डोनाल्ड ट्रम्पकडून भारताच्या निवडणूक प्रणालीचे कौतुक; भारतीय मतदार ओळखपत्रांचा दाखला देत 'SAVE America Act'ची मागणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 4 h ago
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प

 

वाशिंग्टन 

अमेरिकेत कडक निवडणूक कायदे लागू करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचे भरभरून कौतुक केले आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकेतील निवडणुकीत फोटो ओळखपत्राच्या अभावावर प्रश्न उपस्थित केल्याचा दाखला देत ट्रम्प यांनी 'SAVE America Act' मंजूर करण्याची जोरदार मागणी केली आहे.

सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत ट्रम्प यांनी, भारताच्या अलीकडील सार्वत्रिक निवडणुकीत ६४ कोटींहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आणि त्यापैकी एका टक्क्याहून कमी लोकांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केल्याचे म्हटले. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी या महिन्याच्या सुरुवातीस प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करताना, वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा होऊ शकतात, असा सवाल केल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. प्रत्येक मतदारासाठी वैध फोटो ओळखपत्र बंधनकारक असणाऱ्या भारताच्या कार्यपद्धतीचे त्यांनी कौतुक केले.

'SAVE America Act' पास करण्याची मागणी

निवडणुकांमधील फेरफार रोखण्यासाठी अमेरिकेत 'SAVE America Act' कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा, अशी आक्रमक भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. या कायद्यानुसार अमेरिकन नागरिकांना मतदानासाठी नोंदणी करताना नागरिकत्वाचा पुरावा दाखवावा लागेल, देशभरात मतदार ओळखपत्र सक्तीचे केले जाईल आणि पोस्टल याद्वारे होणारे मतदान अत्यंत मर्यादित केले जाईल. व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, भारत आणि ब्राझीलने आधीच मतदार ओळखपत्रे बायोमेट्रिक डेटाबेसशी जोडली आहेत, तर अमेरिका अद्याप स्व-प्रमाणपत्रावर अवलंबून आहे.