इराण युरेनियमचा साठा सोपवण्यास तयार? ट्रम्प यांची दाव्याने खळबळ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

इराणने समृद्ध युरेनियमचा साठा सोपवण्याचे मान्य केले असून गेल्या सहा आठवड्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवणारा करार लवकरच होऊ शकतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले.

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी या घडामोडीचे वर्णन वाटाघाटींमधील एक मोठा विजय म्हणून केले. "ते आम्हाला अणुधुळ (अण्वस्त्र बनवण्यासाठी वापरले जाणारे समृद्ध युरेनियम) परत देण्यास तयार झाले आहेत," असे ट्रम्प म्हणाले. वाशिंग्टनच्या मते या युरेनियमचा वापर अण्वस्त्रे तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. "करार होण्याची दाट शक्यता आहे," असेही त्यांनी पुढे नमूद केले.

अमेरिका आणि इराणमधील चर्चेची पुढची फेरी याच आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता असून वाटाघाटींना वेग आला असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. त्याच वेळी त्यांनी सध्याचा युद्धविराम वाढवण्याच्या गरजेबद्दल शंका व्यक्त केली. "हा युद्धविराम वाढवण्याची गरज आहे का, याबद्दल मी साशंक आहे," असे सांगतानाच तेहरानची भूमिका आता पूर्वीपेक्षा लवचिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"विश्वास बसणे कठीण असले तरी, सध्या इराणसोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत," असे ट्रम्प म्हणाले. "सुमारे चार आठवड्यांचा बॉम्बफेक आणि अत्यंत शक्तिशाली नाकेबंदी यामुळेच हे साध्य झाले असे मला वाटते," असेही त्यांनी नमूद केले.

गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेत इराणच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षेचा मुद्दा कळीचा ठरला होता. अमेरिकेने इराणच्या सर्व अण्वस्त्र उपक्रमांवर २० वर्षांच्या बंदीचा प्रस्ताव ठेवला होता. इराणने कायमस्वरूपी बंदीऐवजी ३ ते ५ वर्षांच्या बंदीचा पर्याय सुचवला असल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.

वाशिंग्टनने सर्व समृद्ध युरेनियम इराणबाहेर नेण्याचा आग्रह धरला असून, त्या बदल्यात स्वतःवर लादलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवण्याची मागणी तेहरानने केली आहे. दोन इराणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्ध युरेनियमच्या साठ्याबाबत तडजोडीची शक्यता निर्माण झाली आहे. तेहरान आता त्यांच्या साठ्यातील काही भाग देशाबाहेर पाठवण्याचा विचार करत असून, पूर्वी त्यांनी या गोष्टीला नकार दिला होता.

युद्धविरामाचे भवितव्य टांगणीला
ट्रम्प यांनी सकारात्मकता व्यक्त केली असली तरी, चर्चा फिस्कटल्यास पुन्हा युद्ध सुरू होऊ शकते असा इशाराही दिला आहे. "करार झाला नाही तर पुन्हा युद्ध सुरू होईल," असे सांगत त्यांनी युद्धविरामाच्या नाजूक स्थितीकडे लक्ष वेधले. हा युद्धविराम पुढील आठवड्यात संपणार आहे. इराण दोन महिन्यांपूर्वी ज्या गोष्टींना नकार देत होता, त्यासाठी आता तयार झाला आहे. वाढत्या दबावामुळेच इराणने ही माघार घेतल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

इस्लामाबादमध्ये करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता
जर इस्लामाबादमध्ये करारावर अंतिम स्वाक्षरी झाली, तर आपण स्वतः तिथे उपस्थित राहू शकतो, असे एक महत्त्वाचे विधान ट्रम्प यांनी केले. या वाटाघाटींमधील राजनैतिक महत्त्वाकडे त्यांनी यातून लक्ष वेधले आहे.

"जर इस्लामाबादमध्ये करारावर स्वाक्षरी झाली, तर मी तिथे जाईन," असे ट्रम्प म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या मध्यस्थीच्या भूमिकेचे भरभरून कौतुक केले. "फिल्ड मार्शलचे काम उत्कृष्ट राहिले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही मोठी भूमिका बजावली आहे, त्यामुळे मी तिथे जाईन. त्यांना मी तिथे असावे असे वाटते," असे ट्रम्प यांनी नमूद केले. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनीही चर्चेची पुढची फेरी पूर्वीच्याच ठिकाणी होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले होते.

इराणच्या मुद्द्यावरून पोप लिओ यांच्यावर टीका
इराणच्या धोक्याची दखल घेणे पोप लिओ १४ वे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत ट्रम्प यांनी या विषयाला जागतिक पातळीशी जोडले. "पोप यांनी हे समजून घेतले पाहिजे की इराणकडे अणुशस्त्र असू शकत नाही. तसे झाल्यास जग मोठ्या संकटात सापडेल," असे ते म्हणाले. इराण संघर्षावरून दोन्ही नेत्यांमध्ये सार्वजनिक मतभेद दिसून येत आहेत. पोप शांततेचे आवाहन करत असताना ट्रम्प मात्र कठोर भूमिकेचे समर्थन करत आहेत.

मूळचे शिकागोचे असलेले पोप लिओ यांनी शनिवारी शांततेचे आवाहन करताना युद्धाच्या वेडेपणावर टीका केली होती. ट्रम्प यांच्या विधानांचा विचार न करता आपण युद्धावर टीका करत राहू, असे त्यांनी सोमवारी रॉयटर्सला सांगितले होते. "पोप जे हवे ते बोलू शकतात आणि त्यांनी ते बोलावे असे मलाही वाटते, पण मी त्यांच्याशी असहमत असू शकतो. इराणकडे अण्वस्त्र असता कामा नये, असे माझे मत आहे," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.