जगातील सर्वात मोठ्या मुस्लिमबहुल देशावर आहे भारतीय संस्कृतीचा प्रभाव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
इंडोनेशियामधील 'प्रम्बानन' मंदिर आणि जकार्तामधील अर्जुन-कृष्णाचा रथ; मुस्लिमबहुल देशातील भारतीय संस्कृतीची झलक
इंडोनेशियामधील 'प्रम्बानन' मंदिर आणि जकार्तामधील अर्जुन-कृष्णाचा रथ; मुस्लिमबहुल देशातील भारतीय संस्कृतीची झलक

 

मृदगंधा दीक्षित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ६ ते ८ जुलै २०२६ दरम्यान इंडोनेशियाला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी 'प्रम्बानन' या प्राचीन आणि भव्य हिंदू मंदिर परिसराची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर इंडोनेशियाचा सांस्कृतिक वारसा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. 

इंडोनेशिया हा जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. पण विशेष म्हणजे, तिथल्या कणाकणात भारतीय संस्कृती आणि हिंदू परंपरा आजही गुण्यागोविंदाने नांदत आहेत. इंडोनेशियाने आपली प्राचीन संस्कृती आणि नवा धर्म यांचा उत्तम समतोल साधला आहे.

तलवारीच्या जोरावर नव्हे, तर 'कलेतून' धर्मबदल!
इंडोनेशियामध्ये इस्लामचा प्रसार आक्रमकांनी तलवारीच्या जोरावर लादलेला नाही. तिथला धर्मबदल अत्यंत शांततापूर्ण होता. शेकडो वर्षांपूर्वी 'वाली सोंगो' (Wali Songo - नऊ सुफी संत) यांनी तिथे इस्लामचा प्रसार केला. या संतांनी तिथली प्राचीन मंदिरे पाडली नाहीत किंवा स्थानिक संस्कृती नष्ट केली नाही.

उलट, त्यांनी स्थानिक लोकांना इस्लामची तत्त्वे समजावून सांगण्यासाठी 'रामायण' आणि 'महाभारता'चाच आधार घेतला. त्यांनी 'वायांग कुलित' (Wayang Kulit) या चामड्याच्या बाहुल्यांच्या पारंपारिक कलेच्या माध्यमातून रामायण-महाभारताच्या कथा सांगत शांततेने आपला विचार मांडला. त्यामुळेच तिथल्या लोकांनी नवा धर्म स्वीकारताना आपली जुनी संस्कृती कधीच छाटून टाकली नाही.

राष्ट्रीय बोधवाक्य अन् लष्कराचे ब्रीदवाक्यही 'संस्कृत'मध्ये!
इंडोनेशियात भाषेवर आणि नावांवर आजही संस्कृत भाषेचा मोठा प्रभाव दिसून येतो.

राष्ट्रीय बोधवाक्य: इंडोनेशियाचे राष्ट्रीय बोधवाक्य 'भिन्नेका तुंग्गल इका' (Bhinneka Tunggal Ika) असे आहे. हा मूळ 'भिन्न एकता' हा संस्कृत शब्द असून, याचा अर्थ 'विविधतेत एकता' असा होतो. १४ व्या शतकातील 'मजापहित' या बौद्ध काळात लिहिल्या गेलेल्या एका काव्यातून त्यांनी हा विचार घेतला आहे.

लष्कराचा सन्मान: इंडोनेशियन नौदलाचे अधिकृत ब्रीदवाक्य 'जलेष्वेव जयमहे' हे आहे. याचा अर्थ 'समुद्रात आमचाच विजय असो' असा होतो.

नावांचा गोडवा: तिथल्या शहरांची आणि व्यक्तींची नावे पाहिल्यास संस्कृतचा प्रभाव स्पष्ट दिसतो. 'योग्याकार्ता' हे शहर अयोध्येच्या नावावरून आले आहे. तिथले पहिले राष्ट्रपती 'सुकर्णो' (सु-कर्ण) आणि त्यांच्या मुलीचे नाव 'मेघावती सुकर्णोपुत्री' होते.

नोटांवर गणपती अन् राजधानीत 'कृष्ण-अर्जुन'
शिक्षण, कला आणि विद्येची देवता म्हणून इंडोनेशियात गणपतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच, इंडोनेशियाने १९९८ साली चलनात आणलेल्या २० हजार रुपयांच्या नोटेवर चक्क गणपतीचा फोटो छापला होता. या नोटेवर एका बाजूला त्यांचे शिक्षणतज्ज्ञ 'की हजर देवान्तरा' आणि बाजूला ज्ञानाचे प्रतीक म्हणून गणपती बाप्पा विराजमान होता.

एवढेच नाही, तर राजधानी जकार्ताच्या अगदी मध्यभागी, जिथून राष्ट्राध्यक्ष आणि सर्व व्हीआयपी लोकांची सतत ये-जा असते, तिथे एका मोठ्या चौकात 'अर्जुन विजया' (Arjuna Wijaya) नावाचा भव्य पुतळा उभारलेला आहे. या पुतळ्यात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन रथावर स्वार झालेले आहेत. एक मुस्लिमबहुल देश आपल्या राजधानीच्या मध्यभागी महाभारतातील हे दृश्य अत्यंत अभिमानाने मिरवतो, ही बाब खूप काही सांगून जाते.

राष्ट्रीय प्रतीक 'गरुड' आणि मंदिरात रंगणारे रामायण
इंडोनेशियाचे राष्ट्रीय प्रतीक 'गरुड पंचशिला' आहे. भगवान विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाला त्यांनी आपला राष्ट्रीय पक्षी आणि बोधचिन्ह मानले आहे. त्यांच्या राष्ट्रीय विमान कंपनीचे नावही 'गरुडा इंडोनेशिया' असेच आहे.

पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला 'प्रम्बानन' हा जगातील सर्वात मोठा आणि सुंदर हिंदू मंदिर समूह आहे. तिथे दररोज संध्याकाळी मुस्लिम कलाकार 'रामायण' बॅले (नृत्यनाट्य) सादर करतात. रामायणातील राम, सीता आणि हनुमान हे त्यांचे लाडके नायक आहेत. हे सगळे ते कुठल्याही दबावाखाली करत नाहीत, तर तो त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे.

जगासाठी एक मोठा वस्तुपाठ!
तिथे राजकारण आणि धर्म यांची गल्लत केली जात नाही. इंडोनेशियन लोक मोठ्या अभिमानाने एक वाक्य सांगतात - "इस्लाम हा आमचा धर्म आहे, पण हिंदू-बौद्ध संस्कृती हा आमचा वारसा आहे. आमचा धर्म नक्कीच बदलला, पण आमचे पूर्वज बदललेले नाहीत."

स्वतःच्या मुळांचा आणि पूर्वजांचा आदर करत नवीन गोष्टी स्वीकारणे, हे खऱ्या प्रगल्भ समाजाचे लक्षण असते. धर्माची जागा वैयक्तिक आयुष्यापुरती मर्यादित ठेवून, संस्कृतीला देशाच्या नसानसात कसे भिनवावे, याचा उत्तम धडा इंडोनेशियाने संपूर्ण जगाला घालून दिला आहे. हाच समतोल, ज्यावर 'अमन-ओ-इत्तेहाद ट्रस्ट'चा मुख्य भर आहे, तो आजच्या जगात सर्वात जास्त गरजेचा आहे!