नवी दिल्ली
स्वातंत्र्यदिनापूर्वी देशात मोठे घातपात घडवण्याचा पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय' (ISI) समर्थित शाहजाद भट्टी नेटवर्कचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. देशातील १४ राज्यांमध्ये एकाच वेळी राबवण्यात आलेल्या समन्वित मोहिमेत या दहशतवादी नेटवर्कच्या २०० हून अधिक ऑपरेटरना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिली.
दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण शून्य सहिष्णुतेचे (Zero Tolerance) असल्याचे स्पष्ट करत गृहमंत्री शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर या मोठ्या कारवाईची माहिती दिली. या दहशतवादी गटाकडून आयईडी, पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीचे मार्किंग असलेली ग्रेनेड्स, पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि हेरगिरीसाठी वापरले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत.
शाहजाद भट्टी नेटवर्क (SBN) हे पाकिस्तानस्थित दहशतवादी सिंडिकेट असून ते भारतभरात ग्रेनेड, आयईडी आणि पेट्रोल बॉम्ब हल्ले तसेच टार्गेट किलिंगमध्ये सामील होते. या नेटवर्कने पोलीस, संरक्षण आणि धार्मिक स्थळांची रेकी करण्यासाठी स्थानिक व्यक्तींना पैसे दिल्याचे उघडकीस आले आहे. एनआयए (NIA) या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, दिल्लीत ५१, उत्तर प्रदेशात ६२ आणि हरियाणामध्ये ५२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी देशभरात ८० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.