नाशिक
नाशिकमधील टीसीएस (TCS) कार्यालयातील कर्मचारी छळवणूक आणि कथित धर्मांतर प्रकरणात दोन महिन्यांपासून अटकेत असलेल्या निदा खानला नाशिक सत्र न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. मात्र, याच प्रकरणातील सहआरोपी दानिश शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी तौसीफ अख्तर यालाही न्यायालयाने जामीन दिला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांनी हा आदेश दिला. दानिश शेखच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, त्याच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. शिक्षेचे स्वरूप आणि पुराव्यांशी छेडछाड करण्याची किंवा साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करत न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.
काय आहे प्रकरण?
मे महिन्यात निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. टीसीएसच्या नाशिक युनिटमधील कनिष्ठ महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उजेडात आले होते. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२६ या काळात आरोपींनी तिचे लैंगिक शोषण केले आणि लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केला. तसेच, तिला मलेशियात पाठवण्याचा कट रचल्याचाही आरोप आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडितेच्या धार्मिक भावना दुखावणे आणि तिला जातीवाचक शिवीगाळ करणे असेही आरोप एफआयआरमध्ये आहेत. नाशिक पोलिसांचे एक विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणातील एकूण नऊ गुन्ह्यांचा तपास करत आहे. टीसीएसने या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, छळवणुकीबाबत 'झिरो टॉलरन्स' धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे.