मुंबई :
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्या नावाचा, प्रतिमेचा आणि आवाजाचा अनधिकृत गैरवापर रोखण्यासाठी बॉम्बे उच्च न्यायालयाने कठोर पावले उचलली आहेत. न्यायालयाने सोशल मीडियावरून सर्व डीपफेक आणि आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल पिठाने समंथा प्रभूने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. अभिनेत्रीने आपल्या व्यक्तिमत्त्व अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि विविध वेबसाइट्स तसेच सोशल मीडियावर तिच्या नावाचा, प्रतिमेचा आणि आवाजाचा सुरू असलेला गैरवापर थांबवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
सुनावणीदरम्यान अभिनेत्रीच्या वतीने छेडछाड केलेले फोटो, डीपफेक, एआय व्हॉईस जनरेशन, अश्लील व्हिडिओ आणि अभिनेत्रीची मानहानी करणारे इंटरएक्टिव्ह एआय चॅटबॉट्स यांसारख्या उल्लंघनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, समंथा प्रभूच्या व्यक्तिमत्त्व अधिकारांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य, गोपनीयता आणि मानवी आदराच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण लाभलेले आहे. प्रतिवादींच्या अशा कृत्यांमुळे अभिनेत्रीच्या या सर्व मौल्यवान अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या डीपफेकसह अभिनेत्रीच्या नावाचा, प्रतिमेचा आणि आवाजाचा अनधिकृत वापर असलेला आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.