अदिती भादुरी
पाकिस्तान सध्या संयुक्त अरब अमिरातीकडून (UAE) घेतलेल्या ३.५ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करण्याच्या प्रक्रियेत आहे. या निर्णयाची घोषणा होताच, पाकिस्तानी सिनेटर मुशाहिद हुसेन यांनी युएईची चेष्टा केली. युएईला त्यांनी एक असहाय राष्ट्र म्हटले आणि असा दावा केला की, पाकिस्तान्यांनीच अक्षरशः युएईची उभारणी केली आहे. इतकेच नाही तर, त्यांनी युएई आणि भारताच्या वाढत्या मैत्रीवरही टीका केली.
ते म्हणाले, "मी युएईमधील माझ्या बांधवांना प्रेमाचा सल्ला देतो की, साहेब, तुमची लोकसंख्या फक्त एक कोटी आहे, ज्यापैकी ४५ लाख भारतीय आहेत. भारताशी वाढणाऱ्या तुमच्या मैत्रीबाबत सावध राहा. मला आशा आहे की तुम्ही भारताच्या अखंड भारत मोहिमेचे लक्ष्य बनणार नाही."
दरम्यान आता सौदी अरेबियाने पाकिस्तानला हे कर्ज फेडण्यासाठी मदत केली आहे. या घडामोडींमुळे या प्रदेशातील छुपा संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. हे संपूर्ण प्रकरण नीट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात डोकावून पाहावे लागेल.
या संघर्षातील सर्वात महत्त्वाची ठरणारी गोष्ट म्हणजे युएई आणि पाकिस्तानमधील वाढता दुरावा. याची सुरुवात साधारण दशकापूर्वी झाली, जेव्हा युएईला दहशतवाद आणि आपल्या सत्तेच्या सुरक्षिततेबद्दल भीती वाटू लागली. इराण हा त्यांचा पारंपारिक शत्रू होताच, ज्याचे हस्तक संपूर्ण अरब जगात पसरलेले होते. त्यातच अरब स्प्रिंगच्या लाटेमुळे जुन्या सत्ता उलथवून लावल्या गेल्या, ज्यामुळे आखाती देश अधिकच धास्तावले.
२०१५ मध्ये जेव्हा हे लोण येमेनपर्यंत पोहोचले, तेव्हा इराण समर्थक हुथी बंडखोर आणि आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकार यांच्यात गृहयुद्ध सुरू झाले. या काळात सौदी अरेबिया आणि युएईने येमेनमधील सरकारच्या बाजूने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
त्या काळात पाकिस्तानने आखाती देशांना लष्करी आणि सुरक्षा सेवा देऊन त्यांच्याकडून मोठी आर्थिक मदत आणि गुंतवणूक मिळवली होती. पण जेव्हा येमेन युद्धात प्रत्यक्ष मदतीची वेळ आली, तेव्हा पाकिस्तानने चालढकल केली. देशांतर्गत तीव्र विरोध आणि शिया-सुन्नी वादाची भीती यामुळे तत्कालीन नवाज शरीफ सरकारला कोणताही ठोस निर्णय घेता आला नाही. यामुळे सौदी आणि युएई प्रचंड संतापले. जुन्या मित्रांमधील दुराव्याची हीच ती सुरुवात होती. नंतरच्या काळात सौदीने पाकिस्तानशी संबंध सुधारले असले, तरी युएईसोबतचे संबंध मात्र ताणलेलेच राहिले.
युएई हा लोकसंख्येच्या दृष्टीने छोटा देश आहे. तिथे राहणाऱ्या एकूण लोकांपैकी बहुतांश लोक हे परदेशी आहेत. युएईने मोठी शस्त्रास्त्रे खरेदी केली असली, तरी लष्करी ताकद म्हणून त्यांची गणना होत नाही. त्याऐवजी, युएईने स्वतःला आर्थिक, व्यापारी आणि दळणवळणाचे प्रमुख केंद्र म्हणून जगासमोर आणले आहे. या प्रगतीसाठी त्यांना स्थैर्य आणि सुरक्षा हवी आहे. म्हणूनच त्यांनी दहशतवादाविरोधात कडक भूमिका घेतली असून ते आपल्या भूमीवर कोणत्याही राजकीय मतभेदांना थारा देत नाहीत.
त्याचबरोबर, युएईने स्वतःची प्रतिमा एक सहिष्णू, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक मुस्लिम देश म्हणून तयार केली आहे. तिथे मंदिरे आणि चर्च उभारली जात असून धार्मिक सलोख्याला प्रोत्साहन दिले जात आहे.
दुसरीकडे, दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आणि तिथे वाढणारी धार्मिक कट्टरता यामुळे पाकिस्तान युएईसाठी चिंतेचा विषय ठरू लागला. ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेने या प्रदेशाकडे दाखवलेले दुर्लक्ष आणि पाकिस्तानकडून लष्करी मदत मिळण्याची नसलेली खात्री, यामुळे युएईने इतर शक्तींकडे धाव घेतली. यात भारताचे नाव आघाडीवर होते. लवकरच भारत-युएई संबंध बहरले आणि त्याचप्रमाणे सौदी अरेबिया व इतर अरब देशांशीही भारताची जवळीक वाढली.
