राफा यास्मिन : रियालिटी शो गाजवणारी लिटील चॅम्प

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
राफा यास्मिन
राफा यास्मिन

 

शम्पी चक्रवर्ती पुरकायस्थ

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील हैदरपूर भागात राहणारी राफा यास्मिन आज एक प्रतिभावान गायिका नावारूपाला येत आहे. ती आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणेचे एक उत्तम प्रतीक बनली आहे. तिने आपल्या विलक्षण सांगीतिक प्रतिभेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. आता तिच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मालदा जिल्हा पोलिसांनी तिची सायबर सुरक्षा सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.

राफाने आपल्या अत्यंत लहान वयातच सिद्ध केलय की, प्रतिभा, चिकाटी आणि जबाबदारीची जाणीव एकत्र आल्यास यशाचा मार्ग खूप सुकर होतो. राफाचा जन्म १६ फेब्रुवारी २००९ रोजी झाला. तिचे संगीताशी असलेले नाते अगदी लहानपणापासूनच जोडले गेले होते. तिने वयाच्या अवघ्या अडीच वर्षांपासून संगीताचे रीतसर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिने भारतीय शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत आणि नझरुल गीतीचे आपले प्राथमिक धडे मालदामध्येच गिरवले. लहानपणापासूनच तिने विविध स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली कला दाखवण्यास सुरुवात केली होती.
 

राष्ट्रीय पातळीवर राफाला पहिले मोठे यश ऑल इंडिया टॅलेंट सर्च अँड मेरिट टेस्ट स्पर्धेतून मिळाले. या स्पर्धेत तिने एकापेक्षा जास्त श्रेणींमध्ये सुवर्णपदके पटकावली. रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतींशी जोडल्या गेलेल्या ऐतिहासिक जोरासांको ठाकूर बारीच्या मंचावर सादरीकरण करणे आणि पुरस्कार मिळवणे हा तिच्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण ठरला.

२०१९ मध्ये सुपर सिंगर जुनियर या लोकप्रिय बंगाली टेलिव्हिजन रियालिटी शोमधील सहभागामुळे राफा घराघरांत पोहोचली. तिच्या सुमधुर आवाजाने आणि आत्मविश्वासाने भरलेल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर २०२० मध्ये स्टार प्लस वाहिनीवरील तारे जमीन पर या शोमध्ये भाग घेऊन तिने देशभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. शंकर महादेवन आणि जोनिता गांधी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत तिने केलेले सादरीकरण तिच्या लोकप्रियतेत आणखी भर घालणारे ठरले.
 

राफाच्या सांगीतिक प्रवासाला सर्वात मोठे आणि महत्त्वाचे वळण २०२२ मध्ये मिळाले. तिने सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या शोमध्ये भाग घेतला होता. मुंबईच्या त्या भव्य मंचावर तिच्या अनोख्या आवाजाने, शास्त्रीय संगीताच्या पक्क्या पायाने, आधुनिक सादरीकरणाने आणि मंचावरील तिच्या प्रभावी वावराने परीक्षक आणि प्रेक्षक या दोघांनाही भुरळ घातली. 

कुमार सानू आणि जीत गांगुली यांसारख्या दिग्गज गायकांनी तिच्या प्रतिभेचे भरभरून कौतुक केले. या प्रवासात तिला बक्षीस म्हणून मिळालेली गिटार तिची एक अविस्मरणीय आठवण बनली. या स्पर्धेत तिने पाचवे उपविजेतेपद म्हणजेच सहावे स्थान मिळवले असले तरी लोकांच्या मनात मात्र तिने खूप मोठे स्थान निर्माण केले.
 

मुंबईहून मालदा येथे परतल्यानंतर राफाचे स्वागत पाहण्यासारखे होते. सामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येकाने पुढे येऊन तिचा सत्कार केला. राज्याच्या मंत्री सबीना यास्मिन यांनी राफाच्या घरी जाऊन तिचा विशेष सन्मान केला. एकेकाळी ए. बी. ए. गनी खान चौधरी यांनी मालदा गावाला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली होती, अगदी तसेच काम आता राफा आपल्या संगीताच्या माध्यमातून करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

राफाचे यश केवळ टेलिव्हिजनच्या मंचापुरते मर्यादित राहिले नाही. तिने भारतीय शास्त्रीय संगीत, पॉप, रॉक आणि लोकसंगीत अशा विविध प्रकारांमध्ये स्वतःला उत्तम प्रकारे घडवले आहे. थेट संगीत मैफिली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वतःच्या गाण्यांच्या अल्बमच्या माध्यमातून तिने आपली लोकप्रियता अधिकच वाढवली आहे. तिच्या चाहत्यांनी तिला 'मेलडी क्वीन', 'रॉकस्टार' आणि 'एक्स्प्रेशन क्वीन' अशा पदव्या देऊन तिचा गौरव केला आहे.
 

या यशाच्या प्रदीर्घ प्रवासात २०२५ मध्ये तिच्या आयुष्यात एक नवीन सामाजिक जबाबदारी आली. मालदा जिल्हा पोलिसांनी तिची 'सायबर सुरक्षा सदिच्छा दूत' म्हणून अधिकृत नियुक्ती केली. आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन फसवणूक आणि सोशल मीडियावरील धोके झपाट्याने वाढत आहेत. अशा काळात राफासारख्या लोकप्रिय तरुण चेहऱ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तिच्या लोकप्रियतेचा आणि सोशल मीडियावरील प्रभावाचा वापर करून सायबर जागरूकतेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

राफा यास्मिनची जीवनकहाणी एक गोष्ट प्रकर्षाने सिद्ध करते. एखादा कलाकार हा केवळ मनोरंजनाचे साधन नसतो, तर तो सामाजिक बदलाचे एक भक्कम माध्यम देखील बनू शकतो. तिने आपल्या संगीताच्या गोडव्याने जशी कोट्यवधी लोकांची मने जिंकली, अगदी तसेच आता ती एक जबाबदार नागरिक म्हणून समाजाला अधिक सुरक्षित आणि जागरूक करण्याचा संदेश देत आहे.

आज मालदाची ही तरुण मुलगी खऱ्या अर्थाने तिच्या जिल्ह्याचा, संपूर्ण बंगालचा अभिमान ठरली आहे. तरुण पिढीसाठी आपले स्वप्न पूर्ण करण्याचे ती एक चमकते उदाहरण बनली आहे. तिच्या आवाजात जेवढी ताकद आहे, तेवढीच तिच्या या प्रवासात चिकाटी, प्रतिभा आणि सामाजिक जबाबदारीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter