भक्ती चाळक
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी जनसागर लोटला होता. कथेच्या निमित्ताने शहरात भक्तीचे वातावरण असतानाच, वाढत्या उन्हामुळे आणि अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे भाविकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. अशा वेळी स्थानिक प्रशासनासोबतच आर्णीतील सर्वधर्मीय नागरिक, विशेषतः मुस्लिम या भाविकांच्या मदतीला मदतीला धावून आले. मुस्लिमांच्या या सेवाकार्याने सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण समाजापुढे उभे आहे.
रणरणत्या उन्हात लांबून आलेल्या लाखो भाविकांची तहान भागवण्यासाठी येथील मुस्लिम युवकांनी पुढाकार घेतला. कथेसाठी येणाऱ्या मार्गावर आणि कथास्थळी हे युवक थंड पाणी आणि सरबत घेऊन उभे होते. यासीन लाला यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या सेवाकार्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "कथेचे संपूर्ण ८ दिवस लाला कंपनीकडून भाविकांसाठी पाणी आणि सरबत उपलब्ध राहणार आहे. आम्ही या शिवमहापुराण कथेत सहभागी झालो आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. मदतीसाठी पुढे आलेले हात प्रार्थनेपेक्षाही पवित्र असतात."
केवळ पाणीच नाही, तर भाविकांच्या अल्पोपहाराची सोय करण्यासाठीही अनेक हात पुढे आले. मुबारक नगर येथील शरीफ भाई यांनी स्वखर्चाने घरातून पोहे तयार करून भाविकांना नाश्त्याचे वाटप केले. फैयाज सय्यद यांनी या उपक्रमाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. त्या व्हिडीओमधून शरीफ भाईंचा निस्वार्थी सेवाभाव स्पष्टपणे दिसून येतोय.
या कथेसाठी आलेल्या भाविकांनाच नाही तर, त्याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील सेवा दिली आहे. आरु खान यांनी देखील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते कथेच्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाणी वाटप करताना दिसत आहेत.
या सर्व सेवाकार्याची तीव्र गरज बुधवारी रात्री भासली. दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्री ११:३० च्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा आणि पावसाने हजेरी लावली. सिद्धेश्वर नगरी येथील कथास्थळी सुमारे २० हजारहून अधिक भाविक मुक्कामी होते. अचानक आलेल्या या संकटामुळे भाविकांची मोठी तारांबळ उडाली. अशा वेळी आर्णीतील नागरिकांनी रातोरात मदतकार्य राबवले.
स्थानिक मुस्लिम आणि इतर धर्मीय नागरिकांनी रुग्णवाहिका, रिक्षा आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने पावसात अडकलेल्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. भाविकांच्या निवासासाठी बाबा कंबलपोष दर्गा, माहेर मंगल कार्यालय आणि महालक्ष्मी मंगल कार्यालय यांसारखी ठिकाणे तातडीने खुली करण्यात आली.
संकटाच्या काळात जात किंवा धर्म न पाहता केवळ माणुसकीच्या नात्याने आर्णीकरांनी केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे. कथेच्या निमित्ताने होणारे हे अन्नदान आणि सेवा कार्य केवळ एका धर्मापुरते मर्यादित न राहता, ते खऱ्या अर्थाने सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप घेत असल्याचे चित्र आर्णीत पाहायला मिळाले.