INDO-ISLAMIC ARTCHITECT: इंडो-इस्लामिक वास्तूंना ग्रेट बनवणारी वास्तुकलेची १० वैशिष्ट्यं

Story by  पुणे | Published by  Mrudgandha Dixit • 6 h ago
इंडो-इस्लामिक वास्तुकलेचे १० विशेष पैलू
इंडो-इस्लामिक वास्तुकलेचे १० विशेष पैलू

 

भारतातील ऐतिहासिक मशिदी, मकबरे आणि दर्गे पाहिले की त्यांच्या भव्यतेने डोळे दिपून जातात. भारताची प्राचीन पारंपारिक वास्तुकला आणि मध्य आशियातून आलेली पर्शियन-इस्लामिक शैली यांच्या सुरेख संगमातून 'भारतीय-इस्लामिक' (Indo-Islamic) वास्तुकलेचा जन्म झाला. देशातल्या ऐतिहासिक वास्तूंना हे जे अफाट सौंदर्य लाभलं आहे, त्यामागे काही विशिष्ट वास्तू-घटक आणि तांत्रिक बारकावे दडलेले आहेत. याच 'गंगा-जमुनी तहजीब'ची साक्ष देणाऱ्या वास्तुकलेची १० प्रमुख वैशिष्ट्यं कोणती, समजून घेऊया.

१. भव्य आणि गोलाकार घुमट (Domes)

घुमट हे इस्लामिक वास्तुकलेचं सर्वात प्रमुख आणि लक्षवेधी लक्षण आहे. सपाट छताऐवजी आकाशाला गवसणी घालणारे हे घुमट वास्तूला एक प्रकारची भव्यता देतात. मुघल काळात बांधल्या गेलेल्या जुन्या दिल्लीतील जामा मशिदीचे तीन पांढरे संगमरवरी घुमट असोत किंवा भोपाळच्या 'ताज-उल-मसाजिद'वरील भव्य घुमट; ते लांबूनच या वास्तूच्या अवाढव्य आकाराची जाणीव करून देतात.

२. आकाशाला भिडणारे मिनार (Minarets)

मशिदीच्या चारही कोपऱ्यांवर किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे असलेले उत्तुंग मिनार वास्तूचा डौल वाढवतात. अझान देण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे. दिल्लीच्या जामा मशिदीचे ४० मीटर उंचीचे लाल आणि पांढऱ्या पट्ट्यांचे मिनार, तसेच कोलकात्याच्या नाखोदा मशिदीवरील २५ छोटे मिनार, हे या रचनेचे उत्तम नमुने आहेत, जे इमारतीला रुबाबदार बनवतात.

३. नाजूक जाळीचे काम (Jali Work)

दगडावर कोरलेली जाळी हे भारतीय-इस्लामिक वास्तुकलेचं सुंदर वैशिष्ट्य आहे. या जाळ्यांमधून वास्तूच्या आत येणारा प्रकाश आणि हवा एक वेगळंच शांत वातावरण तयार करतात. अहमदाबादच्या सिदी सय्यद मशिदीतील पिवळ्या सँडस्टोनमध्ये कोरलेली 'ट्री ऑफ लाईफ'(कल्पवृक्ष) ही जाळी या कलेचा जागतिक मास्टरपीस आहे.

४. कॅलिग्राफी (Calligraphy)

इस्लामिक वास्तुकलेत मूर्ती किंवा मानवी आकृत्या कोरण्यावर निर्बंध असल्याने, वास्तू सजवण्यासाठी कॅलिग्राफीचा कलात्मक वापर केला गेला. भिंतींवर आणि कमानींवर कुराणातील वचने अचूकतेने कोरली गेली. अजमेरच्या 'अढाई दिन का झोपडा' या मशिदीच्या पिवळ्या दगडांच्या भव्य कमानींवर कोरलेली कॅलिग्राफी तत्कालीन कारागिरांच्या अप्रतिम कौशल्याची आणि सौंदर्यदृष्टीची साक्ष देते.

५. लाल वाळूचा खडक आणि संगमरवराचा सुबक वापर

या वास्तुकलेत प्रामुख्याने दोन दगडांचा वापर सर्वाधिक झाला. सुरुवातीच्या काळात लाल सँडस्टोनचा (वाळूचा खडक) मुबलक वापर झाला, तर शाहजहानच्या काळात पांढऱ्या संगमरवराला पसंती मिळाली. फतेहपूर सिक्रीची जामा मशीद लाल दगडाने सजलेली आहे, तर आग्र्याची 'मोती मशीद' शुद्ध पांढऱ्या संगमरवराने बनलेली असल्याने उन्हात एखाद्या मोत्यासारखीच चमकते. या दोन्ही रंगांचा एकत्र वापरही अनेक वास्तूंमध्ये कल्पकतेने केलेला दिसतो.

