नवी दिल्ली
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात सोमवारी एक महत्त्वाची पुरवणी दोषारोपपत्र जम्मू येथील विशेष न्यायालयात दाखल केली. यामध्ये लष्कर-ए-तैयबा (LeT) चा प्रमुख हाफिज सईद याला मुख्य आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. पाकिस्तानस्थित हाफिज सईदवर भारतीय न्याय संहिता आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या (UAPA) विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भारताच्या विरोधात युद्धाचा कट
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईदवर भारताच्या विरोधात युद्ध पुकारणे आणि सीमेपलीकडून कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हे दोषारोपपत्र डिसेंबर २०२५ मध्ये दाखल करण्यात आलेल्या मूळ १,५९७ पानांच्या दोषारोपपत्राचा पुढचा भाग आहे. यामध्ये पाकिस्तानचे षड्यंत्र, सईदची भूमिका आणि एनआयएने गोळा केलेले वैज्ञानिक पुरावे यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या प्रकरणात लष्कर-ए-तैयबा आणि तिची संघटना 'द रेसिस्टन्स फ्रंट' (TRF) यांनाही कायदेशीर संस्था म्हणून गुन्ह्यात सामील धरण्यात आले आहे.
काय होता पहलगाम हल्ला?
गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांना लक्ष्य करून भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला पहलगाम पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा नंतर गृह मंत्रालयाने एनआयएकडे सोपवला होता. सीमेपलीकडून भारतात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यासाठी एनआयएचा तपास सुरू आहे.