सोशल मीडियाच्या जगाबद्दल एक असा समज करून देण्यात आला आहे की, तिथे फक्त द्वेष विकला जातो, तोच ट्रेंड होतो आणि तोच दिसतो. आपल्या टाइमलाइनवर जे व्हिडिओ, पोस्ट आणि टिप्पण्या फिरत असतात, त्या अनेकदा कटुता, आरोप-प्रत्यारोप आणि जातीय तणावाने भरलेल्या असतात. हळूहळू आपल्याला या दृश्यांची इतकी सवय झाली आहे की, जणू हेच पूर्ण सत्य आहे, असे आपल्याला वाटू लागते. पण खरंच असं आहे का? की आपण स्वतःच आपल्या आवडीने, आपल्या क्लिकने आणि आपण कशावर थांबतो यावरून हे ठरवून टाकलंय की आपल्याला काय जास्त दिसणार आहे?
जर एखाद्या व्यक्तीने खरोखरच सोशल मीडियावर प्रेम, मैत्री आणि जातीय सलोख्याचा शोध घेतला, तर त्याला अशा असंख्य कहाण्या मिळतील ज्या मनात आशा जागवतात. या कहाण्या सिद्ध करतात की, द्वेषाचा आवाज कितीही मोठा असला, तरी प्रेमाचा आवाज अजूनही जिवंत आहे. फरक फक्त इतकाच आहे की आपण कुणाला जास्त ऐकतोय आणि कुणाकडे दुर्लक्ष करतोय.
अलिकडेच व्हायरल झालेले काही व्हिडिओ याच सत्याची साक्ष देतात. पहिला व्हिडिओ एका हिंदू आणि मुस्लिम तरुणाच्या मैत्रीचे उदाहरण देतो. व्हिडिओमध्ये एक मुस्लिम तरुण अभिमानाने सांगत आहे की, त्याच्या भागात निघणारी एक धार्मिक शोभायात्रा त्याच्या तरावीहच्या नमाजाच्या वेळी आली होती.
वातावरण संवेदनशील होऊ शकलं असतं, पण त्याच्या हिंदू मित्रांनी पुढाकार घेऊन मिरवणूक काही काळ थांबवली जेणेकरून तो आरामात नमाज पढू शकेल. तो तरुण कॅमेऱ्यासमोर सांगतो की, हे त्याचे भाग्य आहे की त्याला असे मित्र मिळाले जे त्याच्या इबादतीचा सन्मान करतात. त्याच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास आणि आपलेपणा हे सांगण्यासाठी पुरेसा आहे की, मैत्री ही धर्माच्या सीमांच्या पलीकडे असते.
दुसरा व्हिडिओही तितकाच भावुक आणि प्रेरणादायी आहे. यात एक मुस्लिम तरुण आपल्या हिंदू मित्राबद्दल सांगत आहे, जो रमजानच्या दिवसांत त्याला सहरीसाठी उठवतो आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था करतो. तो तरुण हसून सांगतो की, गेल्या वर्षी नवरात्रीमध्ये त्याने आपल्या मित्राच्या उपवासात मदत केली होती, आता तोच मित्र रमजानमध्ये त्याच्या रोजाची काळजी घेत आहे.
तो म्हणतो, “बघा, मैत्री अशी असते. आज तो माझ्यासाठी उभा आहे, काल मी त्याच्यासाठी उभा होतो.” हा संवाद कोणत्याही मोठ्या राजकीय वादाचा भाग नाही, तर दैनंदिन जीवनातून आलेला एक सहज अनुभव आहे, जो सांगतो की परंपरांचा सन्मान करणे हीच खऱ्या मैत्रीची ओळख आहे.
तिसऱ्या व्हिडिओमध्ये अजून एक सुंदर दृश्य समोर येते. एक मुस्लिम तरुण आपल्या हिंदू मित्रांच्या गाडीत बसून मशिदीत नमाज पढायला जातो. कॅमेऱ्याकडे वळून तो सांगतो की, जोपर्यंत तो नमाज पडून परत येत नाही, तोपर्यंत त्याचे मित्र बाहेर त्याची वाट पाहतील.
