CBSE च्या पोर्टलवर सायबर हल्ला; अवघ्या २ मिनिटांत आले १५ लाख हिट्स

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १२ वीच्या परीक्षा निकालांवर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिका पडताळणीचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. मात्र, हे पोर्टल सुरू होताच त्यावर मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती सीबीएसई बोर्डाने दिली आहे. 

बोर्डाच्या सिस्टीममध्ये अडथळा आणण्यासाठी 'डिनायल ऑफ सर्व्हिस' (DoS) सारख्या सायबर हल्ल्यांचा वापर करण्यात आला. यामुळे अवघ्या दोन मिनिटांत पोर्टलवर तब्बल १५ लाख हिट्स आले, तर एक लाखाहून अधिक वेळा फाईल्सचा अनधिकृत ॲक्सेस मिळवण्याचा प्रयत्न झाला. हे सायबर हल्ले परतवून लावत बोर्डाने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. सध्या हे पोर्टल सुरळीत सुरू असून त्यावर एकाच वेळी ८ हजारांहून अधिक युजर्स सक्रिय आहेत, तसेच १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज यशस्वीरित्या सादर केले आहेत.

विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे सीबीएसईने आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आणखी सुधारणा केल्या आहेत. विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज करण्याचा प्रवास सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा यासाठी सेशनची वेळ मर्यादा वाढवण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती मिळाल्या आहेत आणि जे गुणांबद्दल असमाधानी आहेत, त्यांच्यासाठी २ जून ते ६ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत ही ऑनलाईन सुविधा खुली असणार आहे. मुदतीनंतर कोणताही ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

आधार पडताळणी आणि तांत्रिक त्रुटींवर उपाय
सुरक्षेचा उपाय म्हणून सीबीएसई बोर्डाने यावर्षी उत्तरपत्रिका पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करताना आधार-आधारित पडताळणी (Aadhaar-based verification) अनिवार्य केली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचे आधार कार्ड नाही, ते त्यांच्या पालकांचे किंवा पालकांच्या अनुपस्थितीत नातेवाईकांचे आधार तपशील वापरू शकतात. मात्र, ज्या व्यक्तीचे आधार कार्ड वापरले जाईल, त्यांचे नाव, जन्मतारीख आणि लिंग आधार कार्डवरील माहितीशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. 

विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून डिजिटल पद्धतीनेच फी भरायची आहे. उत्तरपत्रिकेतील त्रुटी जसे की, गहाळ झालेली पाने, अस्पष्ट पाने किंवा चुकीचा संच तपासला जाणे यासारख्या समस्यांसाठी प्रति उत्तरपत्रिका १०० रुपये शुल्क आकारले जाईल, तर पुनर्मूल्यांकनासाठी प्रति प्रश्न २५ रुपये शुल्क असेल.

विद्यार्थी एका विषयासाठी किंवा एकापेक्षा जास्त विषयांसाठी केवळ एकच अर्ज सादर करू शकतात. एकदा 'फ्रीज आणि प्रोसिड टू पेमेंट' बटणावर क्लिक केल्यानंतर माहिती लॉक होईल आणि त्यात कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे अंतिम मंजुरी देण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मार्गदर्शक व्हिडिओ
पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बोर्डाने वेबसाईटवर एक व्हिज्युअल गाईड आणि ट्युटोरिअल व्हिडिओ देखील उपलब्ध करून दिला आहे. खरं तर, हे पोर्टल आधी २९ मे रोजी सुरू होणार होते, परंतु ऑन-स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीबद्दल काही विद्यार्थी आणि पालकांनी तांत्रिक बिघाड, पेमेंट फेल्युअर आणि ॲक्सेस मिळण्यातील अडचणींबद्दल तक्रारी केल्यामुळे या प्रक्रियेला थोडा विलंब झाला. बोर्डाची तांत्रिक टीम सध्या पूर्णपणे सतर्क असून सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत आणि सुरक्षितपणे पूर्ण करून घेण्यासाठी काम करत आहे.