नवी दिल्ली
अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून, मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांची १०० टक्के पोलीस पडताळणी (Police Verification) आणि चारित्र्य पडताळणी करण्याचा निर्णय श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने घेतला आहे. मंदिराच्या प्रशासकीय व्यवस्थेतही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
ट्रस्टने सर्व कर्मचाऱ्यांची सखोल माहिती मागवली असून, यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांसंबंधीची आणि नातेवाईकांची माहिती देखील समाविष्ट आहे. पोलिसांकडून जारी केलेले चारित्र्य प्रमाणपत्र आणि पोलीस पडताळणी सर्व कर्मचाऱ्यांसाठी आता बंधनकारक असणार आहे.
यावर्षी जून महिन्यात मंदिरात दागिन्यांच्या चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर ही कठोर सुरक्षा व प्रशासकीय पावले उचलण्यात आली आहेत. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. गेल्या आठवड्यात या प्रकरणात ७० हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
मंदिराचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी, निवृत्त एअर मार्शल जितेंदर मिश्रा यांनी गेल्या महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर ही कर्मचारी पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंदिर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून, याआधीचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा व गोपाल राव यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आले आहे. ट्रस्टचे सदस्य दिनेंद्र दास यांनी सांगितले की, ट्रस्टने घेतलेले सर्व निर्णय मंदिराशी संबंधित सर्वांना मान्य असतील आणि पूजाअर्चा सुरळीत सुरू आहे