डॉ. सय्यद मुबीन झेहरा : महिला हक्कांच्या लढ्यातील एक निर्भीड आवाज

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
डॉ. सय्यद मुबीन झेहरा
डॉ. सय्यद मुबीन झेहरा

 

विदुषी गौर

शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्वत्तेचे मूल्य केवळ पदव्या आणि शोधनिबंधांवरून मोजले जात नाही. तर ती विद्वत्ता येणाऱ्या पिढ्यांना किती प्रेरित करते, यावरून मोजली जाते. अशाच शैक्षणिक वर्तुळात डॉ. सय्यद मुबीन झेहरा यांनी स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. एक नामवंत इतिहासकार, प्रसिद्ध स्तंभलेखिका, ख्यातनाम लेखिका आणि ज्येष्ठ प्राध्यापिका म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वैचारिक सखोलता, सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड नेतृत्वाचा एक दुर्मिळ संगम पाहायला मिळतो.

सध्या त्या दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या 'आत्मा राम सनातन धर्म कॉलेज' मधील इतिहास विभागात असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्तुळात त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ तरुण मनांना आकार देण्याचे काम केले आहे. त्यांचे वर्ग केवळ इतिहासाच्या चर्चेसाठीच नव्हे, तर भूतकाळाला वर्तमानातील ज्वलंत वास्तवाशी जोडणाऱ्या वैचारिक संवादांसाठी ओळखले जातात. त्यांचे विद्यार्थी त्यांच्या व्याख्यानांचे वर्णन एका प्रवासासारखे करतात. त्यांच्या वर्गात इतिहास जिवंत होतो, प्रश्नांना महत्त्व दिले जाते आणि शांत राहण्याचा पर्याय कोणाकडेच नसतो.

आपल्या या प्रवासाविषयी बोलताना डॉ. झेहरा म्हणतात, "मी नेहमीच हेच स्वप्न पाहिले होते. हाच माझ्यासाठी सर्वोत्तम व्यवसाय असल्याने मी माझे हे स्वप्न पूर्ण केले. माझ्या आईने मला नेहमीच सांगितले होते की, जर तुम्ही शिक्षकी पेशा निवडला तर तुम्ही येणाऱ्या अनेक दशकांचा पाया मजबूत करत असता. अध्यापन हे सर्वात मोठे, समाजाला सर्वाधिक योगदान देणारे आणि आत्मिक समाधान देणारे काम आहे. एक अभ्यासक म्हणून प्रगती करताना तुम्ही शिकवता आणि सोबतच बरेच काही शिकतही जाता. हे अत्यंत उत्साहवर्धक काम आहे. हीच सर्वात मोठी राष्ट्रीय, जागतिक आणि मानवतावादी सेवा आहे."
 

मुंबई विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या डॉ. झेहरा यांचा शैक्षणिक पाया भारतातील दोन अत्यंत प्रतिष्ठित संस्थांमध्ये रचला गेला आहे. तरीही त्यांचे बौद्धिक काम कधीही राष्ट्रीय सीमांमध्ये मर्यादित राहिले नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना दोनदा प्रतिष्ठित 'इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप प्रोग्राम' (IVLP) ही फेलोशिप देऊन सन्मानित केले आहे. त्यांनी जागतिक मंचावर भारतीय शैक्षणिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले असून अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये अनेक शैक्षणिक व व्यावसायिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय अनुभवांमुळे त्यांच्या ज्ञानाची कक्षा अधिक रुंदावली. सोबतच आंतर-सांस्कृतिक संवाद आणि जागतिक सहकार्यावरील त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला.

परंतु, डॉ. झेहरा यांचे योगदान केवळ व्याख्यानगृहे आणि संशोधन चर्चासत्रांपुरते मर्यादित नाही. त्या लैंगिक समानता, महिलांचे अधिकार आणि हिंसक अतिरेकाविरुद्धच्या लढ्यातील एक अत्यंत खंबीर आवाज म्हणून पुढे आल्या आहेत. लैंगिक संवेदीकरण आणि कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (POSH) या विषयांवरील त्यांच्या मुख्य भाषणांना देशभरातील सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांकडून मोठी मागणी असते. त्यांच्या शब्दांमध्ये अभ्यासपूर्ण खोली आणि नैतिक विचारांची ताकद असते. याच गुणांमुळे सार्वजनिक धोरणे आणि सामाजिक जाणिवांना आकार देणाऱ्या चर्चांमध्ये त्यांचा आवाज अत्यंत आदराने ऐकला जातो.