ऑगस्ट २०१५ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएईचा पहिला दौरा केला, तेव्हा दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात सीमापार धोक्यांचा उल्लेख करण्यात आला. यामुळे दोन्ही देशांमध्ये दहशतवादविरोधी कारवाया आणि गुप्त माहितीची देवाणघेवाण सुरू झाली. भारताला हवे असलेले पाकिस्तानी नागरिक युएईकडून भारताच्या हवाली केले जाऊ लागले.
यात आणखी एक पेच निर्माण झाला तो म्हणजे सौदी अरेबिया आणि युएईमधील वाढत चाललेला अंतर्गत संघर्ष. येमेन युद्धापासून सुरू झालेला हा वाद आता अधिकच विकोपाला गेला आहे. सौदी अरेबिया आता तेल अर्थव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन स्वतःला या प्रदेशातील प्रमुख आर्थिक आणि व्यापारी केंद्र बनवू पाहत आहे. खरं तर, हे स्थान सध्या युएईकडे आहे. दुसरीकडे, युएईने इस्रायलशी अब्राहम करार करून सर्वांना चकित केले आणि प्रादेशिक संकेतांच्या विरोधात पाऊल उचलले. लिबियापासून सुदानपर्यंतच्या युद्धांमध्येही युएईचा सहभाग होता. आता ही दोन देशांमधील स्पर्धा पाकिस्तानच्या मुद्द्यावरूनही दिसून येत आहे.
इम्रान खान यांनी पाकिस्तानला अरब देशांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला होता, पण शरीफ कुटुंबाच्या सत्तेत परतण्यामुळे पुन्हा जुनी समीकरणे जुळू लागली. पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांनी आपला पहिला परदेश दौरा सौदी अरेबिया आणि युएईचा केला, ज्यातून त्यांच्या सरकारची पुढील दिशा स्पष्ट झाली. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना, शरीफ यांनी सौदी आणि युएईकडून आर्थिक मदतीचे आश्वासन मिळवले. दोन्ही देशांनी पुन्हा एकदा अब्जावधी डॉलर्सचे कर्ज आणि सवलतीच्या दरात तेल देऊन पाकिस्तानला मदतीचा हात दिला.
या मदतीच्या बदल्यात गेल्या वर्षी पाकिस्तान-सौदी सामरिक संरक्षण करार झाला. या करारानुसार, एकावर झालेला हल्ला हा दुसऱ्यावर झालेला हल्ला मानला जाईल. यामुळे युएई पाकिस्तानवर नाराज झाला, कारण आधीच येमेनच्या मुद्द्यावरून युएईचे सौदीशी मतभेद होते.
परंतु, युएईसाठी अधिक चिंतेची बाब म्हणजे इराण युद्धातील पाकिस्तानची तटस्थ भूमिका. या युद्धात युएईचे मोठे नुकसान झाले. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले, तेव्हा बदल्यात इराणने या प्रदेशातील अमेरिकन तळांना लक्ष्य केले. युएईमधील तळेही यात ओढले गेले, ज्यामुळे युएईच्या 'सुरक्षित व्यापारी केंद्र' या प्रतिमेला मोठा धक्का बसला.
इराणने अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांचा बदला म्हणून सर्व आखाती देशांना लक्ष्य केले असले तरी, भौगोलिकदृष्ट्या जवळ असल्यामुळे युएईला याचा मोठा फटका बसला आणि त्यांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले. या हल्ल्यांचा निषेध करण्याऐवजी पाकिस्तानने इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला. युएई संकटात असताना पाकिस्तानने घेतलेल्या या तटस्थ भूमिकेमुळे या दोन देशांमधील दरी अधिक रुंदावली. शिवाय, साधारण १४ लाख पाकिस्तानी लोक युएईमध्ये काम करतात, ज्यांच्याकडून मिळणारे परकीय चलन पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आपली लढाऊ विमाने सौदी अरेबियात तैनात केली. इस्लामाबादमध्ये झालेल्या शांतता चर्चेसाठी पाकिस्तानने युएईला निमंत्रण दिले नाही. उलट त्यांनी सौदी, तुर्की आणि इजिप्तसोबत चर्चा सुरू केली. विशेष म्हणजे, सध्या युएईचे सौदी आणि तुर्की या दोन्ही देशांशी मोठे राजकीय मतभेद आहेत.
या सर्व कारणांमुळे युएईने पाकिस्तानला दिलेले मोठे कर्ज परत मागून त्यांना अडचणीत आणले आहे. हा दुरावा येणाऱ्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाने ज्या तत्परतेने पाकिस्तानला हे कर्ज फेडण्यासाठी मदत केली, त्यावरून या प्रदेशातील नव्या राजकीय गटांची जुळवाजुळव स्पष्टपणे दिसून येते. नेहमीप्रमाणे, पाकिस्तान सध्या खूपच कठीण आणि पेचाच्या परिस्थितीत अडकला आहे.