काश्मीर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींनी दिला खाद्य स्वातंत्र्याचा मंत्र!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देशातील खाद्य निवडीच्या स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला. स्वतःच्या भावनांचा अभिमान बाळगतानाच इतरांच्या आवडीनिवडीचा आदर करावा आणि कोणाच्याही भावना दुखावू नयेत, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

काश्मीर विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभात बोलताना उपराष्ट्रपतींनी झारखंडचे राज्यपाल असतानाचा एक अनुभव सांगितला. ते स्वतः शाकाहारी असूनही, काश्मीरमधील विद्यार्थी शिष्टमंडळ झारखंड भेटीवर आले असताना त्यांच्यासाठी मांसाहारी भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी आपल्या कार्यालयाला दिल्या होत्या. रांची येथील राजभवनात जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या भेटीच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.

“आपण लोकशाहीवादी आहोत आणि आपल्याला इतरांच्या भावनांचा स्वीकार करावा लागेल. आपल्याला स्वतःच्या विचारांचा अभिमान असू शकतो, त्यात कोणतीही अडचण नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की आपण इतरांच्या भावनांना कमी लेखले पाहिजे. हे वर्तन योग्य नाही आणि कोणताही खरा लोकशाहीवादी असे करणार नाही,” असे उपराष्ट्रपतींनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

राधाकृष्णन पुढे म्हणाले, “मी झारखंडचा राज्यपाल असताना 'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रम राबवला गेला होता. त्यावेळी जम्मू-काश्मीरमधील तरुण विद्यार्थ्यांचा एक मोठा गट रांचीला आला होता. तिथे मिळालेल्या आदरातिथ्यामुळे ते थक्क झाले. मला माहित होते की त्यापैकी बहुतांश विद्यार्थी मांसाहारी आहेत, म्हणून मी स्वतः शाकाहारी असूनही राजभवनातील कर्मचाऱ्यांना त्यांच्यासाठी मांसाहारी जेवण देण्यास सांगितले.” काश्मिरी विद्यार्थ्यांना मांसाहारी किंवा त्यांना जे आवडते तेच अन्न वाढले जावे, अशा स्पष्ट सूचना आपण राजभवनाला दिल्या होत्या, असेही त्यांनी नमूद केले.

आपल्या भाषणादरम्यान उपराष्ट्रपतींनी या दीक्षांत समारंभातील तीन महत्त्वाच्या बाबींबद्दल विशेष आनंद व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमधील उच्च शिक्षण मंत्री एक महिला आहेत, विद्यापीठाच्या कुलगुरू महिला आहेत आणि सुवर्णपदक विजेत्यांमध्ये बहुसंख्य महिला आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जम्मू-काश्मीरमधील महिला सक्षमीकरण आणि प्रगतीचे हे एक प्रभावी प्रतिबिंब असल्याचे त्यांनी वर्णन केले.

या दीक्षांत समारंभाला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही संबोधित केले. समारंभात सुमारे ६०,००० पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी त्यांनी उत्तीर्ण विद्यार्थी, पदक विजेते आणि पदवी प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन केले.