मालेगाव हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो. येथील महापालिका हद्दीत १ मे पासून जनगणनेचे काम सुरू झाले आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी महापालिकेकडून काही दिवसांपूर्वी व्यापक पावले उचलण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात शहरातील मुस्लिम धर्मगुरू आणि प्रमुख व्यक्तींची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा आता अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येत असून उलेमांनी केलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये जनगणनेविषयी मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.
या बैठकीत महापालिका आयुक्त रवींद्र जाधव आणि अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधला होता. त्यांनी मुस्लिम धर्मगुरूंना स्वगणनेचे महत्त्व आणि ती पूर्ण करण्याची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली होती. जनगणनेबाबत समाजात कोणताही गैरसमज राहू नये यासाठी धर्मगुरूंनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत शहरातील धर्मगुरूंनी नागरिकांना जनगणनेत सहभागी होण्याचे आणि हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. त्यामुळे समाजात स्वगणनेबाबत चांगलीच जागृती झाली आहे.
स्वगणनेची प्रक्रिया झाल्यानंतर आता जनगणनेचा पुढचा टप्पा वेगाने सुरू झाला आहे. यासाठी महापालिकेतर्फे नियुक्त केलेले प्रगणक आणि पर्यवेक्षक १६ मे ते १५ जून या कालावधीत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. संबंधित घरातील सदस्यांची माहिती मोबाईल ॲप आणि संकेतस्थळावर नोंदवली जात आहे. एखाद्या कुटुंबाने स्वगणना केली नसेल तरीही महापालिकेचे नियुक्त प्रगणक त्यांच्या घरी येऊन ही जनगणनेची प्रक्रिया पूर्ण करत आहेत.
जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य असून नागरिकांनी माहितीच्या पडताळणीसाठी येणाऱ्या प्रगणकांना पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. उलेमांच्या प्रबोधनामुळे आता नागरिकांची या प्रक्रियेला उत्तम साथ मिळत आहे.
महापालिकेत झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीस उपायुक्त सुनीता कुमावत, चार्ज अधिकारी सचिन महाले, श्याम बुरकुल, संतोष गायकवाड आणि जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे उपस्थित होते. तसेच शहरातील मुस्लिम धर्मगुरू आणि प्रमुख व्यक्तींमध्ये फहमी अनीस अहमद, अब्दुल अझीम फारानी, अनिस ऊर रहेमान, जुबेर अहमद, मोमीन मोहम्मद, नसीर अहमद अन्सारी, हाफिज अनिस अजहर, जहीर कैसर, मौलाना अब्दुल कय्याम, डॉ. अखलाक अन्सारी आणि डॉ. रियाज अहमद आदींनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter