फराह हुसैन : राजस्थानच्या पहिल्या मुस्लिम महिला IRS सहआयुक्त

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
फराह हुसैन
फराह हुसैन

 

नीलम गुप्ता

आई रुखसाना हुसैन यांच्या कुटुंबात लष्करी अधिकाऱ्यांचा भरणा तर वडील अशफाक हुसैन यांच्या कुटुंबात आयएएस अधिकाऱ्यांचा बोलबाला. अशा वातावरणात एखाद्या आयएएस अधिकाऱ्याशी लग्न तर सहज झाले असते. पण फराह हुसैन यांनी कोणा आयएएस अधिकाऱ्याची पत्नी म्हणून ओळख मिळवण्यापेक्षा स्वतः आयएएस अधिकारी होण्याचा निर्धार केला. त्यांनी तो पूर्ण करून दाखवला. 

२०१६ मध्ये दुसऱ्याच प्रयत्नात त्या यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. देशात २६७ वा क्रमांक पटकावला. आयकर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. राजस्थानच्या उदयपूरमधून सुरू झालेला हा प्रवास जोधपूर, जयपूर करत सध्या भरतपूरपर्यंत पोहोचला आहे. तिथे त्या सध्या सहआयुक्त म्हणजेच 'जॉइंट कमिश्नर' म्हणून कार्यरत आहेत. त्या रेंज प्रमुख असून चार जिल्हे त्यांच्या अखत्यारीत येतात.

"मला विभागात काम करताना कधीही कोणतीही अडचण आली नाही. कुठल्याही ठिकाणी सर्वच सहकाऱ्यांनी उत्तम पाठिंबा दिला. पण आमच्या विभागात महिलांची संख्या फार कमी आहे, हे मी नक्कीच अनुभवते. वरिष्ठ असो वा कनिष्ठ, दोन्ही स्तरांवर महिलांचे प्रमाण कमी आहे," असे फराह म्हणतात.

तुमच्या या पदावरील उपस्थितीमुळे काही बदल घडून येईल का? या विभागात इतक्या उच्च पदावर पोहोचणाऱ्या तुम्ही राजस्थानच्या पहिल्या मुस्लिम महिला आहात. मुलींवर बंधने तर प्रत्येक समाजात असतात, पण मुस्लिम समाजात ती जरा जास्तच दिसतात. अशा परिस्थितीत तरुण मुली तुमच्याकडे पाहून प्रेरित होतात का?

यावर फराह सांगतात, "मी ठामपणे काही सांगू शकत नाही. आमच्या स्वतःच्या घरात उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांची कमतरता नाही. तरीही संपूर्ण खानदानात सेवेत येण्याचा निर्णय घेणारी मी पहिलीच मुलगी होते. उच्च शिक्षण तर सर्वांनीच घेतले होते. हा शेवटी ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न असतो. पण हो, शासकीय कार्यालयांमध्ये महिला उच्च पदांवर आल्याने समाजात काही सकारात्मक बदल नक्कीच घडतात."
 

वडील अशफाक हुसैन यांचे मूळ कुटुंब राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील नवा गावचे रहिवासी. पण आरएएस अधिकारी (नंतर आयएएस पदावर पदोन्नती झाली) झाल्यानंतर त्यांची नियुक्ती अजमेर येथे झाली. फराह यांचे बहुतांश शालेय शिक्षण अजमेरमधीलच इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये झाले. त्यानंतर त्या कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेल्या. तिथल्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी पाच वर्षांचा बी.एल.एस. एल.एल.बी. (B.L.S. L.L.B.) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महेश जेठमलानी, न्यायमूर्ती रोहल दलवी, 'ट्रायलीगल' ही लॉ फर्म आणि अशोक प्रताप अँड कंपनी यांसारख्या देशातील नामवंत वकील आणि कंपन्यांसोबत काम केले. त्यांनी स्वतःची स्वतंत्र वकिली सुरू केली नाही. कारण त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. 'करायचेच असेल तर आयएएस अधिकारी बनून दाखव', असा सल्ला वडीलही नेहमी द्यायचे. स्वतः फराह यांचेही हेच स्वप्न होते.

त्यामुळे त्या मुंबई सोडून घरी परतल्या आणि त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय आयएएस परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात फार चांगले गुण मिळाले नाहीत. पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी २६७ वा क्रमांक पटकावला. या रँकनुसार २०१६ मध्ये त्यांची नियुक्ती इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस (आयआरएस) विभागात झाली. खूप मेहनत करावी लागली, पण मेहनतीची सवय त्यांना सुरुवातीपासूनच होती.

फराह सांगतात, "माझ्याबाबत कुटुंबात चर्चा झाल्याच नाहीत, असे मुळीच नाही. खेड्यात राहणाऱ्या आमच्या नातेवाईकांना माझे मुंबईला जाऊन शिक्षण घेणे आवडले नव्हते. 'मुलीला बाहेर पाठवून ठीक केले नाही, आता लग्नात अडचणी येतील', असे नातेवाईक म्हणायचे. पण मी किंवा माझ्या कुटुंबाने अशा बोलण्याकडे कधीच लक्ष दिले नाही. लग्नाचा विचारही माझ्या मनात कधी आला नाही. 'लग्नाचे काय, ते तर कधीही होईल' असेच मला वाटायचे. शिक्षण घेणे आणि स्वतः पायावर उभे राहणे जास्त महत्त्वाचे होते. त्यासाठी मी जीवापाड मेहनत केली."

त्यांचे विचार अगदी योग्य ठरले. २०१६ मध्ये त्या अधिकारी बनल्या आणि २०१७ मध्ये आयएएस अधिकारी कमर उल जमान चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

"सासरी मला कधीही त्रास झाला नाही. सासूबाई माझ्याकडून घरातील कामांची अजिबात अपेक्षा ठेवत नाहीत. उलट त्या मला कामाला हात लावण्यास नकार देतात. मला स्वयंपाक करायला आवडतो, म्हणून मी माझ्या मर्जीने ते काम करते. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघांच्या शिक्षणाची काळजी मीच घेते," असे फराह सांगतात.

दोन्ही मुले सध्या खूप लहान आहेत. 'मुलीने मोठे होऊन काय बनावे', याचा विचार फराह सध्या करत नाहीत. "माझ्या दोन्ही मुलांनी उत्तम शिक्षण घेऊन चांगले माणूस बनावे, एवढीच माझी इच्छा आहे. आयुष्यातील निर्णय ते स्वतःच घेतील, जसा मी घेतला. माझ्या निर्णयाला जसा कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाला, तसाच पाठिंबा माझ्या मुलांनाही मिळेल," असा विश्वास त्या व्यक्त करतात.
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter