नवी दिल्ली
भारत आता जागतिक क्रीडा नकाशावर आपली पकड अधिक मजबूत करत आहे. २०२६ च्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा २०३६ ऑलिम्पिक यजमानपदाचा संकल्प जाहीर केला. तसेच, ऑलिम्पिकमध्ये भारताची उपस्थिती वाढवण्यासाठी ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी देशभरात एक भव्य 'टॅलेंट हंट' मोहीम राबवण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.
पंतप्रधान म्हणाले की, ऑलिम्पिकमध्ये सुमारे ४० क्रीडा प्रकार असतात आणि ३५० हून अधिक इव्हेंट्स होतात. दुर्दैवाने आपण यापैकी दोन-तृतीयांश प्रकारांत सहभागीही होऊ शकत नाही, कारण आपण पात्रताही मिळवू शकत नाही. हे चित्र बदलण्यासाठी आपण २०३६ पर्यंत किमान तीन-चतुर्थांश प्रकारांत भारताचा सहभाग असेल, अशा प्रकारे तयारी करणार आहोत.
या टॅलेंट हंट कार्यक्रमासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा मोठा आधार घेतला जाणार आहे. फिटनेस बॅटरी टेस्टच्या माध्यमातून मुलांच्या शारीरिक क्षमतेचे मोजमाप केले जाईल. याद्वारे अशा मुलांना शोधले जाईल ज्यांच्यामध्ये खेळाची नैसर्गिक आवड आणि क्षमता आहे, परंतु त्यांना अजून त्याबद्दल माहिती नाही.
सरकारच्या 'खेलो इंडिया' योजनेचा विस्तार करत, नॅशनल कॅम्प आणि अकादमींच्या माध्यमातून या मुलांना जागतिक दर्जाचे खेळाडू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. पंतप्रधान मोदींनी यावेळी अशीही इच्छा व्यक्त केली की, भारताने भविष्यात अधिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. २०३० च्या राष्ट्रकुल खेळांचे (CWG) यजमानपदही भारत भूषवत आहे, असे त्यांनी नमूद केले.