आमीर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा; ५ जुलैला घरीच होणार खासगी विवाह सोहळा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 Months ago
अभिनेता आमीर खान आणि गौरी स्प्रॅट
अभिनेता आमीर खान आणि गौरी स्प्रॅट

 

मुंबई

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अभिनेता आमीर खान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. आमीर खान आपली जोडीदार गौरी स्प्रॅटसोबत ५ जुलै रोजी विवाह करणार असून, हा सोहळा अत्यंत खासगी स्वरूपात पार पडणार असल्याचे खुद्द अभिनेत्यानेच स्पष्ट केले आहे.

खासगी विवाह सोहळा

गुरुवारी सायंकाळी 'प्रितम और पेड्रो' या आगामी वेब सीरिजच्या स्क्रीनिंगला आमीर खान उपस्थित होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्याने आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केली. आमीर म्हणाला, "५ जुलै रोजी मी विवाह करत आहे. हा सोहळा माझ्या घरी अत्यंत जवळचे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडेल. सर्वांचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत आणि आमचा प्रवास सुखाचा व्हावा, अशी इच्छा आहे." यावेळी आमीरसोबत त्याचा मुलगा जुनैद खान उपस्थित होता.

आमीर आणि गौरीची ओळख

आमीर खानचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याचे निर्माता रीना दत्ता आणि दिग्दर्शिका किरण राव यांच्याशी लग्न झाले होते. आमीरने गेल्या वर्षी 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गौरी स्प्रॅटची ओळख माध्यमांशी करून दिली होती. गौरी ही मूळची बंगळुरूची असून, ती वेलनेस आणि ब्युटी क्षेत्रात काम करते. एका मुलाखतीत आमीरने सांगितले होते की, "आम्ही एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतो, परंतु दीड वर्षांपूर्वी आमचे नाते अधिक दृढ झाले आणि आमचा प्रवास नैसर्गिकरित्या सुरू झाला."

आमीर खान आणि गौरी स्प्रॅट या दोघांच्याही आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, त्यांच्या लग्नाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.