Asian Games 2026: भारताच्या महिला हॉकी संघाने रचला इतिहास, ४४ वर्षांनंतर पटकावले सुवर्णपदक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर आनंद साजरा करताना भारतीय महिला हॉकी संघ.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर आनंद साजरा करताना भारतीय महिला हॉकी संघ.

 

काकामिगहरा :

भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत ४४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. जपानच्या काकामिगहरा येथे शुक्रवारी खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या चीनचा १-0 असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता (Direct Berth) मिळवली आहे.

लालरेम्सियामीचा निर्णायक गोल आणि भक्कम बचाव

सामन्याच्या १० व्या मिनिटाला भारताकडून लालरेम्सियामी हिने शानदार 'टोमाहाक' गोल करत संघाला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल भारतासाठी निर्णायक ठरला.

या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय महिला संघाने आपली बचावात्मक रणनीती उत्तमरीत्या कायम राखली. चीनने त्यानंतर जोरदार आक्रमणे केली, परंतु अनुभवी गोलकीपर सविता पुनिया हिने पेनल्टी स्ट्रोक रोखत चीनचे मनसुबे उधळून लावले. संपूर्ण सामन्यात चिनी खेळाडूंनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण भारतीय डिफेन्सने प्रत्येक वेळी तोल सांभाळत विजय सुकर केला.

४४ वर्षांनंतर सुवर्णपदकाची पुनरावृत्ती

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीमध्ये भारताने यापूर्वी १९८२ मध्ये, जेव्हा हा खेळ पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आला होता, तेव्हा सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर १९९८ आणि २०१८ मध्ये भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आता तब्बल ४४ वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. पॅरिस ऑलिम्पिकचे रौप्यपदक विजेते असलेल्या चीनला या सामन्यात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर दक्षिण कोरियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव करत जपानने कांस्यपदक पटकावले.