भारतातील या मंदिरात गेल्या ४० वर्षांपासून मुस्लिमांसाठी तयार केला जातो इफ्तार

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
वल्लाज मस्जिद परिसर
वल्लाज मस्जिद परिसर

 

भक्ती चाळक

रमजानचा पवित्र महिना सुरू झाला की चेन्नईच्या मैलापूर परिसरात सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळते. येथील सुफीदार मंदिरात गेल्या ४० वर्षांपासून रमजानमध्ये मुस्लिमांसाठी इफ्तारची मेजवानी दिली जाते. अनेक वर्षांपासून चालत असलेली ही प्रथा धार्मिक सीमांच्या पलीकडे जाऊन जपलेली माणुसकी, करुणा आणि सामायिक श्रद्धेचे अनोखी उदाहरण आहे. 

फाळणीच्या जखमेवर फुंकर घालणारी सुरुवात

या आगळ्यावेगळ्या परंपरेची मुळे इतिहासात दडलेली आहेत. १९४७ च्या फाळणीनंतर सिंध प्रांतातून निर्वासित म्हणून आलेले दादा रतनचंद यांनी चेन्नईमध्ये आश्रय घेतला. त्यांनी सुफी प्रेरणेतून या मंदिराची पायाभरणीच केली नाही, तर मुस्लिमांसाठी इफ्तार देण्याची प्रथाही सुरू केली. सुफीदार मंदिर ट्रस्टचे स्वयंसेवक आणि सदस्य ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने पुढे चालवत आहेत.

दररोज हजारो लोकांसाठी शाकाहारी मेजवानी

दररोज सकाळी ७:३० वाजल्यापासूनच स्वयंसेवकांची लगबग सुरू होते. सुमारे १,२०० लोकांसाठी पूर्णपणे शाकाहारी इफ्तार तयार केला जातो. रोजच्या मेनूमध्ये वैविध्य असते. यामध्ये व्हेज बिर्याणी, चणा राईस, पुलाव, फ्लॉवर राईस, भाज्यांचे लोणचे, केशर दूध आणि ताजी फळे यांचा समावेश असतो. सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत हे सर्व पदार्थ ऐतिहासिक वल्लाज मस्जिद येथे नेले जातात. 

१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात अर्कोट राजघराण्याने वल्लाज मस्जिद या भव्य मस्जिदची उभारणी केली होती. अर्कोटचे नवाब नवाब अब्दुल अली यांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे. “भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात धर्मांबद्दलचा परस्पर आदर अत्यंत महत्वाचा आहे.” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

संस्कृतींचा मिलाफ 

इफ्तार वाढताना सुफीदारचे हिंदू स्वयंसेवक डोक्यावर पारंपारिक गोल टोपी परिधान करतात. जेवण वाढण्यापूर्वी ते स्वतः रोजेदारांना पाणी आणि खजूर देतात.  माध्यमांशी बोलताना सुफीदार मंदिराचे स्वयंसेवक हरीश मक्कर म्हणाले, “आम्ही दररोज मेनू बदलतो आणि व्हेज बिर्याणी, चणा राईस, पुलाव असे विविध पदार्थ देतो. दररोज मस्जिदीत साधारण १००० ते १२०० मुस्लिम बांधव उपवास सोडण्यासाठी एकत्र येतात. सुफीदारचे सेवादार गेल्या चार दशकांपासून ही सेवा अतिशय श्रद्धेने करत आहेत.”

भारताच्या विविधतेचे प्रतिबिंब

सुफीदार मंदिराच्या आत नजर टाकली तर तिथे हिंदू आणि मुस्लिम संतांच्या प्रतिमांसोबतच येशू ख्रिस्त, मदर मेरी आणि गुरु नानक यांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. हे मंदिर खऱ्या अर्थाने भारताच्या विविधतेचे दर्शन घडवते. केवळ रमजानच नाही, तर प्रत्येक पौर्णिमेलाही येथे अन्नदान केले जाते. तसेच गरजूंच्या घरी अन्न पाठवण्याची परंपराही येथे जपली जाते.

आजच्या काळात लोक वैचारिक, राजकीय आणि प्रादेशिक सीमांमध्ये विभागले जात असताना, मैलापूरचे हे सुफीदार मंदिर खऱ्या अर्थाने भारताच्या विविधतेत एकतेचे प्रतिक ठरले आहे. राजकीय ध्रुवीकरणाच्या युगात, गेली ४० वर्षे अविरत सुरू असलेला हा उपक्रम सामाजिक सलोख्याचे अनोखे उदाहरण आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter