महाराष्ट्रातील जागतिक कीर्तीच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (TATR) मुख्य गाभा क्षेत्र (Core Area) ३० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. वन्यजीव संवर्धन आणि पावसाळ्यात पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे हा मान्सून बंदीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक पी. एन. शुक्ला यांनी यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली.
या ३ महिन्यांच्या कालावधीत मुख्य गाभा क्षेत्र बंद असले, तरी व्याघ्र प्रकल्पाचे सर्व बफर पर्यटन गेट्स आणि बफर पर्यटन क्षेत्र पर्यटकांसाठी खुली राहतील. मात्र, बफर झोनमधील पर्यटन हे त्या-त्या वेळच्या हवामानाची स्थिती आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांवर अवलंबून असेल, असेही शुक्ला यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात वन्यजीवांचा विणीचा हंगाम असतो, तसेच जंगलातील रस्ते निसरडे होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला जातो.
तिकीट बुकिंग वेबसाईट हॅक झाल्याचा दावा खोटा
ताडोबा प्रशासनाने प्रकल्पाचे ऑनलाईन तिकीट बुकिंग पोर्टल हॅक झाल्याच्या सोशल मीडियावरील अफवांचे जोरदार खंडन केले आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, एका अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन तिकिटांपैकी ८० टक्के तिकिटे बेकायदेशीरपणे विकली आहेत. क्षेत्र संचालक पी. एन. शुक्ला यांनी हा दावा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन असल्याचे सांगितले. या पोस्टचे स्वरूप बदनामीकारक असल्याने वनविभागाच्या वतीने पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पर्यटकांनी कोणत्याही अनधिकृत माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. सफारीच्या अधिकृत ऑनलाईन बुकिंगसाठी पर्यटकांनी केवळ मायताडोबा डॉट महाफॉरेस्ट डॉट जीओव्ही डॉट इन (mytadoba.mahaforest.gov.in) या शासकीय संकेतस्थळाचाच वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.