ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केला तीव्र निषेध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 'हनुक्का' या ज्यू सणाच्या पहिल्याच दिवशी आनंद साजरा करणाऱ्या लोकांवर आज (१४ डिसेंबर) हा हल्ला करण्यात आला. या भयंकर घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्याबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.

या दुर्दैवी घटनेबद्दल मोदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे, अशा कुटुंबांचे त्यांनी भारतीय जनतेच्या वतीने मनापासून सांत्वन केले आहे. या कठीण प्रसंगी आणि दुःखाच्या काळात भारत पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या जनतेच्या पाठीशी उभा आहे, असा विश्वास त्यांनी दिला.

दहशतवादाबाबत भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत दहशतवादाला थारा देणार नाही. दहशतवाद कोणत्याही स्वरूपाचा असो, त्याविरुद्धच्या जागतिक लढ्याला भारताचा भक्कम पाठिंबा आहे. याविषयीचे भारताचे धोरण 'झिरो टॉलरन्स'चे (अजिबात सहन न करण्याचे) आहे.

'एक्स'वर व्यक्त केल्या भावना

'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोदींनी लिहिले, "ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर आज झालेला दहशतवादी हल्ला अत्यंत निंदनीय आहे. 'हनुक्का' सण साजरा करणाऱ्यांना लक्ष्य करणे हे घृणास्पद आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. भारतीय जनतेच्या वतीने, ज्यांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले, त्या कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या काळात आम्ही ऑस्ट्रेलियाच्या सोबत आहोत. भारत दहशतवादाला कधीच खपवून घेणार नाही आणि दहशतवादाच्या सर्व प्रकारांविराधातील लढाईला आमचा पाठिंबा आहे."