पार्श्वगायक आणि गीतकार अरमान मलिकने २००७ मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' या चित्रपटातील 'बम बम बोले' या गाण्यातून चाइल्ड सिंगर म्हणून पदार्पण केले. आज तो संगीत विश्वातील एक नावाजलेला कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने नुकतेच 'एक्स' वर एका पोस्टद्वारे वायू प्रदूषणासंबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
या पोस्टमधून त्याने मुंबईतील दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या प्रदूषणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "मुंबईची हवा दिवसेंदिवस अधिक जड वाटू लागली आहे. या महिन्यात आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या पूर्वर्वीपेक्षा खूपच जास्त आहे आणि याचं कारण हवामान नाही, तर प्रदूषित हवा आहे."
तो पुढे म्हणतो, "हेच वास्तव आहे! लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण यामुळे त्रस्त आहेत. सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपण कसं काम करायचं, कसं जगायचं किंवा स्वतःला सुरक्षित कसं समजायचं?" ही चिंता व्यक्त करत अरमानने जबाबदार यंत्रणांनी तत्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे.
"हे अत्यंत गंभीर आहे आणि यावर आत्ताच ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे," असे स्पष्टपणे सांगत त्याने या विषयावर प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.