सार्वजनिक सेवेप्रती असलेली त्यांची वचनबद्धता अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थांमधील त्यांच्या सहभागातून दिसून येते. त्या 'राष्ट्रीय उर्दू भाषा संवर्धन परिषद' च्या धार्मिक आणि सांस्कृतिक पॅनेलच्या सदस्या म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून त्या भारताच्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. यापूर्वी त्यांनी या संस्थेच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीमध्येही काम केले आहे. तिथे त्यांनी संस्थात्मक जबाबदारी आणि कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
 

त्यांच्या शैक्षणिक कार्याची आणि सार्वजनिक सेवेची दखल घेऊन त्यांना अनेक प्रतिष्ठित समित्यांवर नामांकित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी नुकतीच त्यांची ऐतिहासिक 'रामपूर रझा लायब्ररी' च्या प्रकाशन सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे. ही लायब्ररी इंडो-इस्लामिक बौद्धिक वारशाचा भारतातील सर्वात मौल्यवान साठा मानली जाते. याशिवाय जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांची 'डॉ. के. आर. नारायणन सेंटर फॉर दलित अँड मायनॉरिटीज' च्या केंद्रीय संशोधन समितीवर बाह्य सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. हा निर्णय त्यांच्या शैक्षणिक निर्णयक्षमतेवर आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनावर टाकलेला मोठा विश्वास दर्शवतो.

एक लेखिका म्हणून डॉ. झेहरा यांचा प्रभाव भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये पाहायला मिळतो. त्यांनी लिहिलेली २० हून अधिक शैक्षणिक पुस्तके उच्च शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. ही पुस्तके असंख्य विद्यार्थी आणि संशोधकांच्या ज्ञानात भर घालत आहेत. अण्णामलाई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय पीएचडी संशोधन पॅनेलवरील त्यांच्या भूमिकेतून त्यांचे संशोधन कार्य सातत्याने पुढे जात आहे. तिथे त्या नवोदित संशोधकांना मार्गदर्शन करतात आणि जागतिक स्तरावर ज्ञानाच्या देवाणघेवाणीत हातभार लावतात.

'टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया' मधील व्याख्यानांपासून ते 'मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी', केरळमधील विद्यापीठे, काश्मीरमधील शैक्षणिक केंद्रे आणि देशभरातील सांस्कृतिक संस्थांपर्यंत डॉ. झेहरा आपले काम सातत्याने करत आहेत. त्या विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधून आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करत आहेत.
 

एवढे सगळे असूनही डॉ. सय्यद मुबीन झेहरा यांची खरी ओळख त्यांनी भूषवलेली पदे, मिळालेले पुरस्कार किंवा त्यांनी सेवा दिलेल्या संस्था यावरून होत नाही. त्यांची खरी ओळख ही भारताचे अजरामर तत्त्वज्ञान असलेल्या 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच संपूर्ण जग हेच एक कुटुंब आहे, यावरील त्यांच्या अतूट विश्वासातून होते. आजच्या काळात जिथे जगभरात भेदभावाचे चित्र पाहायला मिळते, तिथे त्या मानवता, समानता आणि सामायिक भविष्याचा विचार करून आपले अध्यापन, लेखन आणि भाषणांचे कार्य अविरतपणे पुढे नेतात.

डॉ. सय्यद मुबीन झेहरा यांनी केवळ यशाची शिखरेच सर केली नाहीत, तर त्यांनी इतरांसाठी प्रगतीची दारेही खुली केली आहेत. त्यांच्या याच वाटेवरून आता इतर असंख्य लोक पूर्ण आत्मविश्वासाने, धैर्याने आणि आशेने पुढे वाटचाल करत आहेत.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter