देशातील अनेक राज्यांत पावसाचा धुमाकूळ; हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा रेड अलर्ट

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 6 h ago
मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन; हवामान विभागाचा देशभरात अतिवृष्टीचा इशारा
मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन; हवामान विभागाचा देशभरात अतिवृष्टीचा इशारा

 

नवी दिल्ली :

भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी देशातील अनेक भागांत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य मान्सून सध्या जोरदार सक्रिय झाला आहे. परिणामी उत्तर-पश्चिम, मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीसह ईशान्य भारताच्या काही भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या बुलेटिननुसार देशातील बहुतांश राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ईशान्य भारत ते महाराष्ट्रात धो-धो पाऊस

८ जुलै रोजी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा धोका आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारी कर्नाटक, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच दक्षिण आंतरिक कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

या राज्यांनाही बसणार फटका

बिहार, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उत्तर आंतरिक कर्नाटक, पंजाब, सौराष्ट्र, कच्छ, उत्तराखंड, विदर्भ, पश्चिम राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता आहे. आगामी काळात बिहार, पूर्व उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांत पावसाचा जोर वाढेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मान्सूनची वेगाने वाटचाल

पश्चिम किनारपट्टीला लागून असलेल्या भागात अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. द्वीपकल्पीय, मध्य तसेच ईशान्य भारतात विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. नैऋत्य मान्सूनने गुजरातचा उर्वरित भाग, राजस्थान, हरयाणाच्या आणखी काही भागात मजल मारली आहे. उत्तर-पश्चिम भारताच्या उर्वरित भागात मान्सून पुढे सरकण्यासाठी सध्या अत्यंत पोषक वातावरण आहे.

महामार्ग खचले, वाहतूक विस्कळीत

अनेक राज्यांत पावसामुळे जनजीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. हरयाणातील गुरुग्राममध्ये मंगळवारी मुसळधार पावसानंतर नरसिंहपूर परिसरातील राष्ट्रीय महामार्ग-४८ चा मोठा भाग खचला. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. तिकडे उत्तराखंडमध्ये सियानचट्टीजवळ यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर (NH-134) दरड कोसळून रस्ता बंद पडला. माहिती व जनसंपर्क विभागाने (DIPR) दिलेल्या माहितीनुसार, संबंधित यंत्रणांनी ढिगारा उपसून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

अतिवृष्टीचा धोका असलेल्या भागातील नागरिकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीची स्थिती तपासावी, असे आवाहन आयएमडीने केले आहे. पाणी साचलेल्या भागांपासून, कमकुवत इमारतींपासून सुरक्षित अंतर ठेवावे. स्थानिक पातळीवर अचानक येणारा पूर, दरड कोसळण्याच्या घटना, कमी दृश्यमानता अशा संकटांचा सामना करण्यासाठी पुरेशी खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.