष्टता केंद्र बनवण्याचे अभियान हाती घेतले आहे.
 

प्राध्यापक निलोफर खान या देशभरातील उच्च शिक्षणातील महिला शिक्षणतज्ज्ञांच्या क्षमता बांधणीत सक्रियपणे सहभागी आहेत. महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यागत कार्यक्रमांतर्गत त्यांनी अमेरिकेतील अनेक विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सुदान, युएई आणि स्पेनमधील अनेक विद्यापीठे व महाविद्यालयांचा त्यांनी दौरा केला आहे. विद्यापीठ परिषद सिंडिकेट, शैक्षणिक परिषद आणि युजीसीसारख्या राष्ट्रीय संस्थांच्या सदस्यत्वाच्या माध्यमातून धोरण ठरवण्यात व प्रशासनात त्यांचे मोठे योगदान आहे.

१९८६ मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी सुरुवात केली. १९९२ मध्ये त्या सहयोगी प्राध्यापक आणि २००१ मध्ये प्राध्यापक झाल्या. 'होम सायन्स' अंतर्गत 'एक्सटेन्शन अँड कम्युनिकेशन' हा त्यांचा विशेष आवडीचा विषय आहे. त्यांच्या शैक्षणिक योगदानामध्ये अभ्यासक्रम विकास आणि 'एम.ए. इन वूमेन्स स्टडीज' सारख्या कार्यक्रमांची सुरुवात समाविष्ट आहे. त्यांनी ३६ हून अधिक पीएचडी आणि एम.फिल संशोधकांचे यशस्वी मार्गदर्शन केले आहे. 
 

निलोफर यांनी ५ पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे १०० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. कम्युनिटी न्यूट्रिशन, जेंडर स्टडीज, जेरियाट्रिक हेल्थ आणि ह्युमन डेव्हलपमेंट हे त्यांच्या संशोधनाचे मुख्य विषय राहिले आहेत. 'फूड सायन्स टेक्नॉलॉजी' आणि 'वूमेन्स स्टडीज' या नवीन विभागांच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

होम सायन्समध्ये पीएचडी केलेल्या प्राध्यापक खान यांनी विभागात एक तज्ज्ञ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळण्यापूर्वी त्या विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांनी कॉलेज डेव्हलपमेंट कौन्सिलच्या डीन, रजिस्ट्रार, डीन फॅकल्टी ऑफ अप्लाइड सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ होम सायन्सेसच्या संचालक, डीन स्टुडंट्स वेल्फेअर आणि सेंटर फॉर वूमेन्स स्टडीज अँड रिसर्चच्या संस्थापक संचालक म्हणून उल्लेखनीय सेवा दिली आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter