लेबनॉन आणि इस्रायलमध्ये गुरुवारी १० दिवसांचा युद्धविराम लागू झाला. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन आठवड्याच्या शेवटी इराणसोबत पुन्हा चर्चा करू शकते असे सांगितले आहे. यामुळे सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेत इराणने पुढील दोन दशकांहून अधिक काळ अण्वस्त्रे सोडून देण्याचे संकेत दिले आहेत, असेही ट्रम्प म्हणाले. चर्चेतील हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि वादाचा मुद्दा होता.
दोन्ही देशांमधील हा युद्धविराम न्यूयॉर्कच्या वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल, अशी पोस्ट ट्रम्प यांनी यापूर्वी सोशल मीडियावर केली होती. राष्ट्राध्यक्षांनी उपाध्यक्ष जेडी वान्स, परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आणि जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष डॅन केन यांना इस्रायल आणि लेबनॉनसोबत काम करून शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याचे निर्देश दिले आहेत.
ट्रम्प आणि लेबनॉनच्या राष्ट्राध्यक्षांमधील दूरध्वनी चर्चा
लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केली. औन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच चर्चा असल्याचे लेबनॉनच्या दोन अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले. दोन्ही देशांचे नेते एकमेकांशी संवाद साधतील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.
मात्र, लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन नजीकच्या काळात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करणार नाहीत, असे लेबनॉनच्या तीन अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. गुरुवारी औन आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्यातील चर्चेपूर्वीच लेबनॉनच्या दूतावासाने अमेरिकन प्रशासनाला याबद्दल कल्पना दिली होती. औन हे नेतन्याहू यांच्याशी बोलणार नाहीत, असे दोन अधिकाऱ्यांनी सांगितले.
युद्ध सुरू करण्यास अमेरिकन सैन्य सज्ज: पीट हेगसेथ
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी गुरुवारी इशारा दिला आहे की, अमेरिका इराणच्या लष्करी हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. तेहरानने करार फेटाळल्यास अमेरिका पुन्हा लष्करी कारवाई करण्यास तयार आहे. इराणने चुकीचा मार्ग निवडला आणि करारावर स्वाक्षरी केली नाही, तर अमेरिकन सैन्य "युद्ध मोहिमेसाठी" सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या लष्करी मध्यस्थांनी अमेरिका आणि इस्रायलसोबतचे युद्ध संपवण्यासाठी इराणमध्ये प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी गुरुवारी इराणच्या संसद अध्यक्षांची भेट घेतली, असे इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने म्हटले आहे. काल इराण दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी मोहम्मद बगेर कालीबाफ यांची भेट घेऊन चर्चा केली.
इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चेच्या पुढच्या फेरीसाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही, असे पाकिस्तानने गुरुवारी स्पष्ट केले. या नवीन वाटाघाटी कुठे होतील याची माहिती इस्लामाबादकडे नाही. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय तेहरान आणि वॉशिंग्टन दरम्यानचे सर्व संवाद मार्ग खुले ठेवत आहे. सध्या अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचा लेबनॉन हा देखील एक भाग असल्याचे आश्वासन इस्लामाबादने दिले आहे.
बुधवारी इराणच्या सर्वोच्च लष्करी सल्लागाराने अमेरिकेला इशारा दिला होता. जमिनीवर आक्रमण करणाऱ्या सैनिकांना तेहरान ओलीस ठेवेल आणि 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मध्ये नाकेबंदी करणाऱ्या अमेरिकन जहाजांना बुडवून टाकेल, असे त्यांनी म्हटले. इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांचे मुख्य सल्लागार मोहसेन रेझाही म्हणाले की, अमेरिकन आर्मडातील युद्धनौका निश्चितपणे आमच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येऊ शकतात आणि आम्ही त्यांचा नाश करू शकतो.
दरम्यान, शांतता करारावर वाटाघाटी करण्यासाठी दोन्ही बाजूंना अधिक वेळ मिळावा म्हणून अमेरिका आणि इराण दोन आठवड्यांसाठी युद्धविराम वाढवण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केलेला सुरुवातीचा दोन आठवड्यांचा युद्धविराम पुढील आठवड्यात संपणार आहे. हाताशी वेळ कमी असल्याने दोन्ही बाजूंचे मध्यस्थ वादग्रस्त मुद्द्यांवर तांत्रिक चर्चा करत असल्याचे ब्लूमबर्गने म्हटले आहे.
पाकिस्तानी लष्करप्रमुख इराणमध्ये
गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार होऊ शकला नव्हता. ही चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर आणि गृहमंत्री मोहसीन नक्वी तेहरानमध्ये पोहोचले आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी X वर मुनीर यांचे स्वागत केले. चर्चेचे यजमानपद भूषवल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानचे आभार मानले आणि हे दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधांचे प्रतीक असल्याचे म्हटले.
पुढील चर्चा कधी होणार?
इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेची पुढची फेरी पुन्हा एकदा पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये होण्याची 'दाट शक्यता' आहे, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी सांगितले. मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. चर्चेच्या ठिकाणाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, "गेल्या वेळी जिथे चर्चा झाली होती, तिथेच पुढची फेरी होण्याची शक्यता आहे." मात्र, नंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, दुसऱ्या फेरीच्या ठिकाणाबाबत कोणतीही माहिती नाही आणि तारखाही ठरलेल्या नाहीत.
युद्धविराम वाढवण्यासाठी अमेरिकेने औपचारिक विनंती केल्याचे वृत्तही लेविट यांनी फेटाळून लावले. "आम्हाला कराराच्या शक्यतांबद्दल सकारात्मक वाटते. राष्ट्राध्यक्षांनी कालच्या मुलाखतीत तसा उल्लेख केला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या मागण्या मान्य करणे हे इराणच्या हिताचे आहे. त्यांनी वाटाघाटीतील आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. आम्ही या चर्चेचा ओघ कसा राहतो यावर लक्ष ठेवून आहोत," असे लेविट यांनी सांगितले.
हॉर्मुझमध्ये १० जहाजे रोखली
नौदल नाकेबंदीच्या पहिल्या ४८ तासांत इराणच्या बंदरातून बाहेर पडणारी १० जहाजे रोखली आहेत, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे. मंगळवारी इराणचा ध्वज असलेले एक मालवाहू जहाज बंदर अब्बास सोडून अमेरिकन नाकेबंदी टाळण्याचा प्रयत्न करत होते. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून बाहेर पडून ते इराणच्या किनारपट्टीवर जात होते. मात्र, गाईडेड-मिसाईल डिस्ट्रॉयर USS Spruance ने त्या जहाजाला अडवले आणि आता ते पुन्हा इराणकडे परतत आहे.
सोमवारी नाकेबंदी सुरू झाल्यापासून एकही जहाज पसार झालेले नाही आणि १० जहाजे परत पाठवली आहेत, असे सेंट्रल कमांडने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रॅकिंग डेटानुसार, किमान तीन जहाजांनी इराणी बंदरातून प्रवास सुरू करून सामुद्रधुनी ओलांडली होती, मात्र त्यातील काही जहाजे नंतर परतली.
तेलाच्या किमतीत घसरण
अमेरिका-इराण यांच्यातील नव्या चर्चेची शक्यता आणि युद्धविराम वाढण्याच्या आशेने गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली. ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.५ टक्क्यांनी घसरून ९४.४९ डॉलर प्रति बॅरलवर आले, तर अमेरिकन 'वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट' क्रूड फ्युचर्स ०.८ टक्क्यांनी घसरून ९०.५९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.