भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) करणार इंडोनेशियातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रंबनन मंदिराच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रंबनन मंदिराच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो

 

योग्याकार्ता (इंडोनेशिया) :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी बुधवारी इंडोनेशियातील शतकानुशतके जुन्या आणि ऐतिहासिक 'प्रम्बानन मंदिर' (Prambanan Temple) संकुलाला भेट दिली. या युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळाच्या संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी भारत आणि इंडोनेशिया यांच्या संयुक्त प्रकल्पाचे यावेळी दोन्ही नेत्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी या उपक्रमाला दोन्ही देशांमधील शतकांपासून चालत आलेल्या चिरंतन सभ्यता आणि सांस्कृतिक संबंधांचे एक "चमकते उदाहरण" असे म्हटले आहे.

९ व्या शतकातील 'त्रिमूर्ती' वैभव ९ व्या शतकात बांधलेला प्रम्बानन मंदिर समूह हा इंडोनेशियातील सर्वात मोठा हिंदू मंदिर परिसर आहे, जो प्रामुख्याने भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव या 'त्रिमूर्ती'ला समर्पित आहे. या मंदिराच्या भिंतींवर रामायणातील महाकाव्याचे प्रसंग अतिशय सुंदर नक्षीकामाच्या (Reliefs) स्वरूपात कोरलेले आहेत. दोन्ही देशांनी या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी 'लेटर ऑफ इंटेंट'ची (सामंजस्य करार) देवाणघेवाण केली असून भारताचे 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण' (ASI) ही या प्रकल्पातील मुख्य यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे.

दोन्ही नेत्यांनी मंदिर परिसरात या रेस्टोरेशन प्रकल्पाच्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून एका विशेष कोनशिलेचे अनावरण केले. या वेळी मोदींना मंदिराचा इतिहास आणि भारत-इंडोनेशिया सांस्कृतिक संवर्धन दाखवणाऱ्या औपचारिक पॅनेलची झलकही दाखवण्यात आली.
"इथल्या वाऱ्यात संस्कृतीचा सुगंध" पंतप्रधान मोदींचे मंदिरात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. मंदिर भेटीनंतर मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले, "भव्य प्रम्बानन मंदिर आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंधांचे प्रतीक आहे. अशा वारशाचे जतन करणे म्हणजे आपल्या पिढ्यांना प्रेरित करणाऱ्या परंपरांचे रक्षण करणे होय. या महत्त्वाच्या कामात इंडोनेशियाचा भागीदार होणे हा भारतासाठी मोठा बहुमान आहे."

आपल्या संबोधनात मोदी म्हणाले, "मी इथल्या वाऱ्यात संस्कृतीचा सुगंध अनुभवत आहे, जो आपण भारताच्या मातीत प्रत्येक क्षणी अनुभवतो. १,२०0 वर्षांपासून इथल्या लोकांनी हा भव्य वारसा आणि भक्तीभाव ज्या प्रकारे टिकवून ठेवला आहे, त्याबद्दल मी इंडोनेशियाच्या जनतेचे आणि सर्व राज्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो". त्यांनी या मंदिर भेटीला 'चैतन्यपूर्ण क्षण' (दैवी क्षण) असे संबोधले आणि दोन्ही देशांमधील नागरिक कल्याण आणि वेगवान विकासासाठी प्रार्थना केली. भारताने यापूर्वी आग्नेय आशियात कंबोडिया, व्हिएतनाम यांसारख्या अनेक जागतिक वारसा स्थळांचे यशस्वी संवर्धन केले असून इंडोनेशियातील बोरोबुदुर मंदिराचेही दस्तऐवजीकरण केले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.