सुफी संत इब्न अरबी यांनी सांगितलेले रोजाचे खरे मर्म

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

समीर दि. शेख 

रमजानचा मुकद्दस महिना सुरू झाला आहे. पण या महिन्यात एक अस्वस्थ करणारा सवाल स्वतःला नक्की विचारून पाहा. जर तुम्ही महिनाभर रोजा ठेवला, दररोज तरावीहची नमाज अदा केली, कुराणचे पठण केले आणि तरीही तुमच्या आत काहीच बदल घडला नाही तर?

दरवर्षी लाखो लोक रोजा ठेवतात. पण त्यातील काहीच लोक आध्यात्मिक उंची गाठतात. अनेक जण रमजानचा चंद्र दिसण्यापूर्वी जसे असतात, तसेच महिनाभरानंतरही राहतात.

महान सुफी तत्त्वज्ञ इब्न अरबी यांच्या मते, रोजाचा खरा अर्थ केवळ उपाशी राहण्यात नाही. फरक यात नसतो की तुम्ही किती वेळ उपाशी राहिलात, तर फरक यात असतो की तुम्ही स्वतःच्या आतले काय आणि किती शुद्ध केले.

इब्न अरबी सांगतात की रमजान म्हणजे केवळ शरीरावर नियंत्रण ठेवणे नव्हे. तो आपल्या 'नफ्स'चा (वासना आणि अहंकाराचा) सामना करण्याचा महिना आहे. हा मुकद्दस महिना एक आरसा आहे आणि तो तुमची खरी ओळख तुम्हाला दाखवतो.

त्यांनी रोजाचे तीन टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा म्हणजे केवळ पोटाचा रोजा, ज्यात माणूस अन्न आणि पाण्यापासून दूर राहतो. हा सर्वात सामान्य रोजा आहे.

दुसरा टप्पा म्हणजे आपल्या अवयवांचा रोजा. यात डोळे, कान, हात आणि जुबान (जीभ) यांना गुनाह करण्यापासून रोखले जाते. तुम्ही अन्नापासून तोंड बंद ठेवले, पण इतरांची निंदा करण्यापासून ते बंद ठेवले का? हा सवाल ते विचारतात.

तिसरा आणि सर्वात वरचा टप्पा म्हणजे हृदयाचा रोजा. यात माणसाचे हृदय दुनिया आणि दुनियेतील सर्व मोहांपासून अलिप्त होते. ते केवळ परवरदिगारच्या ध्यानात मग्न असते.

जर तुमचे पोट रिकामे असेल पण तुमची जुबान इतरांना घायाळ करत असेल, तर तुम्ही नक्की कशाची शुद्धी केली? पोटाला उपाशी ठेवले पण हृदयाला मत्सरापासून दूर ठेवले नाही, तर तो रोजा अपूर्णच राहतो.

जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो आणि तुम्हाला त्याला सडेतोड उत्तर द्यावेसे वाटते, तेव्हा तो राग गिळून गप्प राहणे म्हणजेच 'नफ्स'ला हरवणे होय. हा आतला लढा भुकेपेक्षाही कठीण असतो.

इब्न अरबी यांनी 'नीयत' म्हणजेच हेतू शुद्ध असण्यावर खूप भर दिला आहे. कोणतीही इबादत ही केवळ एक बाह्य आवरण असते, तिचा खरा आत्मा म्हणजे तुमची नीयत असते.

दोन माणसे मशिदीत खांद्याला खांदा लावून नमाज पढत असतील. पण त्यातील एक जण अल्लाहाच्या जवळ जात असतो आणि दुसरा तिथेच उभा असतो. कारण एकाचे हृदय ईश्वराला शोधत असते आणि दुसरा लोकांची वाहवा मिळवू पाहत असतो.

रमजानमध्ये इबादत वाढते आणि त्यासोबतच 'दिखावा' करण्याची संधीही वाढते. आपण रोजा ठेवलाय, आपण कुराण पूर्ण वाचले, आपण किती थकलो आहोत हे जगाला सांगण्याचा मोह माणसाला होतो.

इब्न अरबी अत्यंत मार्मिकपणे सांगतात की आपली इबादत ही आपली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. आणि ती लोकांपासून लपवून ठेवण्यातच तिचे खरे सौंदर्य दडलेले आहे.

या महिन्यात 'खामोशी' (मौन) ही सुद्धा एक मोठी इबादत आहे. रमजान हा केवळ अन्न कमी करण्याचा महिना नाही, तर तो आपल्या आयुष्यातील गोंगाट कमी करण्याचा महिना आहे.

मानवी हृदय एका आरशासारखे असते. सततचे बोलणे, वाद घालणे आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे यामुळे या आरशावर धूळ साचते.

जेव्हा तुम्ही तुमचे बोलणे कमी करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आतले आवाज ऐकू येऊ लागतात. एखादी व्यक्ती तुम्हाला डिवचते आणि तुम्ही त्याला उत्तर न देण्याचे ठरवता, ती तुमची खरी इबादत असते. नफ्सला शांत करण्यासाठी खामोशी हे एक मोठे हत्यार आहे.

अनेकदा इबादत वाढली की माणसाच्या मनात एक प्रकारचा 'धार्मिक अहंकार' निर्माण होतो. आपण इतरांपेक्षा जास्त इबादत करत आहोत, असा विचार मनात डोकावतो.

जो माणूस रोजा ठेवत नाही किंवा नमाज पढत नाही, त्याच्याकडे आपण तुच्छतेने पाहू लागतो. इब्न अरबी इशारा देतात की हा धार्मिक अहंकार एखाद्या उघड गुनाहापेक्षाही भयंकर असतो.

एखादा गुनाह केल्यावर माणसाला पश्चात्ताप तरी होतो. पण अहंकार माणसाला स्वतःच्याच नजरेत महान बनवतो. खरा रोजा माणसाला नम्र बनवतो, मगरूर नाही.

रमजान हा दुनियाच्या भौतिक मोहांपासून अलिप्त होण्याचे प्रशिक्षण देणारा महिना आहे. मोबाईलचे व्यसन, लोकांचे लक्ष वेधून घेण्याची सवय आणि सततच्या मनोरंजनापासून दूर राहण्याची ही एक मोठी संधी आहे.

रोजाच्या माध्यमातून मिळणारी भुकेची जाणीव ही परवरदिगारची एक मोठी देणगी आहे. भूक आपल्याला आपल्या मर्यादांची आणि ईश्वरावरील आपल्या अवलंबित्वाची जाणीव करून देते.

जगात असे लाखो लोक आहेत ज्यांना नाईलाजाने ही भूक दररोज सहन करावी लागते. त्यांच्या वेदनांची खरी जाणीव याच महिन्यात होते.

इफ्तारच्या वेळी जेव्हा पाण्याचा पहिला घोट घशाखाली जातो, तेव्हा मिळणारे समाधान आणि मनातील कृतज्ञतेची भावना हाच या उपवासाचा खरा अर्थ आहे.

सरतेशेवटी इब्न अरबी एक अत्यंत महत्त्वाचा सवाल करतात. जेव्हा रमजानचा महिना संपेल आणि ईदचा चांद दिसेल, तेव्हा तुम्ही तेच राहणार आहात का?

हा महिना केवळ तीस दिवसांचे एक वेळापत्रक नाही. ती आतून बदलण्याची एक संधी आहे. खरा विजय यात नाही की तुम्ही रमजानमध्ये किती इबादत केली. खरा विजय यात आहे की रमजान संपल्यानंतर तुम्ही कसे इंसान बनलात.

जर ईदच्या दिवसानंतरही तुमचा संयम, तुमची नम्रता आणि तुमची ईश्वराप्रती असलेली ओढ टिकून राहिली, तरच तुमचा रोजा खऱ्या अर्थाने कामी आला असे समजावे.

या रमजानमध्ये केवळ उपाशी राहू नका, तर स्वतःला आतून जागृत करा. एका नव्या आणि खऱ्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करा.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter