संदीप घाटगे
भारतात क्रिकेटला धर्म मानलं जातं... पण या देशात एक शहर असंही आहे, जिथे चेंडू हातात नाही, तर पायात असला की रक्ताचा वेग वाढतो. इथे एखादा गोल झाला की फक्त स्कोअरबोर्ड बदलत नाही, तर संपूर्ण पेठ जल्लोषात न्हाऊन निघते. इथल्या मैदानावर खेळाडू धावत असतात, पण त्यांच्यासोबत हजारो प्रेक्षकांचं हृदयही तितक्याच वेगाने धावत असतं...फुटबॉलसाठी खुळं असणारं शहर म्हणजे... कोल्हापूर!
कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं कुस्तीचं मैदान, तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल आणि राजेशाही परंपरा. पण या शहराची आणखी एक ओळख आहे... ती म्हणजे फुटबॉलचं अफाट वेड!इतकं अफाट की, इथे फुटबॉल हा फक्त खेळ नाही, तर पिढ्यान्पिढ्या जपलेली परंपरा, संघांची अस्मिता आणि पेठांचा अभिमान आहे.
विशेष म्हणजे हा खेळ या मातीत जन्मलेला नाही, तर हजारो किलोमीटर दूर युरोपमध्ये जन्मलेला हा खेळ कोल्हापुरात आला...आणि कोल्हापूरने त्याचं केवळ स्वागत केलं नाही, तर त्याला आपल्या संस्कृतीत इतकं सामावून घेतलं की, आज फुटबॉलचा इतिहास लिहिताना कोल्हापूरचं नाव टाळणं अशक्य आहे.
या फुटबॉलप्रेमामागे शतकभराचा इतिहास आहे... संघर्ष आहे... राजाश्रय आहे... आणि हजारो अनामिक खेळाडूंचा घाम आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधील अनेक निर्वासित भारतात आले. त्यातील काही कुटुंबांना कोल्हापूरने आसरा दिला. त्यांच्यासोबत फुटबॉल आला. त्यांनी स्थानिक तरुणांना या खेळाचे धडे दिले. चेंडूवर नियंत्रण कसं ठेवायचं, पास कसा द्यायचा, संघभावना म्हणजे काय, हे शिकवलं. त्याचबरोबर बूट घालून खेळण्याची सवयही कोल्हापूरकरांनी त्यांच्याकडूनच आत्मसात केली. परदेशातून आलेला हा खेळ हळूहळू कोल्हापूरच्या रक्तात भिनला.

१९३६ हे वर्ष कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. पुण्याहून बंगळुरूकडे जाणारी ब्रिटिश सैन्याची "१० आर.टी.सी." तुकडी काही दिवसांसाठी कोल्हापुरात थांबली होती. त्यांच्या संघाला स्थानिक प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंनी सामन्याचं आव्हान दिलं. खासबाग मैदानावर झालेल्या त्या लढतीत ब्रिटिश सैनिकांविरुद्ध कोल्हापूरच्या खेळाडूंनी असा झुंजार खेळ केला की, सामना १-१ अशा बरोबरीत सुटला. त्या काळात इंग्लिश संघाला रोखून धरणं हीच मोठी विजयगाथा ठरली.
फुटबॉलला खरी चालना मिळाली ती कोल्हापूरच्या राजघराण्याच्या पाठबळामुळे. ज्या पद्धतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला बळ दिलं, त्याच परंपरेत छत्रपती राजाराम महाराजांनी फुटबॉलला राजाश्रय दिला. पंचगंगा नदीकाठी फिफाच्याही अगोदर म्हणजे १९३० साली जामदार क्लबची स्थापना झाली आणि इथेच कोल्हापूरच्या फुटबॉलची मजबूत पायाभरणी झाली. पुढे शहरातील तालीम, क्लब आणि पेठा यांच्यातील स्पर्धांनी या खेळाला लोकचळवळीचं स्वरूप दिलं.
आजही दिवाळी संपताच कोल्हापुरातील फुटबॉल हंगाम सुरू होतो. पुढचे सहा महिने मैदानांवर फुटबॉलचा उत्सव भरतो. अ गटात १६, ब गटात १६, तर क गटात जवळपास ८० संघ स्पर्धात्मक खेळ खेळतात. शाहू मैदानावरील सामन्यांमध्ये फक्त संघाचे ११ खेळाडू खेळत नाहीत, तर त्यांच्यासोबत प्रेक्षकांच्या गॅलरीत संपूर्ण पेठ, संपूर्ण तालीम खेळते; कारण या सामन्यातील प्रत्येक गोल म्हणजे त्यांच्या प्रतिष्ठेचा 'विषय हार्ड' असतो.
या फुटबॉलप्रेमाची प्रचिती नुकत्याच झालेल्या शिवशाहू चषक स्पर्धेत आली. स्थानिक असणारे खंडोबा आणि वेताळमाळ तालीम या दोन संघांमध्ये सामना रंगला असताना, वेताळमाळ संघाचे चाहते राजेंद्र साळोखे यांनी पहिल्या गोलसाठी ५१ हजार, दुसऱ्या गोलसाठी १ लाख १ हजार आणि तिसऱ्या गोलसाठी १ लाख ५१ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर केली आणि दिलीसुद्धा; असं चित्र नेहमीच कोल्हापूरच्या स्पर्धेत पाहायला मिळतं. कधी कधी विजयी संघासाठी बकरी देऊन जेवणाची व्यवस्था केली जाते आणि संघदेखील विजयी मिरवणुकीत सहभागी झालेले कोल्हापूरकरांनी पाहिलं आहे.
मैदानावरील प्रत्येक गोलासोबत वाढत गेलेला उत्साह पाहून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, कोल्हापुरात फुटबॉल हा खेळ नसून जिव्हाळ्याचा उत्सव आहे.
या शहराने केवळ सामनेच दिले नाहीत, तर भारताला दर्जेदार खेळाडूही दिलेत. पीटीएम (PTM) संघाकडून खेळलेल्या अनिकेत जाधवने फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकात भारताचं प्रतिनिधित्व करत कोल्हापूरचं नाव जगभर पोहोचवलं. प्रॅक्टिस क्लबचा खेळाडू दर्शन पाटीलने युरोपियन व्यावसायिक लीगपर्यंत मजल मारत महाराष्ट्रासाठी नवा इतिहास रचला; तर पीटीएमचाच खेळाडू ओमकार मोरेने जर्मनी, फिनलंड, टर्की देशांतील मैदान गाजवले आहे.
.jpg)
महिलांच्या फुटबॉलमध्येही कोल्हापूर मागे नाही. गडहिंग्लज तालुक्यातील बेकनाळ गावची अंजू फुटबॉलच्या प्रेमापोटी शालेय वयात घर सोडून पळून गेली आणि तेथून पुणे-मुंबई येथे विविध टप्प्यांवर फुटबॉल खेळली...अनेक आव्हानांचा सामना करत अंजू शिवाजी तुरंबेकर या तरुणीची आशियाई फुटबॉल ग्रासरूट समितीवर नियुक्तीझाली. आशियाई फुटबॉल महासंघाच्या ग्रासरूट समितीवर निवड होणारी पहिली भारतीय महिला बनण्याचा तिने मान मिळवला. आज त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक म्हणून नव्या पिढीला घडवत आहेत.
आजदेखील कोल्हापुरातील मैदानावर सामना सुरू होण्याआधीच मैदान भरून जातं. काहीजण ऑफिसला दांड्या मारून, तर काहीजण दुकानाला कुलूप लावून, तर काही फुटबॉलवेड्या महिला घरचं काम आटोपून मैदानावर हजेरी लावतात. सामना सुरू होताच खेळाडूंच्या नावांच्या घोषणा सुरू होतात आणि अखेरच्या शिट्टीपर्यंत प्रत्येक प्रेक्षक स्वतःच खेळाडू बनून सामना जगत असतो. म्हणूनच फुटबॉलचा इतिहास लिहिताना कोल्हापूर हे फक्त एक शहर म्हणून नोंदवलं जाऊ शकत नाही. कारण इथे फुटबॉल खेळला जात नाही, तो जगला जातो... पिढ्यान्पिढ्या जपला जातो...
कोल्हापूरच्या मैदानांवर संध्याकाळी फेरफटका मारला, तर एखादा लहान मुलगा अनिकेत जाधव होण्याचे स्वप्न पाहताना, तर एखादी मुलगी अंजू तुरंबेकर यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्धार करताना दिसून येईल. मैदानावर चिखल असतो, घाम असतो, जखमा दिसतात; पण त्याहूनही कोल्हापुरात खेळावरची निष्ठा मोठी दिसते.
सध्या फुटबॉल स्पर्धा अमेरिकेत होत असली तरी त्याची क्रेझ मात्र कोल्हापूर शहराच्या गल्लीबोळात आणि पेठापेठांत पाहायला मिळत आहे. मेस्सी, नेमार, रोनाल्डोसह ब्राझील, जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांचे स्टार फुटबॉलपटू अवतरले आहेत. चाहत्यांनी लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेमार यांसारख्या खेळाडूंचे कटआऊट लावले आहेत. शिवाय चौकाचौकात या संघांचे ध्वज लावले आहेत. संघाच्या जर्सी (गणवेश) घालून कोल्हापुरातील तरुण फुटबॉल खेळाडू रस्त्यावरून वावरत आहेत, त्यामुळे सध्या कोल्हापुरात 'जाळ आणि धूर संगटच' पाहायला मिळत आहे.
तसेच यंदाच्या विश्वचषकाचा थरार ऐन रंगात आला असताना, फिफाने कोल्हापूरकरांच्या फुटबॉल प्रेमाची दखल घेत "लय भारी", "विषय हार्ड", "रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय" अशा अस्सल कोल्हापुरी भाषेतील कमेंट्स आणि त्यासोबतच्या इमेजेस प्रसिद्ध केल्या. या पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, कोल्हापूरच्या फुटबॉल संस्कृतीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
काळ बदलला, खेळ बदलले, मनोरंजनाची साधने बदलली; पण कोल्हापुरात फुटबॉलची क्रेझ अजूनही तितकीच कायम आहे. कारण इथे फुटबॉल फक्त पायाने खेळला जात नाही... तो हृदयाने खेळला जातो.
म्हणूनच भारतात फुटबॉलची राजधानी कोणती, असा प्रश्न विचारला तर अनेक जण गोवा, केरळ किंवा कोलकात्याचे नाव घेतील. पण ज्याने कोल्हापूरचा फुटबॉल प्रत्यक्ष अनुभवला आहे, तो मात्र एकच उत्तर देईल...
"कोल्हापुरात फुटबॉल खेळला जात नाही... तो जगला जातो!"