नवी दिल्ली :
शीख फुटीरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या २०२३ मधील हत्येचा तपास करणाऱ्या कॅनडा पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या हत्येमागे भारत सरकार किंवा भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही, असा मोठा खुलासा एका वरिष्ठ कॅनेडियन पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.
या खुलाश्यामुळे कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी यापूर्वी भारतावर केलेल्या गंभीर आणि खळबळजनक आरोपांमधील हवा पूर्णपणे निघून गेली आहे.
ट्रुडोंचे आरोप आणि RCMP चे स्पष्टीकरण रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस (RCMP) च्या उपआयुक्त लिसा मोरलँड यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यावर निज्जरच्या हत्येचा आरोप निश्चित केल्यानंतर काही तासांतच हे विधान समोर आले. 'ऑपरेशन हार्डबॉल' अंतर्गत अमेरिका आणि कॅनडामध्ये २४ जणांना अटक करण्यात आली आहे.
कॅनडाच्या सीबीसी न्यूजशी (CBC News) सविस्तर बोलताना मोरलँड म्हणाल्या, "या संघटित गुन्हेगारी तपासातून किंवा आतापर्यंत दाखल केलेल्या आरोपपत्रातून भारतीय अधिकाऱ्यांचा यात काहीही सहभाग असल्याचे सूचित करणारा कोणताही पुरावा आमच्या हाती लागलेला नाही". विशेष म्हणजे, भारत सरकारने या तपासात पूर्ण सहकार्य केल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
भारत-कॅनडा संबंध आणि सुधारणा निज्जरच्या हत्येनंतर जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत थेट भारत सरकारवर आरोप केल्याने दोन्ही देशांचे संबंध इतिहासातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचले होते. भारताने हे आरोप "मूर्खपणाचे" आणि "राजकीय हेतूने प्रेरित" असल्याचे सांगून फेटाळून लावले होते.
तर, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कॅनडात झालेल्या संसदीय निवडणुकीत लिबरल पक्षाचे नेते मार्क कार्नी यांचा विजय झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूंनी आपापल्या राजधानीत पुन्हा उच्चायुक्त नियुक्त केले असून, मार्चमध्ये पंतप्रधान कार्नी यांच्या भारत भेटीनंतर संबंधांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. आता RCMP ने दिलेल्या या नव्या अधिकृत माहितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू अधिक भक्कम झाली आहे. निज्जर हा भारतात बंदी घातलेल्या खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) प्रमुख होता आणि भारताने त्याला दहशतवादी घोषित केले होते.