अभिनेता सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना अलीकडेच ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील या दिग्गज लेखकाला अद्याप रुग्णालयातून सुटी मिळालेली नाही. ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. आता रात्री उशिरा आमिर खान लीलावती रुग्णालयात पोहोचला. त्याने तिथे जाऊन सलमान खानच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली.
आमिर खानने घेतली सलीम खानची भेट
आमिर खानचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये तो रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचल्याचे दिसत आहे. साध्या पेहरावात आलेल्या आमिरने लोकांचे लक्ष वेधून घेणे टाळले. सलीम खान यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आमिरने दुसऱ्यांदा त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. या व्हिडिओमध्ये आमिर खान चिंतेत असल्याचे जाणवत होते.
दरम्यान, बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना आमिर म्हणाला, "मी सलीम साहेबांची वैयक्तिकरित्या भेट घेऊ शकलो नाही. मी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. ते लवकर बरे होऊन घरी परतावेत, यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत. आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत." आमिरने पुढे सांगितले, "अलविरा जी मला रोज सांगत आहेत की, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते लवकर घरी यावेत आणि त्यांचे आरोग्य पुन्हा उत्तम व्हावे, अशी आमची प्रार्थना आहे."
सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी...
सलीम खान यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना त्यांच्या फॅमिली डॉक्टरनी १७ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना मेंदूमध्ये सौम्य रक्तस्त्राव (ब्रेन हॅमरेज) झाला होता. वडील रुग्णालयात असल्याची बातमी मिळताच सलमान खानने मुंबईतील मढ आयलंड येथील आपले चित्रीकरण थांबवले आणि थेट रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सलीम खान यांना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांच्यावर एक वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली आहे. ज्येष्ठ पटकथा लेखकावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.