६. पिएट्रा ड्युरा आणि नक्षीकाम (Pietra Dura)

पांढऱ्या संगमरवरावर कोरून त्यामध्ये रंगीत, मौल्यवान खडे बसवण्याच्या या गुंतागुंतीच्या आणि खर्चिक कलेला 'पिएट्रा ड्युरा' किंवा जडावकाम म्हणतात. या नक्षीकामात वेली, फुले आणि भौमितिक आकार कोरले जातात. यामुळे पांढऱ्या शुभ्र वास्तूच्या भिंतींवर सजीवतेचा भास होतो. मशिदींच्या आणि दर्ग्यांच्या आतील खांबांवर किंवा मिहराबवर हे नाजूक काम पाहायला मिळतं.

७. भव्य कमानी आणि दरवाजे (Grand Arches and Gateways)

कमानी (Arches) या इमारतीला भक्कम आधार देतातच, शिवाय तिचं सौंदर्यही कैक पटींनी वाढवतात. मक्का मशिदीच्या (हैदराबाद) मुख्य दालनाला पेलणाऱ्या १५ भव्य कमानी असोत, किंवा सम्राट अकबराने फतेहपूर सिक्री इथे बांधलेला ५४ मीटर उंचीचा आकाशाला भिडणारा 'बुलंद दरवाजा' असो; हे दरवाजे आणि कमानी या स्थापत्यकलेची ताकद आणि साम्राज्याचं ऐश्वर्य दर्शवतात.

८. चारबाग शैली (Charbagh Style / Persian Gardens)

भारतीय-इस्लामिक वास्तुकलेत, विशेषतः मुघल काळात, केवळ मुख्य इमारतीवरच लक्ष केंद्रित न करता त्या सभोवतालच्या निसर्गालाही वास्तूचाच एक भाग मानलं गेलं. 'चारबाग' ही मूळची पर्शियन संकल्पना आहे. यामध्ये वास्तूच्या सभोवतालची बाग चार समान चौरसाकृती भागांमध्ये विभागली जाते. या चार भागांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी मध्यभागी पाण्याचे छोटे कालवे किंवा सुबक पायवाटा असतात.

इस्लामिक मान्यतेनुसार, हे चार भाग कुराणमध्ये वर्णन केलेल्या स्वर्गातील चार नद्यांचे (पाणी, दूध, मध आणि वाईन) प्रतीक मानले जातात. दिल्लीतील 'हुमायूनचा मकबरा' असो किंवा आग्र्याचा जगप्रसिद्ध 'ताजमहाल', या वास्तू याच चारबाग शैलीच्या मध्यभागी किंवा एका टोकाला वसवलेल्या आहेत. हिरवीगार झाडं, मध्यभागी खळाळणारे पाण्याचे कालवे आणि मुख्य वास्तू असा निसर्ग व स्थापत्यकलेचा सुरेख मेळ या इमारतींना खऱ्या अर्थाने 'स्वर्गीय' रूप देतो.

९. विस्तीर्ण प्रांगण (Spacious Courtyards / Sahn)

प्रार्थना करण्यासाठी हजारो लोकांना एकाच छताखाली एकत्र येता यावं, यासाठी या वास्तूंमध्ये अफाट लांबी-रुंदीचं सहन ठेवलेलं असतं. दिल्लीच्या जामा मशिदीच्या प्रांगणात एकाच वेळी २५,००० लोक, तर श्रीनगरच्या जामिआ मशिदीत ३३,००० लोक सामावून घेण्याची क्षमता याच प्रशस्त रचनेमुळे शक्य झाली आहे.

१०. पाण्याचे हौद आणि तलाव (Water Elements)

मशिदीच्या प्रांगणात मध्यभागी वझू खाना असणं, हे या वास्तुकलेचं अविभाज्य अंग आहे. प्रार्थनेपूर्वी शुद्धीकरणासाठी याचा वापर होतोच, पण हे पाणी वास्तूच्या परिसरातील हवा थंड ठेवण्यासही मदत करतं. भोपाळच्या ताज-उल-मसाजिदच्या अगदी शेजारी असलेला 'मोतिया तलाव' वास्तूच्या सौंदर्यात आणि तिथल्या शांततेत कशी भर घालतो, हे यातून उत्तमरीत्या दिसून येतं.

भारतीय आणि इस्लामिक कलांच्या या ऐतिहासिक देवाणघेवाणीतून तयार झालेली ही वास्तुकला शतकानुशतकं एकत्र नांदणाऱ्या दोन संस्कृतींची, इथल्या कारागिरांच्या कष्टाची आणि भारतातील 'विविधतेत एकता' या मूल्याची जिवंत पावती आहे.