गाडीत बसलेल्या सर्व मित्रांच्या चेहऱ्यावर हास्य आहे आणि त्या हास्यात कोणताही कृत्रिमपणा नाही. तो तरुण आपल्या मित्रांची ओळख करून देताना म्हणतो, “हे माझे भाऊ आहेत.” हा भाईचारा कोणत्याही घोषणेतून किंवा भाषणातून नाही, तर त्यांच्या वागण्यातून झळकतो. मशिदीबाहेर उभे असलेले मित्र, आत इबादत करणारा तरुण, हे दृश्यच स्वतःमध्ये एक संदेश आहे की विश्वास आणि सन्मान हेच नात्यांचा खरा पाया आहेत.
चौथा व्हिडिओ एका हिंदू तरुणाचा आहे, जो आपल्या मुस्लिम मित्रांबद्दलचे अनुभव शेअर करत आहे. तो सांगतो की त्याच्या मित्रांनी त्याला नेहमीच साथ दिली आहे—मग ते अभ्यासाचे काम असो, नोकरीचा शोध असो किंवा एखाद्या वैयक्तिक अडचणीची वेळ असो. तो हेही सांगतो की रमजानमध्ये त्याने पहिल्यांदा रोजा ठेवण्याचा प्रयत्न केला, फक्त हे समजून घेण्यासाठी की त्याचे मित्र कोणत्या भावनेने हे करतात. त्याच्या शब्दांत जिज्ञासा आहे, सन्मान आहे आणि शिकण्याची इच्छा आहे. तो मानतो की जेव्हा आपण एकमेकांच्या श्रद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपोआप दुरावा कमी होतो.
या सर्व व्हिडिओंमध्ये एक गोष्ट समान आहे, यात कोणतीही मोठी राजकीय भाषा नाही, कोणतीही घोषणाबाजी नाही, कोणावरही आरोप नाहीत. हे सामान्य लोक आहेत, सामान्य परिस्थिती आहे, पण त्यांच्या वागण्यातून असाधारण माणुसकी दिसून येते. या त्या कहाण्या आहेत ज्या अनेकदा गोंगाटात दाबल्या जातात. कारण द्वेष खळबळ माजवतो, तर प्रेम शांतता देते. आणि कदाचित आपल्या डोळ्यांना आणि बोटांना आता खळबळीची सवय जडली आहे.
सोशल मीडियाचा अल्गोरिदम तेच दाखवतो, ज्यावर आपण जास्त वेळ थांबतो. जर आपण रागाने भरलेले व्हिडिओ वारंवार पाहत असू, तर तसाच मजकूर आपल्यासमोर अधिक येतो. जर आपण सलोखा आणि सकारात्मकतेच्या कहाण्या शेअर केल्या, त्या पाहण्यासाठी थांबलो, त्यांना पुढे पाठवले, तर त्याच आपल्या डिजिटल जगाचा चेहरा बनू शकतात. प्रश्न हा नाही की सोशल मीडियावर काय आहे; प्रश्न हा आहे की आपण काय पाहू आणि दाखवू इच्छितो.
हे सुद्धा खरे आहे की समाजात तणाव आणि मतभेद आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पण हे सुद्धा तितकेच खरे आहे की, प्रत्येक गल्ली-मोहल्ल्यात, प्रत्येक कॉलेज आणि ऑफिसमध्ये अशा मैत्री आहेत ज्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती नाती दैनंदिन छोट्या-मोठ्या मदतीतून, सणांमधील सहभागातून आणि परस्परांच्या आदर भावनेतून मजबूत होतात. या नात्यांची कधी हेडलाइन बनत नाही, पण हीच समाजाची खरी ताकद आहेत.
या व्हायरल पोस्ट्सनी पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की डिजिटल जग हे एक आरसा आहे—त्यात तेच दिसते, जे आपण समोर ठेवतो. जर कोणी द्वेषाचा संदेश पाठवत असेल, तर कोणी प्रेमाचाही संदेश पाठवत आहे. फरक फक्त इतकाच आहे की, आपण कोणता संदेश पुढे नेत आहोत.
कदाचित आता वेळ आली आहे की आपण आपल्या टाइमलाइनवर थोडा वेळ थांबावे आणि पाहावे की आपण काय निवडत आहोत. आपण तो गोंगाट निवडत आहोत जो आपल्याला आणखी विभागून टाकतो, की त्या कहाण्या ज्या आपल्याला जोडतात? कारण शेवटी समाजाचा चेहरा आपल्याच निवडीतून बनतो. आणि जर आपण ठरवले, तर सोशल मीडिया सुद्धा प्रेम, बंधुभाव आणि परस्परांच्या सन्मानाच्या कहाण्यांनी भरून जाऊ शकतो.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -