शाह ताज खान
एक प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक आणि आधुनिक काळातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून प्राध्यापक नजमा अख्तर ओळखल्या जातात. जामिया मिलिया इस्लामियाच्या पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. ११ एप्रिल २०१९ ते १२ नोव्हेंबर २०२३ या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जामिया मिलिया इस्लामियाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
१९२० मध्ये स्थापन झालेल्या जामिया मिलिया इस्लामियाच्या त्या १६ व्या कुलगुरू होत्या. दिल्लीतील कोणत्याही केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनून त्यांनी इतिहास रचला. त्यांच्या या बहुमोल सेवेची दखल घेत भारत सरकारने २०२२ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले.
शैक्षणिक योगदान
प्राध्यापक नजमा अख्तर यांनी नेहमीच उर्दू भाषेला पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांचे बहुतांश लेखन आणि संशोधन इंग्रजी भाषेत आहे. त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा मोठा भाग शैक्षणिक धोरण आणि प्रशासनावर आधारित आहे. त्यांनी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली आणि संपादित केली आहेत. 'रिव्होल्यूशनलायझिंग एज्युकेशन: नॅव्हिगेटिंग द एनईपी २०२० एरा' या त्यांच्या पुस्तकात त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेतला आहे.

'मन की बात: अ मिडियम ऑफ कम्युनिकेशन' हे त्यांचे दुसरे उल्लेखनीय पुस्तक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ कार्यक्रमाचा सामाजिक आणि शैक्षणिक परिणाम या कॉफी टेबल बुकमध्ये मांडला आहे. 'हायर एज्युकेशन इन इंडिया: इश्यूज अँड चॅलेंजेस' या पुस्तकात त्यांनी उच्च शिक्षण व्यवस्थेतील समस्या, गुणवत्तेचे निकष आणि प्रशासकीय सुधारणांवर प्रकाश टाकला आहे.
पुस्तकांशिवाय त्यांचे १०० हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी शैक्षणिक प्रशासन आणि लैंगिक समानता यांसारख्या विषयांवर सातत्याने आवाज उठवला आहे. नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेजसाठी अरबी भाषा शिकण्याचे मॉड्यूल तयार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कुलगुरू म्हणून जबाबदारी
जामिया मिलिया इस्लामियाचे नेतृत्व करताना प्राध्यापक नजमा अख्तर यांनी या विद्यापीठाला देशातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर नेले. तसेच एनआयआरएफ आणि नॅककडून 'ए++' श्रेणी मिळवून दिली. त्यांच्या कार्यकाळात जामियामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. भारत सरकारने या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली. विद्यापीठाच्या १०० वर्षांच्या इतिहासात हे एक स्वप्नच होते, जे त्यांनी प्रत्यक्षात उतरवले.
कुलगुरू म्हणून त्यांनी ३० हून अधिक नवीन आणि आधुनिक अभ्यासक्रम सुरू केले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने वैद्यकीय, तांत्रिक, डिझाइन आणि इनोव्हेशन, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिजिटल लर्निंग आणि आयओटी यांसारखे भविष्याचा वेध घेणारे उपक्रम सुरू केले.

चार दशकांचा प्रवास
प्राध्यापक नजमा अख्तर यांची शैक्षणिक कारकीर्द चार दशकांची आहे. त्यांचे आयुष्य बौद्धिक जिज्ञासा आणि खंबीर नेतृत्वाचे दर्शन घडवते. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९५३ रोजी झाला. त्यांनी अलिगड मुस्लीम विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. तिथे त्यांना सुवर्णपदक मिळाले होते.
कुरुक्षेत्र विद्यापीठातून त्यांनी 'उच्च शिक्षणातील पारंपारिक आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास' या विषयावर पीएचडी मिळवली. पारंपारिक विद्यापीठे आणि मुक्त विद्यापीठे यांच्यातील शैक्षणिक दर्जा, प्रशासन आणि निकाल यांमधील फरक त्यांनी आपल्या संशोधनातून मांडला.
त्यांना युनायटेड किंगडममधील वॉर्विक विद्यापीठात संशोधन करण्याची संधी मिळाली. फुलब्राइट फेलोशिप अंतर्गत त्यांनी अमेरिकेत शैक्षणिक नियोजनावर काम केले. तसेच फ्रान्समधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल प्लॅनिंगमधून त्यांनी शैक्षणिक नियोजनाचे प्रशिक्षण घेतले.

अलिगड मुस्लीम विद्यापीठातून सुरुवात
प्राध्यापक नजमा अख्तर यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात अलिगड मुस्लीम विद्यापीठातून केली. तिथे त्यांनी परीक्षा नियंत्रक आणि प्रवेश विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ प्राध्यापक आणि प्रशिक्षण विभाग प्रमुख म्हणून सेवा दिली.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील 'स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग'च्या त्या संस्थापक संचालक होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी युनेस्को, युनिसेफ आणि डॅनिडा यांसारख्या संस्थांसाठी शैक्षणिक सल्लागार म्हणून काम केले आहे.
पुरस्कारांचा सन्मान
जामिया मिलिया इस्लामियाला यशाच्या शिखरावर नेल्याबद्दल त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मश्री' प्रदान करण्यात आला. पदावर असताना हा सन्मान मिळवणाऱ्या त्या जामियाच्या पहिल्या कुलगुरू ठरल्या. २०२२ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
२०२३ मध्ये 'टीमलीज एडटेक'ने त्यांना शिक्षण आणि रोजगार यांच्यातील दुवा साधण्यासाठी 'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड' देऊन गौरवले. त्याच वर्षी झी मीडिया ग्रुपने त्यांना 'नॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड' प्रदान केला. २०२३ मध्ये त्यांची एनसीसीच्या मानद कर्नल कमांडंट म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यापूर्वी २०१३ मध्ये त्यांना अध्यापन आणि संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'यूजीसी एक्सलन्स अवॉर्ड' मिळाला होता. २०१० मध्ये मौलाना अबुल कलम आझाद पुरस्काराने त्यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या गुणवत्तेचा गौरव करण्यात आला होता.
प्राध्यापक नजमा अख्तर यांचे यश हा कोणताही योगायोग नसून ती त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची आणि जिद्दीची पावती आहे. सुवर्णपदकापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास भावी पिढ्यांसाठी नेतृत्व आणि शैक्षणिक सुधारणेचे एक उत्तम उदाहरण आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter