CHILD SEXUAL ABUSE: इंस्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाचा कंटेंट; केंद्र सरकार मेटा कंपनीला बजावणार समन्स

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
बाल लैंगिक शोषण प्रमोट करणाऱ्या जाहिरातींवरून मेटा केंद्राच्या रडारवर
बाल लैंगिक शोषण प्रमोट करणाऱ्या जाहिरातींवरून मेटा केंद्राच्या रडारवर

 

नवी दिल्ली

इंस्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित (CSAM) साहित्य प्रमोट करणाऱ्या जाहिराती आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात मेटा (Meta) कंपनीला समन्स बजावण्याचे निर्देश दिले आहेत. मेटाकडून या गंभीर त्रुटीबाबत स्पष्टीकरण मागितले जाणार आहे.

मेटाविरोधात सरकारची दुसरी कारवाई

गेल्या काही दिवसांत सरकारने मेटावर केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. बुधवारीच केंद्र सरकारने व्हॉट्सॲपच्या आगामी 'युजरनेम' फीचरबाबत मेटाला नोटीस बजावली होती. या फीचरमुळे ऑनलाइन फसवणूक, फिशिंग आणि डिजिटल अरेस्ट यांसारख्या सायबर गुन्ह्यांत वाढ होऊ शकते, अशी भीती सरकारने व्यक्त केली होती. जोपर्यंत सरकारचे समाधान होत नाही, तोपर्यंत हे नवीन फीचर थांबवण्याचे निर्देशही सरकारने दिले होते.

बीबीसीचा अहवाल आणि गंभीर त्रुटी

मेटाच्या रिकमेंडेशन अल्गोरिदममुळे बाल लैंगिक शोषणाचे व्हिडिओ प्रमोट केले जात असल्याचे एका बीबीसी (BBC) तपासात समोर आले होते. मेटाच्या जाहिरात धोरणांमध्ये नग्नता आणि लैंगिक स्पष्ट मजकुराला सक्त मनाई असतानाही, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अशा जाहिराती कशा दिसल्या, यावर सरकारने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मेटा हे एक 'सिग्निफिकंट सोशल मीडिया इंटरमीडिअरी' असल्याने आयटी कायद्यांतर्गत त्यांना आपल्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

या प्रकरणावर मेटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सरकार आता या गंभीर सायबर सुरक्षा त्रुटींची कसून चौकशी करण्याच्या तयारीत आहे.