ढाका
तिस्ता जलवाटप करारावरून भारतासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध बिघडवण्याची आमची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट प्रतिपादन बांगलादेशचे पाणी संसाधन मंत्री शहिदुद्दीन चौधरी अणी यांनी केले आहे. ढाका येथे आयोजित एका चर्चासत्रात बोलताना त्यांनी भारताला दोन्ही देशांच्या हितांचा समतोल राखण्याचे आवाहन केले आहे.
तिस्ता नदीच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. भारताचे जसे स्वतःचे हितसंबंध आहेत, तसेच आमचेही हितसंबंध आहेत, याची जाणीव शेजारी देशाने ठेवावी, असे अणी यांनी म्हटले आहे. मैत्रीत मित्राच्या हितसंबंधांचे रक्षण करणे गरजेचे असते, असे सांगत त्यांनी द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले.
उत्तर बांगलादेशमधील पूर, नदीची धूप आणि कोरड्या ऋतूमधील पाण्याचे संकट दूर करण्यासाठी बांगलादेश सरकार तिस्ता नदी सर्वसमावेशक व्यवस्थापन आणि पुनर्संचयित प्रकल्पावर भर देत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तर भागातील ५ ते ६ जिल्ह्यांतील नागरिकांच्या अपेक्षा जोडलेल्या असून, हा प्रकल्प पूर्ण करणे हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, चीनच्या सहकार्याने या प्रकल्पावर काम सुरू असल्यामुळे भू-राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान ५४ नद्या सामायिक असून, संयुक्त नदी आयोगाच्या माध्यमातून पाण्याचे प्रश्न सोडवले जात आहेत. १९९६ चा गंगा जलवाटप करार डिसेंबर २०२६ मध्ये संपत असताना, तिस्ता नदीचा प्रश्न दोन्ही देशांसाठी संवेदनशील बनला आहे.