अमेरिकेच्या कारवाईनंतर इराणचा पलटवार; बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन तळांवर केले क्षेपणास्त्र हल्ले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 8 h ago
बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन तळांवर केले क्षेपणास्त्र हल्ले
बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन तळांवर केले क्षेपणास्त्र हल्ले

 

दुबई :
मध्यपूर्वेमध्ये (Middle East) पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांचा आणि निर्बंधांचा बदला घेण्यासाठी इराणने बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या प्रमुख लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि आत्मघाती ड्रोनद्वारे भीषण हल्ले केले आहेत.

तेलाच्या परवान्यावरून वाद होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यांना उत्तर म्हणून अमेरिकेने तात्पुरत्या करारांतर्गत इराणला दिलेला तेल विक्रीचा परवाना (Oil License) तातडीने रद्द केला. या परवान्यामुळे इराणला अनेक वर्षांनंतर खुल्या बाजारात डॉलरमध्ये तेल विकण्याची सूट मिळाली होती. परवाना रद्द केल्यानंतर अमेरिकेच्या 'सेंटकॉम'ने (CENTCOM) इराणमधील लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. यात इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा, रडार आणि रिव्होल्युशनरी गार्डच्या ६० पेक्षा जास्त लहान बोटी नष्ट करण्यात आल्या.

इराणच्या बंदर महशहर आणि बुशेहर अणुप्रकल्प परिसराजवळ हे स्फोट झाले असून, त्यात एक इराणी जवान मारला गेला.

इराणचा पाचव्या आरमारावर हल्ला अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणने अवघ्या काही तासांतच बहरीन आणि कुवेतमध्ये क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. बहरीनमध्ये असलेले अमेरिकन नौदलाचे शक्तिशाली पाचवे आरमार (5th Fleet) आणि कुवेतमधील 'अली अल सालेम' हवाई तळाला इराणने प्रामुख्याने लक्ष्य केले. इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाघर कालिबाफ यांनी अमेरिकेला सुनावले की, "दडपशाही आणि खंडणीखोरीचे युग आता संपले आहे. आम्ही कोणासमोरही झुकणार नाही.".

दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो परिषदेदरम्यान घोषणा केली की, इराणसोबतचा तात्पुरता युद्धविराम (Ceasefire) आता पूर्णपणे संपुष्टात आला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराचा विधी सुरू असतानाच हा संघर्ष पेटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थेट ६ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.